मार्गदर्शक:

मार्गदर्शक हा दिशादर्शकासारखा असतो, दिशांची अचूक माहिती देतो, तरीही प्रवाशाला त्याच्या त्याच्या मार्गाने जाण्याच्या स्वातंत्र्याचा आदर ठेवतो.

मुलांना माहिती देताना:

मुलांना माहिती देताना:
आपल्याला पालक म्हणून आपल्या मुलांना यथायोग्य माहिती देण्यास आवडते. अशी उपयुक्त माहिती देऊन आपण मुलांना कायम वापरण्यासाठी एखादी भेटच देत असतो. आयुष्यभर त्याला ती माहिती असणे आवश्यक व फायदेशीर ठरते. उदा. “दूध फ्रिजमध्ये ठेवले नाही तर नासते,” “खुली जखम स्वच्छ ठेवली तर लवकर भरून येते,” “बिस्किटे उघडी राहील्यास मऊ पडतात,” उघड्यावरचे अन्न खाल्ल्यास पोट बिघडते,”इत्यादी.

मुलांना अशा प्रकारची माहिती देणे टाळावे जी त्यांना आधीच माहित आहे. मुलांच्या वयानुसार योग्य ती माहिती योग्य त्या प्रसंगी दिलेली चांगले. अन्यथा आपल्याला मूर्खात काढले जात आहे किंवा आपला उपहास व चेष्टा-मस्करी करून अपमान केला जात आहे, असे मुलांना वाटणे शक्य आहे.

मुलांना यथायोग्य व प्रसंगानुरूप माहिती देण्याचे कौशल्य अगदीच सोपे आहे. परंतु माहिती दिल्यानंतर शेवटी भावनेच्या भरात मुलांना अपमानित करणारे शब्द टाळणे कठीण आहे. उदा. “मळलेले कपडे टाकण्यासाठी धुण्याची बादली असते. तू हे कधी शिकणार आहेस? ” आपण पालक म्हणून बोलताना हा भावनेचा भर जाणीवपूर्वकपणे थांबवायला शिकले पाहिजे.

“बागेत खेळून तू तुझा गणवेश खराब करशील किंवा फाडशील.”
असं बोलण्याऐवजी
“गणवेश शाळेसाठी आहे, स्लँक कपडे बागेत खेळण्यासाठी आहेत.”
असे बोलल्यास मुले आज्ञापालन करतात.
“नावे ठेवू नको, चिडवू नको, मूर्खासारखे वागू नको,”
असे म्हणणे टाळून
“नावे ठेवून चिडवल्याने भावना दुखावल्या जाऊ शकतात.”
असे बोलल्याने ऐकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमभाव तयार होतो.

आपल्या मुलांनादेखील एखाद्या गोष्टीची माहिती करून घेणे आवडते. पालक आपल्या क्षमतांवर विश्वास दाखवतात याचा त्यांना अनुभव येतो. त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे आपल्याला दिसते. वडीलधारी मंडळी आपल्याकडे जबाबदारी सोपवतात याचा परीणाम म्हणून मुलांचा आत्मगौरव व स्व:आदर वाढीस लागतो.

तू विरुध्द आपण:

तू विरुध्द आपण:
आपल्या मुलांकडून अनावधानाने काही चूक झाल्यास, आपण त्यांना ज्या पद्धतीने बोलतो व वागणूक देतो त्याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होतो. उदा. “तू दुध सांडलेस. तू बरणी फोडलीस. तू पायजामा फाडलास”.

हा “तू” शब्द आपल्या मुलांना आरोपी व अपराधी या भूमिकेत नेऊन ठेवतो आणि नंतर त्यांना बचावात्मक पद्धतीने वागण्यास भाग पाडतो. तू काय केले? हे बोलण्याऐवजी जेव्हा आपण घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करतो आणि “तू”ऐवजी “आपण व आपल्याला” हे शब्द वापरतो तेव्हा तो प्रसंग पचवणे मुलांसाठी सुलभ असते. आपण काय प्रसंग पाहत आहोत? आपल्या डोळ्यांना काय परिस्थिती दिसत आहे? त्याचे वर्णन करणे. तसेच आपली नेमकी समस्या काय आहे? आणि त्या समस्येला आपण कशा पद्धतीने सामोरे जायचे आहे? याचे वर्णन करणे. अशा वर्णन करण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला व आपल्या मुलांना त्या व तशाच प्रकारच्या इतर अनेक प्रसंगांना धीराने तोंड देणे सोपे जाते.

दोष देण्याची भाषा वापरण्यापेक्षा, वर्णनात्मक भाषा वापरण्याचा सर्वोत्तम फायदा म्हणजे आपण आपल्या मुलांकडे बोट दाखविणे आणि मुलांवर आरोप करणे सोडून देतो. त्या ठरावीक अडचणीत उपाययोजना म्हणून जे काही करणे आवश्यक आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो. उदा. “दूध सांडले आहे, तर आपल्याला हे पुसून घ्यायला मॉप हवा आहे.”
“बरणी फुटली आहे. आपल्याला काचा गोळा करण्यासाठी झाडू व सुफली लागेल.”
“हा पायजामा फाटला आहे. ते शिवण्यासाठी आपल्याला सुई आणि धागा हवा आहे.”
प्रत्येक विधानात आपण “आपण आणि आपल्याला” हे शब्द आवर्जून वापरले आहेत. फरक लक्षात घ्या, या शब्दांचा वापर करून आपण मुलांना जबाबदारी घेण्याच्या भूमिकेत नेतो; आरोपी, अपराधी व बचावात्मक भूमिकेपासून दूर.

निवड:

‘बळ देण्याची’ अथवा ‘बळी घेण्याची’ ताकद आजूबाजूच्या परिस्थितीत नसून आपण स्वतः स्विकारलेल्या ‘भूमिकेत’ व स्वेच्छेने केलेल्या ‘निवडीत’ आहे.