वैफल्य स्विकार व पालक बालक नातेसंबंध:

वैफल्य स्विकार व पालक बालक नातेसंबंध:
मुलांची मनस्थिती जेव्हा निराश, नाराज व वैफल्यग्रस्त होते, तेव्हा त्यांना मदत करण्याचे काही कौशल्य पालकांजवळ असणे गरजेचे आहे. यातील सर्वात पहिले कौशल्य म्हणजे पालकांनी हे समजून घेणे की मुलांचे वैफल्य, नाराजी व दुःख याला आपण पालक जबाबदार नाही. त्याचबरोबर मुलांची वैफल्यग्रस्तता, नाराजी व चिंता आपण वैयक्तिकरित्या घेऊ नये व ती आपल्यामुळेच आहे असे समजून स्वतःला वाईट पालक म्हणून नावे ठेऊ नयेत. त्यांच्या चिंता, काळज्या व दु:खे आपल्या स्वतःकडे ओढून घेण्याची व त्यांत आकंठ बुडून जाण्याची बिलकुलच गरज नाही. अर्थात मुलांबरोबरच आपणही दु:खी, विफल व नाराज होण्याची बिलकुल गरज नाही. मुलांना त्यांचं त्यांचं स्वतःचं विकसनशील असं मन आहे आणि ते त्यांचा आनंद, दुःख, वैफल्य, निराशा किंवा चिंता ते स्वतःच स्वतःच्या मनाच्या सहाय्याने बनवत असतात व पचवायलासुद्धा शिकत असतात.

प्रत्येक स्थळी, प्रत्येक वेळी, प्रत्येक काळी आपली मुले हसरी व आनंदी असावीत, अशा अपेक्षेच्या ओझ्याखाली पालक चिरडले जातात. मुले नेहमीच आनंदी व हसतमुख नसल्यास त्याची कारणे ते स्वतःची एक पालक म्हणून लायकी, किंमत व क्षमता यांमध्ये शोधत बसतात. ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास व या अपेक्षेला खरे न उतरल्यास पालक स्वतःवरच दबाव आणतात व स्वतःसाठी ताणतणावाचे एक कारण तयार करून ठेवतात. या पालकांवरील दबावामुळे पालक आणि बालक या नात्यातच दबाव आणि ताण तयार होतो. म्हणून निरोगी बालक पालक नातेसंबंधासाठी, बालकाच्या आनंदाची व हसतमुख राहण्याची जबाबदारी बऱ्याच घटकावर अवलंबून असते, फक्त पालकांच्या पालकत्वावर, प्रेमावर व वातावरणावर नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. अशामुळे मुलांच्या आनंदाची चिंता व काळजी करण्याच्या नादात बालक व पालक या नात्याकडे दुर्लक्ष होते व नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

नेहमी आनंदी व हसतमुख राहिले पाहिजे, ही पालकांची अपेक्षा व हट्ट मुलांसाठीही अप्रत्यक्षपणे ओझे ठरू शकते. “काय झाले रडायला. तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो हीच का आमची चूक आहे. एवढ्या सगळ्या सुविधा असताना तू नाराज आणि निराश होऊन कसा शकतो. एवढ्या भरल्या घरात तुला काय कमी आहे. कशाची कशाची कमी नाही, चिंता कशाला करतो. खाऊन पिऊन हे काय तुझं नाटक. त्या शेजार्‍यांच्या मुलांना बघ काही सुविधा नाहीत तरी तो खुश आहे, तुला काय झालं रूसायला. जे जे तुला हवे आहे तेथे सर्व आम्ही देतो, मग तू आनंदी नको का रहायला.” अशा प्रतिक्रिया बालक पालक नात्यांमध्ये दऱ्या तयार करीत असतात.

आता असाही विचार करा की, आपली मुले त्यांच्या मूळ समस्येबद्दल नाराज व दु:खी असतात. त्या मुलांना त्यांच्या मूळ समस्येबद्दल त्यांना मदत करण्याची व त्यातून बाहेर काढण्याची पालकांची मनापासूनची इच्छा असते. आपल्या पालकांना आनंदी व हसतमुख ठेवणे ही मुलांची जबाबदारी आहे, असंही आपल्या मुलांनी कुठेतरी ऐकलेलं असतं. आता ही अपेक्षा ते स्वतःवर लादून घेतात आणि आपल्या आई-वडिलांना आपण खूश व आनंदी ठेऊ शकत नाही, याबद्दल ते स्वतःला अपराधी समजायला लागतात. आपली आई नाराज आहे आहे, आपले बाबा वैफल्यग्रस्त आहेत, आपले पालक आपल्याबद्दल खुश व आनंदी नाही आहेत, असं समजल्यावर मुले आणखी जास्त नाराज, निराश, विफल व वैफल्यग्रस्त होतात. मग मुलांमध्ये ताणाची आणि वैफल्याची मूळ भावना व पालकांच्या अपेक्षाभंगातून येणारी अपराधीपणाची भावना यांच्या बेरजा होत जातात. ही गोळाबेरीज मूळ भावनांपेक्षा खूपच जास्त असते व या एकत्रित भावनांचे वेगळेपण पाहणे व अनुभवणे कठीण होत जाते. अर्थात, सर्व वेळ मुले आनंदी व हसतमुख नसल्याबद्दल ताणतणाव येणे, ही गोष्ट पालकांसाठी, मुलांसाठी व बालक पालक नात्यासाठी घातकच आहे.

म्हणून पालकांनी आपल्या बोलण्यातून व वागण्यातून मुलांना हे समजावून देणे गरजेचे आहे की नेहमी आनंदी आणि हसतमुख असणे चांगले आहे, परंतु तसेच असले पाहिजे असा हट्ट व आग्रह मात्र नाही. नाराज होणे, रडणे, रुसणेफुगणे, निराश होणे, वैफल्यग्रस्त होणे, चिंताग्रस्त होणे हा मुलांचा नैसर्गिक हक्क आहे आणि तो पालकांनी त्यांच्यापासून हिरावून नाही घेतला पाहिजे. ते त्यांचे नैसर्गिक व अपरिहार्य स्वरूप आहे, त्याचा स्वीकार व्हायला हवा, त्यासाठी पालकांनी त्यांना किंवा स्वतःला त्याबद्दल दोष नको द्यायला. मुले रडताना, नाराज, निराश, वैफल्यग्रस्त असतानासुद्धा, जशी आहेत तशी स्वीकारली जाऊ शकतात. त्याबद्दल मुलांचा स्वतःचा कुठलाही दोष नाही, त्याच बरोबर हा दोष पालकांचाही नाही व त्यांनी तो दोष स्वतःला लावून नाही घेतला पाहिजे. पालकांनी त्या प्रसंगांमध्ये मुलांच्या बरोबर राहून त्यांना आधार देण्याचे काम करणे गरजेचे आहे, दोषारोप करण्याचे नव्हे.

पालक आपल्या मुलांच्या दुःखी भावना दूर करण्याचा जितका जास्त प्रयत्न करतात, तितकीच अधिक ती त्या भावनांमध्ये अडकत जातात. पालक जितक्या अधिक आरामात व सहजपणे वाईट भावना स्वीकारू शकतात, तितक्याच आरामात व सहज मुलांना त्या भावना स्वीकारणे, आपल्याशा करणे, पचवणे व सोडून देणे सोपे होऊन जाते. अर्थात जर आपल्याला कुटुंबातील मुले सुखी व आनंदी हवी असतील तर आपण पालकांनी त्यांची सारी दुःखे बोलायला व व्यक्त करायला खुल्या मनाने परवानगी द्यावी. त्यांना त्यांच्या निराशा, चिंता, वैफल्य, रुसवे फुगवे, यांसोबत रहायला वेळ देणे व यादरम्यान पालकांनी त्यांना निस्वार्थ साथ, साद, आधार व प्रेम देणे गरजेचे आहे. जेणेकरून आपली मुले ताणतणावात व नकारात्मक भावनांचे सोबत असतानासुद्धा उत्तमोत्तम व योग्य असेच निर्णय घ्यायला व वर्तन करायला शिकत जातील.

“या भावना व्यक्त करणे खरोखरच खूप कठीण आहे.” असं पालकांनी समजूतदारपणे व सहानुभूतीने म्हटल्यावर मुलांना आपल्या भावभावना शब्दांत व्यक्त करण्याची ताकद व प्रोत्साहन मिळते. यानंतर पालकांनी आपल्या मुलांनी आतापर्यंत बोललेल्या व केलेल्या सर्वोत्तम, छानछान व यथायोग्य गोष्टी व प्रसंग एकेक करून आठवण करून द्यायला सुरुवात करावी. मुलांनाही त्यांनी केलेल्या चांगल्या व सकारात्मक प्रसंगांची आठवण करायला व त्या सविस्तर वर्णन करून सांगायला प्रोत्साहन द्यावे.

आपल्या मुलांच्या मागण्या जर काल्पनिक असतील व आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या असतील, तर कल्पनेमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची पालकांनी तयारी दाखवणे गरजेचे आहे. “माझी सुद्धा इच्छा आहे की तुला हे मिळावे. मला वाटतं हे तुला मिळालं असतं तर कीती मज्जा आली असती. मला वाटतं हे तर खूपच छान होईल. तुला हे सर्व मिळावं हेच माझं सुद्धा स्वप्न आहे.” असं कल्पनेमध्ये आपल्या मुलांच्या काही इच्छा पूर्ण करणे, हाही त्यांच्या ताणतणावाच्या भावनांवर एक प्रभावी उत्तर असू शकते.

पेन्सिल आणि कागद मुलांच्या हातात देऊन त्यांच्या भावभावना चित्ररूपात, रेषारूपात व शब्दांमध्ये व्यक्त करण्यास पालकांनी मुलांना प्रोत्साहन देत रहावे. त्यांच्या आवडीच्या वस्तू, खरेदीची यादी, स्वप्नांची यादी, फिरायला जायच्या ठिकाणांची यादी, इच्छा व आकांक्षांची यादी इत्यादी लिहून काढण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे. याचा अर्थ असा नाही की पालकांना कोणतीही गोष्ट खरेदी करावी लागेल किंवा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्याच लागतील. याचा अर्थ असा होतो की आपल्या मुलांना जे काही आवडते व जे काही आवडत नाही त्याबद्दल पालकांना माहिती आहे, आदर आहे व पुरेशी काळजीही आहे.

दात किंवा चणे:

दात किंवा चणे:
लोक जेव्हा प्रचंड काबाडकष्ट करतात व हाता पायांनी कष्ट उपसतात त्यावेळी त्यांचे मन त्यांच्या हातात राहते आणि मनस्थिती शांत आणि बिनधास्त असते. परंतु नंतरच्या काळात आर्थिक विकासानंतर व सर्वकाही स्थिरस्थावर झाल्यानंतर जेव्हा ते काबाडकष्ट करायचे थांबवतात, त्यांच्या हातातले काम दूर जाते व त्यांनी हातपाय हलवायचे सोडून दिलेले असते तेव्हा त्यांचे मन अशांत, अस्वस्थ, सैरभैर व धास्तावलेले होते. त्यांचे मन त्यांच्या हातात राहत नाही तर त्यांच्यावरच सत्ता गाजवायला लागते. अविकसित व अप्रशिक्षित मन व्यक्तीला संपत्ती व वस्तू यांचा यथायोग्य उपभोग घेऊ देत नाही. भरल्या घरातही असे मन व्यक्तीला आनंद, सुख व समाधान या गोष्टींपासून वंचित ठेवायला लागते. “दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत” अशी माणसाची अवस्था होऊन जाते.

अशा लोकांना प्रश्न पडतो की जेव्हा आपण कष्टात होतो तेव्हा ठणठणीत होतो. आपलं जीवन अतिशय समस्यामय व व्यस्त होते तेव्हा आपली मनस्थिती शांत आणि समाधानी होती. जेव्हा आपल्याला दररोजच्या चिंता व व्यथा होत्या तेव्हा आपलं शरीर निरोगी व व्याधीमुक्त होतं. परंतु आज आपल्याला खाण्यापिण्याची, पैशांची, कपड्यांची, गाड्यांची, घरादाराची आणि उद्याची कसलीही समस्या व व्यथा नाही, तरीही आपलं मन व मनस्थिती शांत, समाधानी व निवांत का बरे नाही?

या प्रश्नाचे उत्तर खूपच साधे व सोपे आहे, आपण आर्थिक विकासासाठी खूप सारी ध्येये ठरवतो व ती मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो. आपण आपल्या मनाच्या मानसिक व वैचारिक स्वास्थ्यासाठी दररोज किती ध्येये व स्वप्ने ठरवतो? व ती मिळवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो? दैनंदिन जीवनात आपण आपल्या स्वतःच्या मनाला जाणून घेण्यासाठी व स्वतःच्या मनाच्या विकासासाठी काय काय प्रयत्न करतो? हे प्रश्न स्वतःला दररोज विचारले पाहिजेत.

आर्थिक व सामाजिक विकासाबरोबरच आपल्या मानसिक व वैचारिक विकासामध्ये आपण आपले योगदान दिले पाहिजे. मानसिक व वैचारिक विकास कसा करता येईल? आपले स्वभावातील कच्चे दुवे कोणते? त्यांच्यावर मात कशी करता येईल? आपली आवडती व ताकदीची मानसिक कौशल्ये व क्षेत्रे कोणती? ही कौशल्ये व क्षेत्रे कशी विकसित करता येतील? ह्या सर्व प्रश्नांची योग्य व समाधानकारक उत्तरे शोधून त्यावर जीवनभर काम करीत राहिले पाहिजे. अन्यथा काही वर्षांनंतर वरील दातांचा व चण्यांचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला नाही, तर आश्चर्य.

स्मरणपेढी व चांगले विचार:

स्मरणपेढी व चांगले विचार:
आपण नेहमी म्हणतो की माणसाने चांगला व सकारात्मक विचार करावा. परंतु चांगला विचार म्हणजे नेमके काय?

चांगले विचार म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये लाभलेल्या भेटलेल्या गोष्टींबद्दल व यशाबद्दल समाधान मानणारे विचार. आपल्याला न भेटलेल्या आणि अपयश आलेल्या गोष्टींमधून बोध देणारे विचार. आपल्याला मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, मुलं, पती किंवा पत्नी, आईवडील, शेजारी-पाजारी यासारखे सर्व लोक भेटले आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे विचार. आपल्याला रोज भेटणार्‍या लोकांबद्दल कृतज्ञता व समाधान मानणारे विचार. आपल्या मुलांनी, पत्नीने, पतीने आणि आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या कामांबद्दल धन्यवाद भाव व्यक्त करणारे विचार.

आपल्या सहकाऱ्यांनी व मित्रांनी आपल्यासाठी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व धन्यवाद मानणारे विचार म्हणजे चांगले विचार. कोणाकडून काहीही चूक झाली असता माफी करून टाकण्याचे व ती गोष्ट विसरून जाण्याचे व सोडून देण्याचे विचार. आपली कंपनी व बॉस यांच्याबद्दल व त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना कृतज्ञता व धन्यवाद भाव व्यक्त करणारे विचार म्हणजे चांगले विचार.

नातेसंबंधांबद्दल, नातेवाईकांबद्दल व नातेसंबंधांमधील चांगल्या प्रसंगांबद्दल आभार, धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त करणारे विचार. एखाद्या व्यक्ती मधील चांगले गुण पाहणारे, दाखवणारे व त्याबद्दल बोलणारे विचार. तसेच एखाद्या व्यक्तीच्या गुणांबद्दल, चांगल्या कार्याबद्दल व कौशल्याबद्दल त्यांचे गुणगान व कौतुक करणारे विचार म्हणजे चांगले विचार. दररोजच्या प्रसंगांमध्ये, गोष्टींमध्ये, व्यक्तींमध्ये व संकटांमध्ये चांगल्या गोष्टी नजरेस पाडणारे व त्यावर लक्ष केंद्रित करायला लावणारे विचार. छोटे छोटे विजय, छोटे छोटे आनंद व छोट्या छोट्या सिद्धी यांवर लक्ष केंद्रित करणारे, त्या स्मरणात ठेवणारे व त्या वारंवार आठवणारे विचार. आपण पाहू शकतो, बोलू शकतो व चालू शकतो त्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवणारे विचार. आपण जिवंत आहोत याबद्दल आनंद व्यक्त करणारे व धन्यवादभाव ठेवणारे विचार. ज्या गोष्टींमुळे आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी स्मरणपेढीत जपून ठेवणारे व त्या गोष्टी वारंवार आठवणीत आणणारे विचार म्हणजे चांगले विचार.

आपल्या अचाट स्मरणशक्तीमुळे आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेऊ शकतो. ही स्मरणशक्ती आपल्यासाठी शाप किंवा वरदान दोन्हीही ठरू शकते. ही स्मरणशक्ती आपल्यासाठी वरदान ठरावी आणि आपल्या आनंदाचा, सुखाचा व समाधानाचा प्रवाही व कधीही न आटणारा झरा व स्त्रोत बनावी यासाठी आपण त्यामध्ये चांगले विचार भरले पाहिजेत, साठवले पाहिजेत आणि त्यातून वारंवार चांगलेच विचार बाहेर काढले व वापरले पाहिजेत. आपल्या स्मरणपेढीमध्ये आपण नेहमी चांगले विचार ठासून भरून ठेवले पाहिजेत व सुरक्षितपणे साठवून ठेवले पाहिजेत. या स्मरणपेढीमध्ये चांगल्या विचारांचा आपण नेहमी भरणा करत राहिलं पाहिजे. जेणेकरून चांगल्या विचारांनी भरलेली ही स्मरणपेढी नेहमीच आपल्यासाठी आपल्या आनंदाचा, सुखाचा व समाधानाचा अखंड स्त्रोत बनेल.

मोकळे व मोठ्ठे मन:

मोकळे व मोठ्ठे मन:
ज्या गोष्टी अगोदरपासूनच आपल्या मनात असतात, त्याच गोष्टी किंवा त्याच्याशी समरूप गोष्टी आपण मनावर घेतो. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी, व्यक्ती व प्रसंग यांनी आपल्याला काहीही फरक पडत नाही. याऊलट अशाही अनेक गोष्टी असतात ज्यामुळे आपल्याला फरक पडतो. ज्या गोष्टींनी आपल्याला फरक पडतो त्या गोष्टी आपली कमजोरी असतात, तर ज्यांनी आपल्याला काहीच फरक पडत नाही त्या गोष्टी आपली ताकद व क्षमता बनतात.

अर्थात दैनंदिन जीवनात आपण कोणकोणत्या गोष्टी मनावर घेतो व कोणत्या गोष्टींनी आपल्याला काहीच फरक पडत नाही, याची जर आपण एक यादी तयार केली तर आपल्या मनाचं एक कार्यकारी मूर्त रूप आपल्यासमोर तयार होईल. मनाचं हे रूप आपण आपल्याला हव्या असणाऱ्या चांगल्या व आदर्श मनाच्या रूपासमोर ठेवून, त्यांची तुलना करू शकतो. यातून कोणत्या गोष्टी मनात असाव्यात आणि कोणत्या विकसित कराव्यात व कोणत्या गोष्टींना मनात थारा नसावा व कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, याचा आपल्याला अंदाज येतो. यातून कोणकोणत्या गोष्टींवर आपण तडकाफडकी निर्णय घ्यावा आणि कधी व कुठे शांतपणे, विचारपूर्वक, चिंतनमनन व कौटुंबिक खलबत करून निर्णय घ्यावा, याचा एक आलेख आपल्यासमोर तयार होईल. कोणकोणत्या गोष्टी अथवा प्रसंग आपल्यासाठी अतिसंवेदनशील, स्फोटक व आणीबाणीच्या असतील व कोणत्या प्रकारचे प्रसंग आपल्याला असंवेदनशील व चेतनाहीन बनवू शकतात, याचाही अंदाज येईल.

कोणकोणत्या गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर मनाला लावून घेऊ शकतो व कोणत्या गोष्टी आपण व्यक्तीगत बनवून एखाद्याला दोष देऊ शकतो, याचा ढोबळ मानाने एक अंदाज येईल. दैनंदिन जीवनातील कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी व प्रसंग आपल्या मनाला रक्तबंबाळ करतील व द्वेष, मत्सर आणि क्रोध या नकारात्मक भावनांना जन्म देतील, याचाही अंदाज करता येईल. मनात असलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी मनातून वेचून बाहेर काढण्याचे काम लवकरात लवकर सुरू करता येईल. असे केल्याने आपले मन मोकळे व रिकामे होईल. कोणतीही गोष्ट, प्रसंग व व्यक्ती आपल्याला आपल्या मनात आणीबाणी व संकट जाहीर करायला भाग पाडणार नाही. आपण मनमोकळे होत जाऊ व आपल्या मनात ज्या गोष्टींनी आपल्याला काहीच फरक पडत नाही त्यांसाठीसुद्धा जागा तयार होईल. ज्या गोष्टी आपल्याला निरर्थक वाटत होत्या, त्यांमधील संवेदनशील बाजू आपल्या निदर्शनास येईल. अर्थात आपल्या मनाच्या व मनोभूमीच्या सीमा व क्षितिज विस्तारित होईल. आपण मोठ्या मनाचे व्यक्ती म्हणून उदयास येईल.

संकटकालीन प्रसाद:

संकटकालीन प्रसाद:

आपल्या स्वतःच्या भावनिक वादळांशी व संकटांशी लढत असताना, आपले मित्र, कुटुंबीय व नातलग आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी मदत करण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनी दिलेले प्रतिसाद कधी आपल्याला आश्वस्थ करतात तर कधी अस्वस्थ. कुटुंबातील लोकांनी दिलेले प्रतिसाद कधी कडवट, तिरस्कारयुक्त, तणावकारक व नकोनकोसे वाटतात तर कधी हवाहवासा प्रसाद वाटतात. मित्रांनी व कुटुंबीयांनी दिलेल्या कोणत्याही प्रतिक्रिया अयोग्य किंवा चुकीच्या नसतात. ज्या प्रतिक्रिया आपणास योग्य, समजून घेणाऱ्या, स्विकारल्या जाणाऱ्या व प्रासंगिक वाटतात त्याच आपल्याला आधार देतात व आपल्यासाठी योग्य असतात.

“इतके अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही. तसे वाटणे मूर्खपणाचे आहे. तू संपूर्ण गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त फुलवून सांगत आहेस. हे तुला जितके वाईट वाटत आहे तितके वाईट असू शकत नाही. चल हस जरा, तू हसताना खूप छान दिसतोस.” इत्यादी प्रकारच्या प्रतिक्रियेत आपल्या भावनाच नाकारल्या जातात. आपलं अस्तित्व म्हणजे आपलं भावविश्व असतं, त्यामुळे आपल्या भावना नाकारल्यामुळे आपल्याला आधार वाटण्याऐवजी अस्वस्थ वाटते.

“हे बघ, जीवन हे तसेच असते.
आयुष्यात आपल्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत. टप्प्याटप्प्याने या गोष्टी शिकूण घेणे हेच तुझ्या हातात आहे. या जगात काहीही परिपूर्ण नाही. अपयशातून आपल्याला शिकायचे असते. मोठ्या लोकांची चरीत्रांतून बोध घे.” इत्यादी प्रतिक्रियांना दार्शनिक किंवा तात्विक प्रतिसाद म्हणतात. भावनिक वादळात असताना कसलीही तात्विक चर्चा आपल्याला नको असते. भावनिक वादळं चालू असताना तर्क व सामान्यज्ञान यांपेक्षा भावनिक नियोजनाला प्रथम प्राधान्य असते. आपल्याला हे तर्क व ज्ञान अगोदर माहिती असतात, आपल्याला तर्कही करता येत असतात. आपण स्वतःला तार्किक, माहितगार व ज्ञानी माणूस समजत असतो, परंतु संकटकाळी आपले रूपांतर भावनिक माणसात होते. आपली भावना अतार्किक ठरवली गेल्याने आपण चिडतो व मनमोकळा संवाद साधला जात नाही. आपल्याला तर्कहीन ठरवणाऱ्या व्यक्तीची मदत आपल्याला नकोशी वाटते.

“मला वाटते तू असे करावे, मला वाटते तू बॉसची मदत घ्यावी, सरळ तुझ्या बॉसची माफी माग, तुझी चूक मान्य कर, तू दुर्लक्षित केलेली कामे पूर्ण कर, असं पुन्हा कधी घडणार नाही हे लक्षात ठेव. नोकरी सोडून दे. घटस्फोट दे. त्याला चांगला धडा शिकव.” इत्यादी प्रतिक्रिया सल्ला व मार्गदर्शन या सदरात मोडतात. भावनिक वादळात आपल्याला सल्ला,व्याख्यान व प्रवचन दिल्यास आपली चिडचिड व गोंधळ होऊ शकतो.

“नेमकं काय संकट आहे? ही वेळ आलीच कशी? तू काळजी का घेतली नाहीस? कसं काय विसरलास तू? तू त्याला त्वरित का भेटला नाहीस? त्याचा मूड तुला कसा समजला नाही? हे यापूर्वी कधी घडले आहे का? तू माफी का मागीतली नाही? तू पुन्हा समजावून सांगायचा प्रयत्न का केला नाही?” इत्यादी प्रतिक्रिया प्रश्न विचारणे या प्रकारच्या असतात. यामुळे आपल्या क्षमतेवर व अकलेवर अविश्वास दाखवला जात असल्याची भावना होते व आपली हताशा वाढत जाते.

“मी तुझ्या भावना समजू शकतो.
लोकांच्या प्रतिक्रिया अशाच असतात. त्याला खूप टेंशन असणार. तू भाग्यवान आहेस की तुला रोज झाप मिळत नाही, माझी अवस्था तुझ्यासारखीच आहे.” इत्यादी प्रतिक्रिया मित्राच्या मनातील समान भावनांच्या विरोधी प्रकटीकरण असतं. अशा वेळी आपल्या भावनांचं सामायिकीकरण होतं व आपल्याला समजून घेतले जात नाही व आपली चेष्टा केली जात आहे, असे वाटत रहाते.

“अरेरे वाईट गोष्ट. ते खूप भयंकर आहे. मला फार वाईट वाटत आहे. बापरे ते कीती भयंकर आहे. रडवलंस की मला. खूपच अपमानास्पद. बिच्चारा, केवढा कमनशिबी.” अशा दया व करूणा दाखविणाऱ्या प्रतिक्रिया आपल्याला अजूनच असहाय बनवतात.

“तू अस्वस्थ आहेस याचे खरे कारण आहे की तुला प्रत्येक माणसात तुझे वरचष्मा करणारे वडिल दिसतात.
लहान असताना कदाचित तू निंदेची काळजी करणारा होतास, म्हणून कोणी निंदा केल्यास, तुझी ती भीती परत उफाळून येत असते.” इत्यादी प्रकारच्या प्रतिक्रियांना मनोविश्लेषण म्हणतात. यामुळे आपल्या मनात गोंधळ व अपराधी भावना निर्माण होतात.

“मला वाटते हा एक खडतर अनुभव असावा. तुझी चूक नसताना, इतर लोकांसमोर झाप ऐकायला कठीण वाटले असेल. एवढ्या दबावानंतर, अजून ताण घेणे, फारच कठीण झाले असावे. एवढे कष्ट करूनही अपयश समोर येणे, हा वाईट अनुभव असावा. तुझी समस्या ऐकून व समजून घेतली नाही, हे निराशाजनक असणार. जवळच्या लोकांनी विश्वास न ठेवणे, वेदनादायक असावे. कुटुंबातील सदस्य समजून घेत नाहीत, हा अनुभव दुखदायक असणार.” इत्यादी प्रतिक्रिया सहअनुभूति व सहवेदना या प्रकारच्या असतात. यामध्ये आपला मित्र व नातलग आपल्या भाव भावनांशी ताळमेळ करण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असतो. आपल्या भावना सामान्य, सहज, नैसर्गिक व स्वीकारार्ह आहेत, ही भावना आपल्या दुखी मनावरील फुंकर असते. आपल्या भावना अपरिहार्य असल्या तरी लवकरच त्या निघून जातात हा संदेश आपणास मिळतो. या कठीण काळात आपलं ऐकणारं, आपल्याला समजून घेणारं व आपल्याला सोबत व साथ देणारं कोणी तरी आहे, हे समजल्यावर आपण आपल्या समस्येवर धैर्याने मात करू शकतो.

म्हणूनच सहअनुभूती किंवा इम्पॅथेटीक अशा प्रकारची प्रतिक्रिया व प्रतिसाद हा भावनिक संकटकाळात, आपण आपले मित्र, कुटुंबीय, नातेवाईक व सहकारी यांना आधार म्हणून देऊ शकू असा सर्वोत्तम प्रसाद आहे.

पालकत्व व भावनिक समस्या:

पालकत्व व भावनिक समस्या:
पालकांना काय काय समस्या असतात? का असतात? व त्या कशा सोडवाव्यात? या प्रश्नांची उत्तरे काही पालक हसण्यावारी नेतात. पण जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांसोबत समस्या निर्माण होतात तेव्हा त्यांच्या नम्रतेची व संयमाची कसोटी लागते.

एक पालक म्हणून, प्रत्येक दिवशी सकाळी आपण स्वतःला म्हणू की, आजचा दिवस वेगळा व चांगला असेल. परंतु आपली मुले तोही दिवस इतर नेहमीच्या दिवसासारखा करून टाकतात. “तुम्ही तीला माझ्यापेक्षा जास्त दिले!” “मला दुसरा कप हवा आहे. ” ” ही भाजी कीती खराब आहे.” “त्याने मला मारले.” “मला ती अजिबात आवडत नाही!” या दररोजच्या भावनिक तक्रारी पालकांसाठी एक आव्हान उभे करतात.

मुलांना भावनिकद्रुष्ट्या कसे वाटते आणि ते कसे बोलतात व वागतात याचा थेट संबंध असतो. जेव्हा मुलांना भावनिक द्रुष्टीने योग्य वाटते तेव्हा ते योग्य वर्तणूक करतात. अर्थात त्यांना भावनिक द्रुष्ट्या योग्य वाटण्यासाठी आपण मदत केली तर त्यांनी वर्तणूक आपोआपच योग्य होऊन जाईल. मुलांची वागणूक, वर्तणूक आणि बोलणं सुधारण्यासाठी व त्यांना संस्कारित करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग नव्हे काय? आणि हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या भावना व भावनिक विश्लेषणं लक्षपूर्वक ऐकणे व मनापासून स्वीकारणे.

आपण पालक सहसा आपल्या मुलांच्या भावना ऐकूनच घेत नाही. “एक शब्द बोलू नको, तू काहीही बोलू नको, चूप गप्प बैस,” असं म्हणून आपण त्यांना झिडकारून टाकतो. ऐकून घ्यायला लागलो तरी, आपण पूर्ण लक्ष त्यांच्या भावनांकडे, बोलण्याकडे व हावभावांकडे देत नाही. नुसतेच “हो हो, पुढे पुढे, बोल बोल, ऐकतोय मी,” असं म्हणत त्यांच्या चेहऱ्याकडेही न पाहता त्यांचं म्हणणं नापसंदीनं ऐकत असतो. पूर्ण ऐकून घ्यायच्या अगोदरच “एवढं काय रडण्यासारखे आहे, मग कशाला तिथे गेलास, तू का मूर्खपणा केलास, तुझी चूक आहे, सोड ना एवढं काय त्यात,” असं म्हणून त्या भावना अवैध व अविचारी ठरवून टाकतो. नकारात्मक भावभावना, भावनिक बोलणं आणि वागणं यांचा आपण स्वीकारतच करीत नाही.
आपण आपल्या मुलांच्या भावनिक समस्या व भावना यांना अकारण, त्रासदायक, नाटकीय, अतार्किक व अवैध ठरवून टाकतो. उदा: “असं काही तुला वाटत नाही, बरं”, “काही नाही तू कंटाळा करतोस फक्त.”, “एवढं अस्वस्थ व्हायचं काहीच कारण नाही.” अशा प्रकारच्या सततच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे मुले गोंधळून जातात व चिडचिड करायला लागतात. तसेच भावना व भावनिक समस्या काय इतक्या महत्त्वाच्या नसतात, त्यांच्याकडे दुर्लक्षच करायला हवं, असा एक संदेश आपण मुलांना देत असतो. त्यामुळे मुले आपल्या भावभावनांना आणि भावनिक विश्वाला नाकारायला शिकतात. ही मुलं भावी आयुष्यात स्वतःला येणाऱ्या त्याचबरोबर इतरांच्याही भावनिक समस्यांना नाटकीय आणि अतार्किक समजून त्याकडे दुर्लक्ष करायला लागतात.

आपल्याला सर्वांना असंच वाटतं की इतर सर्व पालक चुका करतात पण मी तसा पालक नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या पालकत्वाबदल खूपच सकारात्मक आणि चांगलं वाटत असतं. परंतु जर आपण आपल्या पाल्यांसोबत होणाऱ्या दैनंदिन संभाषणाचं जवळून निरीक्षण केलं व आत्माअवलोकन केलं तर ही गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते.
आपल्या मुलांबरोबर होणाऱ्या जवळपास सर्व संभाषणांचे रूपांतर युक्तिवादांमध्ये होते. भावनेच्या स्तरावरून वागणार्‍या आणि बोलणाऱ्या मुला-मुलींशी आपण बौद्धिक व तार्किक स्तरावरून वागायला आणि बोलायला सुरुवात करतो. मुलांच्या भावभावनांना आणि समजुतींना नाकारून आपण त्यांना संदेश देत असतो की, तुमच्या समजुती आणि भावना या विश्वासास पात्र नाहीत. अप्रत्यक्षरीत्या आपण मुलांना सांगत असतो की तुम्ही स्वतःवर व स्वतःच्या समजूतींवर विश्वास ठेवू नका. त्याऐवजी तुम्ही आमच्या भावना आणि आमच्या समजुती यावर विश्वास ठेवावा आणि त्यावरच अवलंबून रहावे, अशी आज्ञाच जणू आपण आपल्या मुलांना देत असतो.

आपण हे नक्की काय करतोय? मुलांची प्रगती की अधोगती, याचा एकदा नक्की विचार केला पाहिजे. आणि यामध्ये बदल करण्याचा निर्धार आणि निर्णय आपण केलाच पाहिजे. हे करण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे मुलांच्या जागेवर स्वतःला समजून, स्वतःला तशी समस्या किंवा भावना तयार झाल्यावर, स्वतःला कसे वागवले जाण्याची आपली इच्छा आहे? हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारणे. असं समजा की आपण स्वतःच एक थकलेलं, कंटाळलेलं किंवा चिडलेलं मूल आहात. आणि आता कल्पना करा की घरातील मोठ्या माणसांनी काय बोलावं? आणि कसं वागावं?म्हणजे तुम्हाला तुमच्या भावना समजून घेतल्या सारखं वाटेल. मुलांच्या भावना मुलांच्या जागेवर जाऊन समजून घेतल्यावर नक्कीच मुलांच्या प्रती आपल्या प्रतिक्रिया, योग्य व विकसित असतील.

आपल्याला खरच मनापासून मुलांना समजून घ्यायचं असतं त्यांच्या भावना समजून घ्यायच्या असतात, पण त्या बाबतीत काय करायचं? व कसं करायचं? हे माहीत नसल्यास आपण आपल्या जुन्या पद्धतीनेच वागू आणि बोलू लागतो. या जुन्या पद्धती बदलल्याशिवाय आपण आपल्या मुलांच्या भावना व भावनिक विश्व समजून घेऊ शकणार नाही.

आपण आणि आपले पाल्य भावनिक दृष्ट्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतो. या दोन्ही व्यक्तींपैकी कोणीही अगदी बरोबर आणि अगदी चूक नसतं. आपल्याला प्रत्येकाला जे काही वाटतं ते वाटतं, ते तसं का वाटतं? आणि तसं नाही वाटलं पाहिजे! असं म्हणणं म्हणजे त्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा केल्यासारखं आहे. त्यामुळे आपण आणि आपली मुले यांमधील संवादांमध्ये आपण युक्तिवादाला दुय्यम स्थान दिले पाहिजे आणि भावनिक दृष्टीने समजून घेण्याला प्राथमिक स्थान दिले पाहिजे. एखाद्या माणसाच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यावर किंवा त्या भावनांच्या खरेपणाबद्दलच प्रश्नचिन्ह तयार केल्यावर त्या माणसाला कसे वाटेल? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर देऊन त्यावरही विचार करावा.

एवढं करूनही मुलं एखाद्या दिवशी अशा विषयावर, असं काही बोलतील की आपल्याला आपलं समजून घेण्याचे स्थान टिकवणं अवघड होऊन जाईल. असे विषय व गोष्टी याबद्दल मुलांशी बोलताना आपण स्वतःबद्दलच नवीन काहीतरी शिकू आणि स्वतःला जाणण्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल. मुलांमधील ज्या भावना आपल्याला संतप्त व चिंताग्रस्त करतात आणि आपल्याला पुन्हा जुन्या मार्गाने प्रतिक्रिया द्यायला लावतात, त्या भावनांचा ऊगम आपल्या स्वतःमध्ये आहे मुलांमध्ये नाही. त्यानिमित्ताने मुलांशी संवाद आणि संभाषण करता करता, आपण स्वतः स्वतःला शोधण्यास सुरुवात करू, हा आपल्यासाठी बोनसच नव्हे काय?

नातेवाईक व मनोविकार

○नियमित, योग्य मात्रेमध्ये, सांगितल्याप्रमाणे औषधे घ्यावीत.
○नियमितपणे डॉक्टरांना भेटून आजाराची व औषधांच्या मात्रा याची चर्चा करावी.
○औषधांबरोबर कौटुंबिक प्रेम, सामाजिक सहाय्य, व्यवसाय व नियमित वैयक्तिक दैनंदिनी यामुळे आजाराला लवकर उतार येतो.
○उपचारा संबंधी व आजारासंबंधी काहीही अपेक्षा, शंका व गैरसमज असल्यास मनमोकळे डॉक्टरांची बोलावे.
○ उपचारास नकार देण्याचा, दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा व पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये जाण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.
○ रुग्णाच्या, नातेवाईकांच्या किंवा इतर कोणाच्याही जीवाला, जीवनाला व जगण्याला आजारापासून काहीही भीती असल्यास स्पेशल दवाखान्यात भरती होणे कायद्याने बंधनकारक आहे.
○नियमित औषधांबरोबर ध्यानधारणा, व्यायाम व योगासने केल्याने जीवनमान व राहणीमान सुधारते.
○नियमित ताजा, चौरस व प्रथिनयुक्त आहार घ्यावा.
○ आहारामध्ये साखर, मैदा, रेडीमेड फास्ट फूड व बेकरी यांचे प्रमाण कमीतकमी ठेवावे.
○नियमित पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. रात्रपाळी व जागरण टाळावे.
○नियमित नातेवाईक व मित्रांशी आपल्या वैयक्तिक चिंता, काळजी व दैनंदिन गोष्टी याविषयी गप्पा माराव्या.
○नियमित आपल्या लहरी, मूड, दिवास्वप्न, विचार व भावना यावर लक्ष ठेवावे. अचानक व तीव्र बदल झाल्यास डॉक्टरांशी लगेच चर्चा करावी.
○निराशा, राग, भीती, धुंद व आजाराची लक्षणे तीव्र असताना असताना वाहन व मशिनरी चालवू नये.
○दारू, तंबाखू व इतर मादक द्रव्य कधीही, कुठेही, कुणासाठीही आणि काहीही कारणासाठी बिलकुल घेऊ नये.
○घरातील शस्त्रे व कीटकनाशके कुलूपबंद कपाटामध्ये सुरक्षित ठेवावीत.
○आत्महत्या व मरण यासंबंधी रुग्णाने काहीही बोलल्यास किंवा चर्चा केल्यास डॉक्टरांशी नक्की संपर्क साधावा.
○50% रुग्णांची औषधे काही काळानंतर व योग्य उपचारानंतर बंद होतात. उरलेल्या रुग्णांना कायमस्वरूपी, तहहयात औषधे घ्यावी लागतात.
○उशिरा रोगनिदान, उशिरा औषधोपचार व उपचार मध्येच बंद करणे यामुळे आजार उलटून कायमचे मानसिक, बौद्धिक, सामाजिक व प्रापंचिक अपंगत्व येते.
○ उपवर रूग्ण मुला मुलींचे लग्न करताना पाहुण्यांना आजार व उपचार यासंबंधी कल्पना दिल्यास व उपचार चालू ठेवण्यास संबंधी चर्चा केल्यास त्यांचे वैवाहिक जीवन सफल होऊ शकते.
○सर्व औषधांना काहीना काही साईड इफेक्ट असतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून तुमच्यासाठी सर्वोत्तम औषध निवडण्यास मदत करू शकता.

उतरंड:

उतरंड:
आयुष्याच्या भट्टीत तयार झालेली विचारांची मडकी, पक्की व कायमची वाटतात. परंतु ऋतूनुसार व परिस्थितीअन्वये वापरून झाल्यावर ही जून मडकी उतरंडीत जातात. आपल्या गरजांनुसार नवीन विचारांची मडकी आयुष्याच्या भट्टीत भाजावी लागतात. फूटलेली मडकी आपण फेकून देतो. टिकाऊ मडकी आपण वापरतो. वापर व गरज नसल्यास उतरंडीत ठेवून देतो. जीवन म्हणजे या विचारांच्या मडक्यांच्या अनेक उतरंडी. आणि जगणं म्हणजे योग्य वेळी योग्य ते विचारांचं मडकं वापरून परत उतरंडीत ठेवून देणे. या उतरंडीतील काही मडक्यांमध्ये असतो आपला अमूल्य खजिना: मन:शांती. अशी मडकी आपल्या उतरंडीची शोभा वाढवतात.
डॉ. संताजी शेळके
बारामती

अफवा उवाच

अफवा उवाच
दुपारची वेळ, ओपीडी संपलेली होती. कोरोना साथरोगाला घाबरल्यामुळे चिंता वाढलेले दोघे नुकतेच भेटून गेले होते. त्याच विचारात होतो. मोबाइल वाजला. उचलला,
“हेलो”
“डॉक्टर, ओपीडी चालू आहे का?”
“हो, या लवकर.
“नाही, मी बरा आहे. अजून महिन्याच्या गोळ्या आहेत.”
“मग.”
“डॉक्टर लोकांनाही कोरोना होतोय, काळजी घ्या.”
“होय, धन्यवाद.”
” पण, डॉक्टरला नाही व्हावा, अस्सं वाटतं.”
“का बरं? तोही माणूसच आहे.”
“तुम्हाला, सगळं माहिती असतंय. त्यामुळे तुम्ही काळजी घेऊ शकता. आजारापासून दूर राहू शकता.”
“हो, बरोबर.”
“मग, मलाही सांगा. कोरोनाला कसं रोखायचं ते?”
“घरी राहा. वारंवार हात धुवा. मास्क वापरा. सुरक्षित अंतर ठेवा. ताप, खोकला झाल्यास सरकारी इस्पितळात तपासणी करा.”
“हे तर आम्हाला पण माहिती आहे.”
“अरे वा!”
“मला तो गुपित इलाज सांगा ना.”
“कसलं गुपित?”
“चायनीज वनस्पती औषध, समूळ बरं करणारं.”
“असं काही मला ठाऊक नाही.”
“चीनने कोरोना घालवला ते!”
“लाँकडाऊन पाळून घालवलाय त्यांनी.”
“आपला का जात नाही?”
“कडक लाँकडाऊन पाळल्यास नक्की जाईल.”
“नाही गेला तर?”
“प्रत्येकाने काळजी घेतल्यास नक्की जाईल.”
“वाटत नाही! असो! तुमच्याकडे चायनीज औषध आल्यावर मला नक्की द्या. कीतीही पैसे देऊ.”
“अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका!” मी
“सत्य आहे ते! तेवढं औषध आलं की सांगा. कोणाकडे मिळत असल्यास सांगा. फार उपकार होतील. ठेवतो आता. काळजी घ्या.”
आणि काही बोलू न देता त्याने फोन बंद केला.
वारंवार, वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या माध्यमातून व लोकांकडून ऐकलेली व पाहिलेली एखादी अफवा सुद्धा सत्य वाटू लागते. म्हणून कोणत्याही प्रकारची अफवा न पसरवणे हीच प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
डॉ. संताजी शेळके
बारामती.

भीती:

भीती:
शालेय जीवनात परिक्षेत पेपर लिहताना जास्त गुण मिळवणे हे विध्यार्थ्याचे ध्येय असते. गुणांवरून त्याची बुद्धिमत्ता व भवितव्य ठरवले जाते. त्यामुळे जे प्रश्न वारंवार परिक्षेत येतात त्यावर लक्ष देणे व इतर प्रश्नांना टाळणे हे तो छान शिकतो. त्यामुळे सर्वजण त्यात्यावेळी कौतुक करतात व बक्षिसही देतात.
विद्यार्थी हळूहळू त्या गोष्टीत पारंगत होतो. तो त्याच्या साठी आरामदायी स्थिती तयार करतो व त्याची जीवापाड जपनुक करतो. त्याला काय अावडते, त्याला कशात रस आहे, त्याच्या आवडीनिवडी तो बाजूला सारतो. तसे न केल्यास तो बंडखोर किंवा स्वार्थी ठरवला जातो. जिथे त्याला चूक होईल असे वाटते किंवा अपयश येईल असे वाटते तो भाग तो सोडून द्यायला शिकतो.
शंभर टक्के बरोबर असण्याची शक्यता असल्यावर तो प्रयत्न करतो अन्यथा ती गोष्ट तो टाळतो. त्याला चुका होण्याची व अपयशाची भीती वाटायला लागते. त्याला कौतुक न होण्याची किंवा नाकारले जाण्याची भीती वाटायला लागते. याच भीती नंतर त्यांच्या ध्येय निश्चित व साध्य करण्याच्या व त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे ठरतात.