“कुणालाही सांगू नको,” असं म्हणून, आपल्याला काहीही सांगणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच तर खरे, त्याच्या खरेपणाबद्दलची खात्री नसते; मग आपण स्वतःही त्याची खात्री करून घ्यावी हेच बरे.
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
सल्लागार:
आपल्या मोठ्ठं होण्याच्या इच्छांना, गार करणारे सल्लागार, चार हात लांब ठेवलेले बरं.
जाहिरात स्वतःची:
जाहिरात स्वतःची:
आपण सगळेच ऐकतो आणि पाहतो की कुठल्याही वस्तूची “बनवण्याची किंमत” आणि “विकण्याची किंमत” यामध्ये खूपच अंतर असते. वस्तूची वाढीव किंमत ही बऱ्याच वेळा वस्तूच्या व सेवेच्या “क्वालिटी” बरोबरच, जाहिरातीवर बऱ्याच वेळा अवलंबून असते. जाहिरातीमध्ये ती वस्तू किंवा ती गोष्ट आपल्याला कशी फायद्याची आहे? कशाप्रकारे ती आपल्या या आनंदात भर टाकेल? कशी ती आपल्या जीवनाची प्रत सुधारेल? वस्तूचे कोण कोणते गुणधर्म आपल्याला फायद्याचे आहेत? याबद्दल कमीतकमी व प्रभावी शब्दांमध्ये सांगितलेले असते.
माणसाची गोष्टही अशीच असते. जन्मतः सर्व माणसांची किंमत सारखीच असते, परंतु त्यानंतर आपण स्वतः आपली स्वतःची किंमत काय ठरवतो आणि आपली स्वतःची जाहिरात आपल्याच मनपटलावर कशी बघतो आणि बाहेर कशी बोलतो व दाखवतो, यावर अवलंबून असते. आपण महत्त्वाची व्यक्ती आहोत, आपलं काम खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे, आपले विचार भव्य आणि दिव्य आहेत, उत्तम काम करण्याची क्षमता आपल्याकडे आहे, आपण केलेलं काम हे उत्तमच असणार आहे, आनंद व प्रगती यावर आपले श्रद्धा आहे, सुखसमाधान व यश आपल्याला मिळणारच आहे, आपण फक्त विकासाच्या गोष्टी बोलतो, कसल्याही समस्येला उत्तरं शोधण्याची माझ्याकडे क्षमता आहे, आपल्याकडे जबरदस्त प्रेरणाशक्ती आहे, इच्छा व स्वयंशिस्त या शक्तींचा वापर आपण नेहमीच करत असतो, आपण उत्साही असतो, आपल्या वागण्या-बोलण्यात नेहमीच आत्मविश्वास दिसतो, आपला पेहराव नेहमीच नीटनेटका व महत्त्वाच्या व्यक्तीसारखा असतो, आपण काल एक महान व्यक्ती होतो आणि आज आपण अधिक महान होणार आहे, उद्या आपण उत्तम, प्रेमपूर्ण व महान व्यक्ती होणार आहे, आपली बोलीभाषा व आपला संवाद नेहमीच एखाद्या यशस्वी आणि आदर्श व्यक्तीसारखा असतो, आपले विचार व मानसिकता ही नेहमी महत्त्वाच्या व यशस्वी व्यक्तीप्रमाणे असते, अशा प्रकारे स्वतःची जाहिरात करणारा आपली किंमत दिवसेंदिवस वाढवत असतो.
रोज रोज शेकडो वेळा अशी वाक्य स्वगत म्हणणारी माणसे, स्वतः स्वतःची किंमत वाढवत असतात. असे लोक स्वतःच्या चांगल्या गुणांची, जमेच्या बाजूंची, महत्वाच्या ताकदींची व श्रेष्ठ सवयींची एक सुंदर अशी जाहिरात बनवतात व वारंवार पाहत असतात. असे लोक इतरांकडून जास्त किंमत मिळवत असतात. आपल्याला जास्त किंमत मिळावी यासाठी आपण काय करू शकतो? असाच विचार ते करत असतात. एखाद्याने आपली किंमत कमी केल्यास, त्यावर काय मार्ग काढता येईल? असा प्रश्न ते स्वतःला विचारत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींची किंमत दिवसेंदिवस वाढतच जाते. म्हणून स्वतःची स्वतःच बनवलेली, एक सुंदर अशी जाहिरात आपण आपल्या दैनंदिन जीवनात वारंवार पहिली पाहिजे, बोलली पाहिजे, ऐकली पाहिजे व वागली पाहिजे. मग आपली किंमत दररोज, महिनोन् महिने आणि वर्षानुवर्षे वाढतच जाईल, तिचा आलेख नेहमी वरच्या दिशेनेच राहील, यात तीळमात्र शंका नाही.
मान:
दुसऱ्या व्यक्तीची मानहानी करून आपला मान वाढतो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे.
“प्रॅक्टिस मेक्स मॅन …… :
“प्रॅक्टिस मेक्स मॅन ……:
“प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट” या म्हणीने खूप लोकांच्या पदरी निराशा, विफलता व असमाधान टाकलेले आहे. या म्हणीच्या आहारी जाऊन आपण सराव, अभ्यास किंवा प्रॅक्टिस करताना परफेक्ट अथवा परिपूर्ण होणे, हे ध्येय ठेवतो. परंतु सराव, अभ्यास किंवा प्रॅक्टिस यांचा मूळ हेतू सुधारणा व विकास आहे. सुधारणा व विकास हा हेतू समोर ठेवून केलेला सराव किंवा अभ्यास आपल्याला उत्तम बनवण्यास मदत करतो. उत्तम बनत बनत आपण सर्वोत्तम बनण्याकडे वाटचाल सुरू करतो आणि एक दिवस खरोखरच सर्वोत्तम होऊन जातो. एवढा सराव, एवढा अभ्यास केल्यावर आपण अमुक अमुक या विषयात अमुक इतके उत्तम होऊ, असे अंदाज आपण करत जातो व पायरीपायरीने आपण उत्तमोत्तम बनण्याचा प्रयत्न करतो. मात्र परिपूर्ण होण्यामध्ये उत्तम होण्यापेक्षा, आपला स्वतःचा प्रथमच क्रमांक असावा असा आपला हट्ट राहतो. त्यामुळे आपण विकसित व उत्तम बनण्याच्या पाठीमागे न लागता प्रथम क्रमांक मिळवून स्वतःला परिपूर्ण सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागतो. सुधारण्यासाठी केलेला सराव आपल्याला समाधान आणि सफलता देतो, तर परिपूर्णतेसाठी केलेला सराव आपल्याला ताणतणाव आणि वैफल्य देतो. म्हणून “प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट,” असं म्हणण्याऐवजी “प्रॅक्टिस मेक्स मॅन बेटर अंँड बेटर,” असे म्हणावे. “बेटर” शब्दांमध्ये सुधारणा, विकास व उत्तमोत्तम होणे याला वाव आहे.
सहनशक्तीची परिक्षा:
सहनशक्तीची परिक्षा:
आपली गोड गोंडस मुलं ही आपल्या सहनशक्तीची दररोज परीक्षा घेतात. आपण कोणकोणत्या गोष्टी सहन करतो, आपण कोणकोणत्या गोष्टींच्या वेळी गप्प बसतो, आपण कोण कोणत्या गोष्टींकडे कानाडोळा करतो, आपण कोण कोणत्या गोष्टींना बिलकुलच किंमत देत नाही, आपण कोणकोणत्या गोष्टींबद्दल रागावतो किंवा घाबरतो हे सर्व मुले बारकाईने पहात व अनुभवत असतात. किती प्रमाणात राग? किती प्रमाणात भीती? आपण सहन करू शकतो याचा आपली मुलं दररोज अभ्यास करत असतात.
मुलं आपल्याला प्रश्न करतात, काही मागणी करतात, काही हट्ट करतात तेव्हा ते आपल्या मानसिकतेची व विचार पद्धतीची परीक्षा घेत असतात. यावेळी आपण त्यांच्याशी कशाप्रकारे वागतो आणि बोलतो हे ही मुलं निरीक्षण करत असतात आणि लक्षात ठेवत असतात. आपण कुठपर्यंत सहन करू शकतो, आपण किती पर्यंत वाकू शकतो, आपण किती पर्यंत ताणले जाऊ शकतो, याचाच आपली मुलं अंदाज घेत असतात. आपलं अवसान कुठपर्यंत टिकतं आणि कुठं संपून जातं, हे ही मुलं बारकाईने टिपत असतात.
आपण कोणकोणत्या गोष्टींना छान म्हणतो, चांगलं म्हणतो, अरे वा, मस्त, सुंदर असं म्हणतो, त्या गोष्टी मुले वारंवार करत राहतात. आपण कोणकोणत्या वाक्यांना, बोलण्याला हसून प्रतिसाद देतो, आपण कुठल्या वर्तनाला सहजवारी घेतो, आपण कोणकोणत्या वागण्याला सहन करतो कोणकोणते बोलणे आपण सहन करू शकतो, कीती थापा व खोटं बोलणं आपण सहन करतो हे पहात पहात मुलं आपलीच परिक्षा घेत असतात. नंतर येणाऱ्या प्रसंगांमध्ये आणि समस्यांमध्ये याच गोष्टींचा आपली मुलं संदर्भ म्हणून वापर करतात आणि त्याचा दाखलाही आपल्याला वारंवार देत असतात.
म्हणूनच आपण आपल्या मुलांना कोठपर्यंत सहन करू शकतो? हे अगोदरच आपले आपण ठरवून घेतले पाहिजे. अन्यथा समस्येच्या काळात आपण आपली सहनशक्ती कमी करून टाकतो व विफल होऊन मुलांकडे, त्यांच्या वागण्याबोलण्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अकारण, अवास्तव व अप्रस्तुत प्रतिक्रिया देतो. आपण मुलांना सहन करण्याची, प्रोत्साहित करण्याची व प्रेरणा देण्याची क्षमता व शक्ती वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील, प्रयोगशील व आशावादी रहायला शिकले पाहिजे. मगच आपण मुलांच्या सहनशक्तीच्या परिक्षेला खरे उतरू शकतो. या नात्यामध्ये येणाऱ्या ताणतणावावर आपण आनंदाने व खेळीमेळीने मात करू शकतो व हे नातं आपल्यासाठी आनंद, सुख व समाधान यांचा एक अविरत स्त्रोत बनून राहते.
दर्शन
आपल्याला जर आपल्या आतल्या परमेश्वराचे दर्शन घडले, तर इतरांनाही ते घडते.
इच्छापूर्ती- विश्वास व श्रद्धा:
इच्छापूर्ती- विश्वास व श्रद्धा:
एखादी गोष्ट करणे अशक्य आहे, असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा आपले मन, ही गोष्ट अशक्य का आहे? आणि अशक्य कशी आहे? यासंबंधीची कारणे व उदाहरणे आपल्या समोर प्रस्तुत करते व आपल्या वाक्याचे समर्थन करते. याउलट एखादी गोष्ट शक्य आहे, असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा तेच आपले मन ही गोष्ट शक्य का आहे? व शक्य कशी आहे? या संबंधीची कारणे व उदाहरणे आपल्यासमोर हजर करीत असते व आपल्या वाक्यांचे समर्थन करीत असते.
म्हणून मनाला काय वाटते याची चिंता करत बसण्याऐवजी आपल्याला काय वाटते याबद्दल विचार करावा. जर आपल्याला विश्वास आणि श्रद्धा असेल की आपण एखादी गोष्ट करू शकतो, तर आपलं मन आपला दोस्त बनून आपले विश्वास आणि श्रद्धा सिद्ध करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करते. म्हणून जर मनाला आपल्या बाजूने व आपल्यासाठी काम करायला लावायचे असेल तर आपले विश्वास आणि आपली श्रद्धा यावर नेहमी लक्ष ठेवले पाहिजे. आपण नेहमी हे का शक्य आहे? आणि हे कसे शक्य आहे? आणि हे शक्य करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? अशा प्रकारचे प्रश्न स्वतःला विचारत राहिले पाहिजे. आपले मन आपल्यासाठी या प्रश्नांची उत्तरे सोडवायला आपल्याला मदत व मार्गदर्शन करते.
आपल्या इच्छा या आपला विश्वास आणि श्रद्धा यामधुन जन्म घेत असतात. आपला स्वतःवर व स्वतःच्या विचारांवर विश्वास असेल आणि आपली स्वतःवर व स्वतःच्या क्षमतांवर श्रद्धा असेल तर आपल्या इच्छा आपण स्वतःच पूर्ण करू शकतो. अशा प्रकारचा विश्वास व श्रद्धा असल्याने आपण प्रयत्नवादी, जबाबदार व कृतीप्रधान बनतो. परंतु जर आपला स्वतःवर विश्वास नसेल आणि आपली स्वतःवर श्रद्धा नसेल तर आपण आपल्या इच्छा परमेश्वराने पूर्ण कराव्यात, नशिबाने पूर्ण व्हाव्यात, कोणीतरी इतरांनी पूर्ण कराव्यात, काहीतरी जादू व्हावी आणि त्या पूर्ण व्हाव्यात अशी स्वप्ने पाहत बसतो. अशा प्रकारच्या विश्वास व श्रद्धा यामुळे आपण ईश्वरवादी, स्वप्नाळू व निष्क्रिय बनत जातो.
म्हणून दैनंदिन जीवनामध्ये आपण आपले स्वतःचे विश्वास आणि आपल्या स्वतःच्या श्रद्धा नेहमी घासून-पुसून स्वच्छ करून ठेवल्या पाहिजेत. आपल्या विचारांमध्ये मी माझं काम, माझा अभ्यास, माझी ड्युटी, चांगल्या प्रकारे करू शकतो. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, मानसिक व आर्थिक गरजा पूर्ण करणे आपल्याला शक्य आहे, असा विश्वास व श्रद्धा बाळगली पाहिजे. माझ्या जीवनामध्ये आनंदी राहणे, प्रेमळ, क्षमाशील व दयावान रहाणे शक्य आहे, मनशांती मिळवणे शक्य आहे, असा विश्वास बाळगला पाहिजे. त्याचबरोबर सुखी, समाधानी, आनंदी जीवन जगण्याची क्षमता माझ्याकडे आहे, अशी श्रद्धा आपली बाळगली पाहिजे. आपण दररोज आपल्या विचारांना घासूनपुसून सकारात्मक आणि विश्वास व श्रद्धा यांच्या कसोटीला उतरणारे अशा रूपांमध्ये बदलून घेतले पाहिजे. असे केल्यास आपले मन आपल्या बाजूने व आपल्यासाठी काम करायला लागेल व आपल्याला जे जे वाटतं व आपल्या ज्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यासाठी अहोरात्र कामाला लागेल. आपलं मन आपला सर्वात चांगला दोस्त व इच्छापूर्ती कल्पवृक्ष बनेल.
मन: छोटे मोठे
“याबद्दल आपल्याला काय वाटतं? या समस्येबद्दल आपण काय सुचवाल? या परिस्थितीत आपण काय कराल? मी हा घेतलेला निर्णय आपल्याला कसा वाटतो? या सुचने बद्दल तुम्हाला काय वाटतं?” असे प्रश्न विचारणे आणि त्यांची उत्तरे मनापासून ऐकून घेणे व त्यावर विचार करणे हे मोठ्या मनाचे लक्षण आहे. याविरुद्ध, “मी म्हणतो तेच खरे!” असा दुराग्रह करणे आणि “माझीच कल्पना सर्वोत्तम!” असा आव आणणे, हे कोत्या व छोट्या मनाचं लक्षण आहे.
एक स्व:प्रश्न- तंटामुक्तीसाठी:
एक स्व:प्रश्न- तंटामुक्तीसाठी:
छोट्या छोट्या आणि क्षुल्लक गोष्टींवरून खूप लोक वाद घालतात व भांडणही करतात. जर एखादी गोष्ट छोटी आणि क्षुल्लक असेल तर त्यावरून वाद व भांडण होणार नाही. वाद, भांडण व ताणतणाव यांचे कारण बनू शकणारी गोष्ट ही छोटी अथवा क्षुल्लक असू शकणार नाही. म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपण वाद घालतो, टेन्शन घेतो, भांडण करतो किंवा अतीविचार करतो त्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात. आता आपल्या दैनंदिन जीवनात कोणकोणत्या गोष्टींवरून आपण वाद घालतो किंवा भांडणं करतो त्याची एक यादी बनवूया. ही आपली यादी नंबर एक.
आपल्याला आपल्या वैयक्तिक, वैवाहिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनात खरोखरच काय काय हवे आहे? आपल्या आदर्श आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत? आपल्या आयुष्यात आपली स्वप्ने, आकांक्षा, ध्येये व उद्दिष्टे कोणकोणती आहेत? या प्रश्नांची उत्तरे शांतपणे शोधूया व त्याचीही एक यादी बनवून लिहून ठेऊया. ही आपली यादी नंबर दोन.
या दोन्ही याद्या बनवताना कमीत कमी सहा महिने कालावधीचा विचार व्हायला हवा. यानंतर या याद्या शेजारी शेजारी ठेवूया. या दोन याद्यांमध्ये समान असणाऱ्या गोष्टी एका स्वतंत्र पानावर लिहून काढूया. या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि आपण त्यासाठी आग्रही आहोत व आपले मतं मांडतो ही चांगली गोष्ट आहे. परंतु जर आपण वाद घालत असेल आणि भांडणं करत असेल तर मात्र आपल्याला नक्की कुठली गोष्ट महत्त्वाची आहे हे ठरवणं गरजेचं आहे. यासाठी पुन्हा एकदा यादी नंबर एक बनवूया.
यादी नंबर एकमधील ज्या गोष्टींचा समावेश आपण कधीही यादी नंबर दोनमध्ये करणार नाही त्या गोष्टी स्वतंत्र पानावर लिहून काढूया. या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत परंतु तरीही आपण यावरून वाद घालत असतो व भांडणं करत असतो. आता जर आपल्याला हे समजले आहे की ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाचीच नाही तर मग वाद घालण्याचा प्रश्नच तयार होत नाही. एकदा ही गोष्ट आपल्या लक्षात आली की यापुढे कधीही वाद घालण्याचा किंवा भांडण करण्याचा प्रसंग आपल्यासमोर आल्यास, स्वतःलाच प्रामाणिकपणे प्रश्न विचारू की, ही जी गोष्ट मी बोलतोय किंवा करतोय ती खरोखरच महत्त्वाची आहे काय?
आश्चर्य म्हणजे नव्वद टक्के वेळा ही वाद व भाडणं होणारी गोष्ट महत्वाची नसते. अर्थात क्षुल्लक अथवा एकदम छोटीशी असते आणि ती गोष्ट न केल्यामुळे आपल्या वर्तमानावर किंवा भविष्यावर काहीही परिणाम होणार नसतो. असा एक प्रश्न विचारल्यामुळे आपली नव्वद टक्के वाद व भांडणं टाळली जातील. अर्थात आपण 90% ताणतणाव मुक्त होऊन जाऊ. म्हणून हा एक छोटासा प्रश्न वाद होण्याच्या प्रसंगाअगोदर स्वतःला नेहमीच विचारावा, ही गोष्ट, ही उक्ती, ही कृती करणं माझ्यासाठी खरोखरच महत्त्वाची आहे काय?