ठेच:
“आम्ही जे भोगलं ते आमच्या मुलांना नको. आम्हाला जे कष्ट पडले ते आमच्या मुलांना पडू नयेत. आम्ही ज्या यातना लहानपणी सहन केल्या त्या आमच्या मुलांना नकोत. आम्ही जे रानामाळात काबाडकष्ट केले ते आमच्या मुलांना करण्याची वेळ येऊ नये. आम्ही जे कमीत कमी पुस्तकं व वह्या असताना शिकलो ती वेळ आमच्या मुलांवर यायला नको. आम्हाला लिहायला वही नव्हती, पाटी नव्हती, पेन्सिल नव्हती, ती वेळ आमच्या मुलांवर येऊ नये. आमची खायची प्यायची आभाळ झाली ती आमच्या मुलांची होऊ नये. आमच्या आईवडिलांनी ज्या शिक्षा केल्या ज्या पद्धतीने आमच्याशी वागले त्या पद्धतीने आम्ही आमच्या मुलांची वागणार नाही. आम्हाला ज्या पद्धतीने शिक्षकांनी ओरडलं, रागावले, शिक्षा केली, छड्या मारल्या त्याप्रमाणे त्यांनी आमच्या मुलांना नाही मारावं. आमच्या मुलामुलींच्या सुखासाठी व आनंदासाठी आम्ही काहीही करायला व कीतीही पैसे खर्च करायला तयार आहोत.” अशा अपेक्षा कदाचित आपल्या पाल्यांच्या विकासाच्या मार्गावरील खड्डे व दगडधोंडे ठरु शकतात.
अशा सर्व इच्छा करणाऱ्या हे माझ्या पालकांनो, तुम्ही आज उभे आहात, सक्सेसफुल आहात, यशस्वी आहात, हे सर्वस्वी तुमच्या भूतकाळातील समस्यांना तुम्ही दिलेले तोंड आणि त्याला काढलेला सकारात्मक पर्याय यातूनच झालेले आहात. या माध्यमातून तुम्ही शिकलेले अमूल्य धडे, ध्येयावरचा तुमचा विश्वास आणि ध्येयाप्रती तुम्ही केलेली सातत्यपूर्ण कष्ट हेच तुमच्या यशाचं रहस्य आहे.
या गोष्टी कदाचित तुमच्या वाट्याला आल्या नसत्या, तुम्ही केल्या नसत्या, चुका करायला तुम्ही घाबरला असता, कष्ट करायला तुम्ही नकार दिला असता, तुमच्या आई-वडिलांनी कष्ट करायला तुम्हाला नको म्हटलं असतं, मदत करणे हे वाईट व कमीपणाचे आहे असं शिकवलं असतं, तर कदाचित तुम्ही हे यश कधीही मिळवले नसते.
मुलांनी सक्सेसफुल व्हावं असं आपल्याला मनापासून वाटतं, म्हणून या गोष्टी आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहेत हे त्यांना समजावून सांगू या. यावेळी आपण जरी घाबरलो, तरी माघार न घेता आपल्या इच्छेप्रती, ध्येयाप्रती आणि कामाप्रती आपण इमानदारीने आणि प्रामाणिकपणे पुनपुन्हा प्रयत्न करावे ही तुम्ही मुलांना करून दाखवा, ते बघून शिकतील. मुलांना शाळेतील, घरातील, घरगुती समारंभातील छोटी-छोटी कामं ध्येयाच्या स्वरुपात ठरवून द्या. ती पूर्ण केल्यावर त्यांच्यावर प्रेमाचा व कौतुकाचा भडीमार करा. काही चूक झाल्यास, काही काम न जमल्यास, काही करताना गडबड झाल्यास, त्याची इच्छा नसल्यास, काही तूटफूट झाल्यास त्यांनी जे थोडंफार केलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करा. सातत्याने पाठपुरावा करून ते सातत्य व चिकाटी या सवयी शिकतील.
तुमच्या भूतकाळातील किंवा इतरांच्या जीवनातील बंधनं, समस्या, अडचणी, आव्हाने किंवा यशापयश यांचे मापदंड व साखळदंड त्यांच्या पायात घालण्याचा प्रयत्न करू नका. ज्यामुळे त्यांचा विकासवेग मंदावेल अशी कोणतीही धारणा, वाक्ये, टीका, भविष्यवाणी किंवा चित्र त्यांच्या मनःपटलावर पाडू नका, पडू देऊ नका.
शेवटी अनावधानाने हे सगळे होऊन गेले असेल तर या सगळ्यातूनही आपण बाहेर निघू शकतो हा विश्वास ठेवा आणि आपली रोजची कामं, प्रत्येकाशी बोलणं, सर्वांशी वागणं हे आपली ध्येयं आणि आपल्या इच्छा यांच्याशी सुसंगत करून आपण उज्वल भविष्यकाळ घडवू शकतो, हाही विश्वास तयार करा. आपण त्यांच्या विकासाच्या व उत्क्रांतीच्या मार्गावरील ठेच किंवा पायातील दोरखंड न बनता, त्या ठेचेतून आपण सावरू शकतो किंवा तो दोरखंड आपण प्रयत्न करून तोडू शकतो हा विश्वास तयार करणे हेच खरी पालकत्व आहे.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
Author: Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
प्रतिमा:
प्रतिमा:
आपल्या मनामध्ये बालपणापासून वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची एक प्रतिमा तयार झालेली असते. या प्रतिमा तयार करण्यामध्ये आपले आई-वडील आणि कुटुंबातील नातेवाईक आपल्याशी काय बोलतात, आपल्याला काय सांगतात, आपल्याशी कसे वागतात, आपल्यासमोर आणि आपल्या पाठीमागे कसे वर्तन करतात या गोष्टींचा हात असतो. शिक्षक, सगेसोयरे, मित्र, अभिनेते व अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ते व नेतेमंडळी यांचाही प्रभाव या प्रतिमा निर्मितीमध्ये खूप प्रमाणात असतो.
या प्रतिमा आपल्या मनामध्ये शब्द, वाक्य, चित्र, कल्पना, धारणा, मान्यता, विचार आणि चलचित्र या स्वरूपामध्ये साठवल्या गेलेल्या असतात.
या प्रतिमा आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी, वेगवेगळ्या प्रसंगात व समस्येत, आनंदात अथवा दु:खात कसे वागू, काय बोलू व करु हे ठरवत असतात. इतर सर्व या प्रतिमांशी सुसंगत व मिळतेजुळते वागल्यास, बोलल्यास, ऐकल्यास व दिसल्यास आपल्याला बरं वाटत. या प्रतिमांशी विसंगत असे काहीही अनुभवास आल्यास आपल्याला ताणतणाव, दुःख, वेदना, संघर्ष व समस्या या जाणवत असतात.
आपल्या मनात पालक, शिक्षक, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा, नवरा, बायको, शाळा, शिक्षक, नोकरी, नेता, यश, अपयश, हारजीत, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, इंजिनीअर या आणि अशा लाखो करोडो प्रतिमा तयार असतात. आपली स्वत:ची सुद्धा एक प्रतिमा अंतर्गत मनात तयार झालेली असते. यातील काही प्रतिमा या सकारात्मक अनुभव आणि माहिती यांनी सकारात्मक झालेल्या असतात, तर काही प्रतिमा या नकारात्मक अनुभव आणि नकारात्मक माहिती यांनी नकारात्मक प्रकारच्या झालेले असतात.
दैनंदिन जीवनामध्ये वागताना, बोलताना व पाहताना आपल्याला आलेले अनुभव आपल्या मनातील प्रतिमेशी सुसंगत असतील तर आपल्याला छान वाटतं आणि त्या प्रतिमा आपण सांभाळून व जपून ठेवतो. याउलट जर आपल्याला अंतर्गत प्रतिमेशी विसंगत असा अनुभव आला तर सहसा आपल्याला पटत नाही किंवा आपण वादविवाद करून आपली प्रतिमा कशी बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपण अशी अपेक्षा करतो की समोरच्या व्यक्तीने आपल्या अंतर्गत प्रतिमेला अनुरूप वागावं, बोलावं, चालावं आणि आपल्याशी तसाच प्रतिसाद द्यावा.
आपण एखाद्यावर रागावलो, चिडलो किंवा नाराज झालो तर ते समोरच्या व्यक्तीबद्दल व व्यक्तीवर नसून आपण आपल्याच मनातील अंतर्गत प्रतिमेवर नाराज झालेलो असतो. समोरच्या व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि समोरची व्यक्ती पूर्णपणे वेगळी व्यक्ती आहे, आणि आपल्या अंतर्गत प्रतिमांबद्दल त्या व्यक्तीला बिलकुलच काही माहीत नाही हे आपण विसरून जातो. आपण जर जागरूकतेने, आत्मभानाने व सावधानतेने आपल्या अंतर्गत प्रतिमांमध्ये आणि समोरच्या वास्तवातील व्यक्तीमध्ये अंतर करायला शिकलो नाही तर आपल्या अंतर्गत प्रतिमांनाच आपण बाहेरील प्रत्यक्ष व्यक्ती समजून बसतो. आपण आपल्या मनातील इतरांच्या अंतर्गत प्रतिमांशी आपल्याच मनात भांडत बसतो.
चांगली गोष्ट ही आहे की आपण स्वतः अंतर्मुख होऊन, सरावाने व समजून घेऊन आपल्या अंतर्गत मनातील प्रतिमा बदलू शकतो. आपल्या अंतर्मनातील प्रतिमा जर सकारात्मकता, प्रेम, दया, करुणा, साकल्य, क्षमाभाव, सद्भाव, भलेपणा, सद्सद्विवेकबुद्धी आणि क्रुतज्ञताभाव यांच्या चाळणीतून चाळून घेतल्या, या आरशात पाहून निरखून घेतल्या तर आपल्या या प्रतिमा सकारात्मक व विकासात्मक प्रतिमांमध्ये परिवर्तित होतील. मग आपण बाह्य जगातील, समाजातील व नातेसंबंधातील लोकांना बदलण्याचा हट्ट करणे सोडून देऊ. त्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या अंतर्गत प्रतिमांमध्ये ऐच्छिक बदल करून ताणतणावांना, दुःखांना, निराशा व वेदना या नकारात्मक भावनांना आनंद, सुख, समाधान व शांती या उच्च भावनांमध्ये परावर्तित करू शकतो.
पण लक्षात ठेवा हे फक्त आणि फक्त! आपणच आणि आपणच! स्वतःसाठी आणि स्वतःसाठी! आणि स्वतःच आणि स्वतःच! करू शकतो. दुसरं कोणीही, कधीही, कुठेही आणि कोणासाठीही हे करू शकत नाही.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
ना वैयक्तिक ना व्यक्तीगत:
ना वैयक्तिक ना व्यक्तीगत:
कोणतीही समस्या किंवा प्रश्न सोडवताना; आपण समस्येकडे लक्ष देतो का? नाही. समस्या ज्यांच्यामुळे तयार झाली आहे असे आपल्याला वाटते त्यांच्याकडे लक्ष देतो का? होय. समस्या बाजूला ठेवून एखाद्याला धडा शिकवण्याची इच्छा आपल्याला होते का? होय. प्रश्न काय आहे याकडे न बघता आपण पण समोरच्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न करतो का? होय. हे सर्व बारकाईने पहावे व स्वतःला प्रश्न करायला सुरुवात करावी.
जेव्हा आपण म्हणतो “एखाद्यामुळे” समस्या तयार झाली तेव्हा त्या समस्येचे मूळ आपण त्या “एखाद्यामध्ये” शोधायला सुरुवात करतो. मूळ समस्येपासून आणि त्याच्या मूळ उत्तरांपासून दूर भरकटले जातो. समोरचा प्रश्न किंवा समोरची समस्या ही अडचण राहता आपल्याबरोबर काम करणारी व्यक्ती हीच आपली अडचण होऊन जाते. म्हणून एखाद्या व्यक्तीवर एखाद्या समस्येचे खापर फोडून मोकळे होण्यापेक्षा, त्या समस्येचे व्यक्तिनिरपेक्ष काही उत्तर मिळते का? हे विचारायला सुरुवात करणं गरजेचं आहे. यासाठी आपण कोणत्याही प्रश्नाकडे वैयक्तिकरीत्या न बघता, त्याकडे एक प्रश्न म्हणूनच पाहायला सुरुवात केली पाहिजे. असा प्रयत्न केल्यास आपल्या आयुष्यातील बरेच प्रश्न, आपण कुटुंबीय व सहकारी यांना न दुखावता, कोणावरही दोषारोप न करता आणि स्वतःलाही त्रास करून न घेता सोडवू शकतो.
आपल्या पाल्याच्या बाबतीतच पहा; आपल्या पाल्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, समस्या आपण ऐकून व समजून घेतोय का?
पाल्याच्या अडचणींची काय काय कारणे असू शकतात व त्यावर काही पर्याय निघू शकतोय का?
आपल्या पाल्याला आपण कशाही प्रकारे मदत करू शकतोय का?
आपल्या अनुभवांचा आपल्या पाल्याला उपयोग होऊ देऊ शकतोय का?
वरील प्रश्नांची उत्तरे अर्थातच होय असावीत, पण ती नक्की तशीच असतात काय, तर नाही. परंतु आपण हे सगळं बाजूला ठेवतो आणि त्या सर्व अडचणींना आपला पाल्यच कसा कसा जबाबदार आहे?
सर्व समस्या त्याच्या एकट्यामुळेच कशा तयार झाल्या आहेत?
जगातील सर्व अडचणींमध्ये आपल्या पाल्याचाच हात असतो का?
सर्व प्रश्नांचं एकमेव कारण आपला पाल्यच असतो का?
त्याचे मत आणि त्यांनी मांडलेली बाजू आपण झटक्यासरशी खोडून टाकतो का?
त्यांनी केलेला तर्क आणि त्यांनी मांडलेले विचार कसे बालिश आणि मूर्खपणाचे आहेत असे सिद्ध करतो का?
त्याला आलेल्या अडचणी आपण वैयक्तिकरित्या करून घेऊन स्वतःच्या अस्मितेचा, इज्जतीचा, किंमतीचा आणि मानपानाचा प्रश्न करून घेतो का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असावीत, पण दुर्दैवाने सर्व उत्तरे होय असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर आपल्या पाल्याच्या अडचणी व प्रश्न कदाचित आपोआप सुटू शकतात किंवा कदाचित प्रश्न म्हणावेत इतके ते तीव्र होणारच नाहीत.
संसारांमध्ये नवरा बायको या नात्यामध्येही होणारे बरेच ताण-तणाव आणि प्रश्न हे संसारात येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न यामुळे येतात का? तर नाही. ते येतात कारण या अडचणींना व प्रश्नांना आपण आपल्या जोडीदाराला जबाबदार धरल्यामुळे. त्यामुळे मूळ प्रश्न आणि अडचणी यांचे मूळ कारण आणि मूळ उत्तर बाजूला राहते. आपण एकमेकांकडे केलेल्या बोटांमुळे आणि आरोपांमुळे तयार होणारे नवीन आणि दुय्यम प्रश्न व अडचणी उत्पन्न होतात. या दुय्यम प्रश्नांना व अडचणींना कुठलेही मूळ कारण नसल्यामुळे व त्याचे मूळ कारणं आपल्यातच लपलेली असल्यामुळे त्यावर आपल्याला मार्गच शोधता येत नाही. आपणही ते प्रश्न वैयक्तिकरित्या घेऊन त्या अडचणी आपण आपल्या जोडीदाराशी जोडून टाकतो आणि जोडीदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर आगपाखड किंवा दोषारोप करतो. अर्थात यातून आपण कदाचित जिंकू शकतो परंतु आपला संसार मात्र हरण्याची जास्त शक्यता असते. म्हणून कोणताही प्रश्न, कोणतीही समस्या, कोणतीही अडचण ही वैयक्तिकरित्या व स्वतःची करून नाही घेतली पाहिजे आणि व्यक्तीगतरित्या दुसऱ्यालाही त्याला कारणीभूत नाही धरलं पाहिजे, तेव्हाच आपण त्या समस्येच्या मूळ कारणापर्यंत आणि मूळ उत्तरापर्यंत पोहोचू शकतो.
प्रेम:
प्रेम:
प्रेम हि ह्रदयाची भाषा आहे आणि म्हणून ही भाषा हृदयालाच कळते. ही भाषा आपल्या वाणीतून आणि वृत्तीतून क्षणाक्षणाला आणि घडीघडीला छोट्या छोट्या गोष्टीतून प्रकट होत असते. प्रेमाची ही भाषा आपले प्रियजन, मित्र, सखे-सोबती या सर्वांसोबत वापरली गेली पाहिजे. ही भाषा व्यक्त करणे सण, वाढदिवस, अँनिवर्सरी, व्हॅलेंटाइन, फ्रेंडशिप, वाइफ डे, हजबंड डे अशा दिवसापर्यंत पुढे ढकलण्याची गरज नाही. तु मला आवडतेस /आवडतोस, तू माझ्या जीवनात खूप महत्वाची/ महत्त्वाचा आहेस, तुझ्यामुळे माझी जीवनाला फुललेलं आहे , तू माझ्या जीवनात आल्याबद्दल धन्यवाद! मी खूप आभारी आहे! अशी वाक्य आपापल्या स्टाईलमध्ये म्हणूया किंवा हावभाव करून दाखवूया.
प्रपोज करताना गुडघ्यावर यायचं आणि नंतर आयुष्यभर एकमेकांना गुडघ्यावर आणायचं यापेक्षा प्रेमाचं आणि करूणेचं बाशिंग गुडघ्याला का नाही बांधावं? आपण आपल्या बोलण्यातून, वागण्यातून व हावभावातून प्रेमाचा अविष्कार करूया, जेव्हा जेव्हा आपण समोरासमोर असू. प्रेम हा एका मनाला दुसऱ्या मनाशी जोडणारा धागा आहे. या धाग्यामध्ये एकही मणी न लावता आपण जगू शकतो, पण हे जगणं फक्त शारीरिक पातळीवरचं व जड अवस्थेतलं होऊन जातं. या धाग्यामध्ये आपण अखंड सृष्टीतील कोणतीही गोष्ट, मणी म्हणून वापरू शकतो. व्यक्तीच्या प्रेमाच्या धाग्यामध्ये सुरुवातचा मणी हा त्याचा स्वतःचा असतो, म्हणजेच स्वतः स्वतःवर प्रेम करण्याचा. बरेचदा लोक इथेच थांबतात, स्वतः व्यतिरिक्त इतर कुणाचाही किंचितही विचार करत नाहीत. प्रत्येक गोष्ट स्वतःपासून सुरू करतात आणि स्वतःवरच संपवतात, इतरांना त्यात काडीचीही किंमत नसते. असे लोक आपल्या हृदयामधील प्रेमाचा संपूर्ण अविष्कार करण्यामध्ये स्वतःच अडचण बनतात. ते नेहमी इतरांबद्दल तक्रारीचा पाढा वाचत असतात . स्वतःवर कसा अन्याय झाला, स्वतःला कशी वाईट वागणूक मिळाली आणि स्वतःची कशी त्यामध्ये काही चूक नाही याचे समर्थन करत असतात. प्रेमाचा अर्थ ते समोरच्या व्यक्तीने माझ्या मनासारखे आणि मला पटेल आणि मला वाटेल असे वागावे, असा ते घेतात. विकास करण्यासाठी इथे खूप वाव आहे.
परंतु जर या धाग्यांमध्ये स्वतःला मध्यवर्ती ठेवून आपले जवळचे प्रियजन जसे आई, वडील, बहीण, भाऊ, नवरा, बायको, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा यांचेही मणी ओवले तर प्रेमाचा हा धागा सुंदर राणीहारामध्ये रूपांतरित होईल. यातील प्रत्येक मणी तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या अविष्कारासाठी एक खुल जग निर्माण करून देईल. आपल्याला शारीरिक व जड पातळीवरच्या प्रेमातून उडी मारून अंतर्मनाच्या व हृदयाच्या पातळीवरून प्रेमाचा अर्थ समजून घेऊ. यासाठी आपण आपल्या नात्याचा व स्ंबंधाचा विनाअट स्वीकार करू. म्हणजे समोरील प्रिय व्यक्ती जशी आहे तशी अखंडपणे स्वीकारू. ती किंवा तो जरा नीटस, गोरी-गोरा, आज्ञाधारक, सेवाभावी, मनकवडा- कवडी, वाद न घालणारा-घालणारी असती तर? अशा प्रश्नांची जागा अखंड आणि संपूर्ण स्वीकार करून विनाअट व बिनशर्त प्रेमभावानेला देऊ.
अशा प्रेमभावनेमध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा किंवा तुलना या गोष्टींना शून्य किंमत असेल. फक्त आणि फक्त किंमत असेल ती प्रेम भावनेला आणि हेतूशून्य करूणेला. हा असा तो तसा, हा इथे पोहोचला, तो तिथे पोहोचला, ह्याच्याकडे बघ, त्याच्याकडे बघ, तिच्याकडे पहा, इथे कमी तिथे जास्त, ती तशी वागते तो तसा वागतो, तो कसा बोलतो, ती कशी नटते, ती कशी पुढे पुढे करते, ती कशी अबोल राहते, ती कशी विरोध करत नाही, ती कशी सगळे ऐकते, तो कसं सगळं ऐकत नाही, या सगळ्या गोष्टी आपल्या बोलण्यामधून गायब होतील. जे बोलतोय, जे करतोय व जे वाटतेय ते सर्व प्रेम व करुणा व्यक्त करतेय काय? याचे उत्तर होय येण्यासाठी मी काय करू शकतो? जे उत्तर द्याल त्यावर क्रुती कराल.
आपण आपल्या प्रिय नातेवाईकांना व नातेसंबंधांना गृहीत धरणार नाही. तो माझ्यासाठी एवढं करेल, हे माझ्यासाठी का करू नये, केले म्हणजे उपकार केले काय? कामच आहे तिचे/ त्याचे, आम्ही त्यांच्यासाठी एवढं करतोय ते एवढं नक्की करतील, आम्ही मर मर मरतोय तुम्ही एवढेही करू नये, आम्ही राबराब राबतो तुमच्या सुखासाठी या अपेक्षा व अपेक्षाभंग व्यथा हळूहळू गळून जातील. त्याजागी तू माझ्यासाठी एवढं करून देशील का? माझ्यासाठी थोडा वेळ काढायला जमेल का? प्लीज, तू असं करशील का? तू तसं केलं तर मला बरे वाटेल! आपल्यासाठी हे केल्याबद्दल धन्यवाद! आपण असं केल्यास आपल्या कष्टाचे चीज होईल! अशा प्रकारच्या सुखद सुसंवादाची पालवी फुटेल.
आपल्याला हवं ते! हवं तेव्हा! आपण मागत असू आणि समोरच्याला हवं ते! आणि हवं तेव्हा! देण्याचा मनापासून प्रयत्न करत असू. यामध्ये दिल्याबद्दल कुठलाही तोऱ्याचा, अभिमानाचा, दिल्याचा आणि त्याबदल्यात काहीतरी परत मागण्याचा भाव नसेल. घेतल्याबद्दल कुठलाही कमीपणाचा, अपराधाचा, अपमानाचा, उपकाराचा भाव नसेल. दोन्ही साईडला जे असेल ते हृदयातून उगम होणारे व हृदयातून वाहणारे व हृदयातच विलीन होणारे निखळ प्रेम आणि करूणा एवढंच.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
पुनर्जन्म:
पुनर्जन्म:
जगातील सर्व छोटे मोठे संघर्ष कोठे सुरू होतात? जगातील सर्वात जास्त वादविवाद कोठे घातले जातात? जगातील सर्व लहान मोठी युद्धं कोठे केली जातात? त्याचबरोबर जगातील सर्व सुखं, शांती, दया, क्षमा, विकास व उत्क्रांती यांचा उगम कोठे आहे? या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे आपलं मन.
बाह्य जगामध्ये अस्तित्वात असणारी प्रत्येक गोष्ट, वस्तू किंवा निर्मिती ही त्याअगोदर मानवी मनामध्ये तयार झाली होती. गोष्ट चांगली असो की वाईट, उत्तम असो की साधारण, वैयक्तिक अस़ो की सामाजिक, कल्याणकारी असो की विघातक सर्वांचा जन्म प्रथम मानवी मनामधे होतो. या सर्व गोष्टी अद्रुष्य मनातील रूपातून बाह्य जगातील द्रुष्य रुपामध्ये रुपांतरित होतात.
मनाला मायावी म्हणजे इच्छेनुसार रुप धारण करणारे असेही म्हणतात. मनाला कल्पतरू म्हणजे कल्पनेनुसार फळ देणारे असंही म्हणतात. त्यामुळे मनुष्यप्राणी हा ऐकमेव प्राणी ठरतो जो, मनात ठरवलेले हवे ते नाटक व सोंग हुबेहूब वटवू शकतो. इच्छेनुसार हवे तेव्हा, हव्या त्या कल्पनेला साक्षात व प्रत्यक्ष असल्यासारखे अनुभवू शकतो. मनाच्या या क्षमता जादुई आहेत व त्या आपल्याला आश्चर्यचकित करतात.
आता गंमत बघा! आपल्याला बाह्य जगात यश, सुख, समाधान, शांती, सम्रुद्धी, आनंद, भरभराट व उत्तम नातेसंबंध हवे असतात. या गोष्टींचा ऊगम मनातून व्हायला हवा. मनामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर यांना प्रोत्साहन देणारे कोणतेही विचार व धारणा असतील तर त्यांना जाग्रत मनाच्या मदतीने ओळखायला हवं. पोटात एक व ओठावर दुसरे असे असेल तर द्विधा अवस्था तयार होणार. अशा वेळी मनातल्या गोष्टी वेळीच दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत. दिसताक्षणी गोळया घालणारे कमांडो विचार मनात तयार ठेवावेत. त्यांची एक फौज मनात तयार करावी. दैनंदिन जीवनात बाह्य जगात खरे होऊ नयेत अशा विचारांना “सावधान” म्हणून मनाच्या क्षेत्रातून हद्दपार करण्याची मनाला आज्ञा द्यावी. फक्त मंगल व शुभ विचारांना आनंदाने हुंकार द्या.
निवांत वेळी व विश्रांतीदरम्यान आपल्या कल्पना कार्यरत असतात. हे कल्पनाविश्व आपल्याला हव्या असणाऱ्या भावना व इच्छित भविष्य, क्रुती व परिणाम यांविषयी असावे. कल्पनेतील प्रतिमा, चित्रे व चलचित्रे ही स्वतःचं आरोग्य, संपन्नता, उत्तमता, करुणा, प्रेम, सुदृढ नातेसंबंध याविषयी असावीत. याव्यतिरिक्त काहीही आपल्याला नकोसे चोरपावलांनी आपल्या मनात जाऊन घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत असल्यास “जागते राहा” ही आज्ञा जाग्रुत मनाला करा. या आज्ञेने हळूहळू नको त्या सर्व कल्पनांना रोजच्या रोज न चुकता मन:पटलावरुन पुसून काढा. वेळ दवडू नका, नकोशा रंगांनी रेखाटली गेलेल्या सर्व कल्पना, कालांतराने कालवश होतील.
या दोन आज्ञा वेळ व प्रसंग पाहून वापरायला सुरुवात करावी. “सावधान” व “जागते राहा” या दोन स्वआज्ञा पाळण्याचे मनाला प्रशिक्षण देऊया. दररोजच्या सरावाने या स्वआज्ञांचे सवयीत रुपांतर होईल. मग आपल्या सर्व इच्छा, स्वप्नं, ध्येयं, उद्दिष्टं व आकांक्षा बाह्य जगात जन्म घेणार व हाच आपला असेल; पुनर्जन्म.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
मनाची रेसिपी:
मनाची रेसिपी:
आपल्या मनासाठी खाद्य म्हणजे मनातले विचार. मनाचे आरोग्य हे मनानेच मनाला समजून घेऊन व समजावून सांगून निवड केलेल्या विचारांमध्ये आहे. निवड केलेले विचार मनाला निर्भय, सशक्त, स्वतंत्र व सृजनशील बनवत आहेत याची मन मनाला विचारून खात्री करून घेते. ही खात्री करतांना मनाला काय हवं आहे? व काय नको आहे? हे आपलंच मन विचारते. म्हणून आपल्या मनाला काय हवं आहे? आणि काय नको आहे? हे आपल्या मनाला अगोदर माहीत पाहिजे. मनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपलंच मन देतं. ते मन नेमकी काय उत्तरं देत आहे? व का? यावर मनाने लक्ष ठेवतं. यातूनच मनाला मनाचे मनाशी व मनासंबंधी असलेले परस्पर संबंध व हेतू लक्षात येतात. आलेल्या उत्तरांवर प्रतिप्रश्न व प्रत्युत्तर करून मन स्वतःचं संपूर्ण समाधान करून घेतं. त्यामुळे निवडलेल्या उत्तरासाठी व विचारासाठी आपलंच मन स्वतःला जबाबदार मानतं. घडलेल्या प्रसंगातून व मिळालेल्या परिणामातून मन काहीतरी बोध व अर्थ घेऊनच पुढील प्रवास करतं.
मनाची कार्यपद्धती व कार्यप्रणाली आपण मनाच्या मदतीने शोधू शकतो. मनाबद्ल माहीत करून घेण्यासाठी आपल्या मनाच्या सहाय्याने आपण आपल्या मनाचं प्रत्येक क्षणी निरीक्षण व अवलोकन करतो. आपल्या मनाचं त्या क्षणी निरीक्षण व अवलोकन करून मगच मन परवडेल असा विचार निवडेल. आपल्याला जे विचार व जी तत्वं काहीही झालं तरी पकडून ठेवायची असतात, ती आपल्या मनात मनाने अगोदरच कोरलेली असतात. हे कोरीव काम आपल्या मनाने भावना व इंद्रिये यांच्या मदतीने याअगोदरच केलेले असते. हे कोरीव काम कायमचे कधीच नसते, ते हरक्षणी बदलत असते, अगदी तुमच्या मनाने ते बदलू नये असे ठरवले तरी. ते बदलण्याची क्षमता मनामध्ये नेहमीच असते. ते आहे तसे ठेवण्यासाठी मनाला क्षणोक्षणी प्रयत्न करावे लागतात.
आपल्या भावना व इंद्रियांचे काम मनाला मनाची कामे मनासारखी पूर्ण करण्यात मदत करणे हे असते. इंद्रिये, भावना व मन या सर्व यंत्रणांमधील कोणतीही एक यंत्रणा सर्वोत्तम नाही. सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करतात तेव्हा बरे परिणाम मिळतात. मनाने केलेल्या सर्वोत्तम निवडी बरोबर असण्याची शक्यता किती असते? या प्रश्नाचे उत्तर आहे दहा टक्के. जगातील सर्वांत मोठ्या व यशस्वी लोकांनी घेतलेले सर्वोत्कृष्ट निर्णय हे बरोबर असण्याची शक्यता आहे दहा टक्के. कारण माहिती व तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे, पुढच्या क्षणी त्याच प्रश्नाला पूर्णपणे नवीन उत्तर आलेले असते. आपल्या अशिक्षित मनाची अवस्था याहून कमी, पण सतत नवनवीन शिकणं व सराव करणं यामुळे मन दहा टक्के ही पातळी गाठू शकते. त्यामुळे आपल्या मनाला याची माहिती व सवय झाल्यास मन पायरी पायरीने विकसित होत जाईल.
किमान दहा वेगवेगळ्या विचारांवर विचार व मनन चिंतन केल्यानंतर आपल्याला एक सर्वोत्तम विचार मिळेल. या एका विचारावर काम करण्यासाठी मनाने किमान दहा पद्धती शोधल्यास एक सर्वोत्तम पद्धत सापडेल. या सर्वोत्तम पद्धतीने भावना व इंद्रियांचे सहकार्य घेऊन काम केल्यास मनाला सर्वोत्तम परिणाम मिळू शकतात. ही सर्वोत्तम पद्धत किंवा प्रणाली वापरून काळाच्या ओघात यशस्वी होण्याची व अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे, दहा टक्के.
आपल्या मनामध्ये मनाने चूक करणे, चूकणे, अपयश येणे, माघार घेणे व न जमणे या गोष्टींना योग्य व मानाचे स्थान द्यावे. त्याबरोबर चुक मान्य करणे, प्रयत्न करणे, नवीन शिकणे, बोध घेणे, धडा घेणे, सातत्याने काम करणे, समजून घेणे व समजावणे या गोष्टींना मनाने मान द्यावा. भावना व इंद्रिये मनात गोंधळ घालायचे काम करतात. परंतु मनाने त्यांना मोठ्या मनाने समजून घेऊन त्यांचेच आभार व धन्यवाद मानल्यास तेसुध्दा मनाच्या हो ला हो करतात. भावनाविवश व इंद्रियवश होत असल्यास मनाने काही निर्णय व निवड करण्याचे काम पुढे ढकलावे. भावना या मीठ व मसाल्यासारख्या असतात. योग्य प्रमाणात व योग्य ठिकाणी मनाला चविष्ट विचारांची मेजवानी देतात. मात्र अती प्रमाणात व अयोग्य ठिकाणी मनाला बेचव विचारांनी नकोसं करून टाकतात.
मनाने, मनातच व मनासाठी इंद्रिये व भावनांचा मीठ मसाला घालून तयार केलेला एक रुचकर पदार्थ म्हणजे मौल्यवान विचार. सुखी, समाधानी व आनंदी जीवनाची मनाने मनापासून केलेली हीच ती रेसिपी.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
कळतंय पण वळत नाही:
कळतंय पण वळत नाही:
हा प्रत्येकाचा अनुभव असावा. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या क्षणी आपण हे वाक्य म्हणतोच. हे बरोबर इतरांना लागू होते आहे, असं तर आपल्याला वाटतंच व आपण समोरच्याला तसे सांगतो देखील. पण कधी आपल्या अंतर्मनात डोकावून पाहिल्यावर, आपल्यालाही पटतं की हे आपल्यालाही लागू पडतंय. आपणही कधी कधी असं काही वागतो, असं काही बोलतो, असं काही करतो, असं काही हावभाव करतो की जे आपल्याला कधीच करायचं नसतं. याबद्दल आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, शरम व लाज वाटते, अपराधभाव वाटतो.
ही मला वाटतं प्रत्येकाची अडचण आहे. कल्पना करा एखाद्याने तुम्हाला खालील प्रश्न विचारले: अमुक एका प्रसंगांमध्ये तुम्ही कसे वागाल? एखाद्या अडचणीमध्ये असल्यास तुम्ही काय कराल? एखाद्याने तुम्हाला आरे केल्यास तुम्ही काय बोलाल? या प्रश्नांची कल्पनांमध्ये आपण जशी उत्तरे देऊ, तसेच वागू याची शक्यता किती असावी?
ही शक्यता शून्यापासून ते शंभर पर्यंत कितीही असू शकते. कदाचित आपल्याला विचारलेल्या प्रसंगांना आपण वारंवार तोंड दिलं असेल, पण वरील प्रसंग आपण कधीही तोंड न दिलेले सुद्धा असतील. आपल्या प्रतिक्रिया आपल्या नकळत आपल्याला तोंडावर अथवा तोंडघशी पाडतात. अशावेळी आपण म्हणतो “कळतंय पण वळत नाही काय करू”? ही आपली भविष्यात येणाऱ्या आपल्या यशाची पहिली पायरी असू शकते.
आपल्याला जर यशाकडे जावं असं वाटत असेल तर आपली वरील अवस्था तयार करणारे प्रसंग, व्यक्ती, अनुभव, आठवणी आणि दैनंदिन शब्द व वाक्यं यांची एक यादी तयार करून ठेवावी. वरील प्रत्येक प्रसंगात आपल्याला त्या प्रसंगाबद्दल नेमकं कशाचं वाईट वाटतं? किंवा आपल्याला नेमकं काय चुकतंय असं वाटतं? किंवा कुठला शब्द कुठलं वाक्य आपल्याला खटकतं? हेही शोधा. असं पहा एखाद्या प्रसंगाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या अडचणीला, एखाद्या शब्दाला आपण पूर्वीपासून तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया देत आलेलो असतो.
या प्रतिक्रिया आपलं भावनिक मन वारंवार सराव करून शिकलेलं असतं. आता आपल्या या मनाला नवीन व सुधारित प्रतिक्रियांनी जर सज्ज करायचं असेल तर आपल्याला नवीन प्रतिक्रियांचा जितका जास्त सराव करायला मिळेल तितका केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अशा व्यक्तींची, प्रसंगांची, अडचणींची व शब्द वाक्यांची गरज पडेल जे तुम्हाला हा सराव देतील. या गोष्टी नेहमी अशा असतील ज्या तुम्ही मनापासून निवडणार नाही व त्या तुम्हाला आवडणार नाहीत. परंतु याच गोष्टी तुम्हाला तुमची सुधारित आवृत्ती बनवण्यासाठी गरजेच्या असतील. म्हणूनच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अडचण तयार करणाऱ्या प्रसंगांना, ताण तयार करणाऱ्या व्यक्तींना व संघर्ष तयार करणाऱ्या शब्दांना व वाक्यांना कृतार्थ भावनेने धन्यवाद दिला पाहिजे.
मी काय करतोय, कसा बोलतोय, कसा वागतोय आणि एका आदर्श व्यक्तीने काय करावे, कसे बोलावे, कसे वागावे यातील अंतर भरून काढणे गरजेचे आहे. यासाठी आपण काय कृती करू शकतो व काय योजना करू शकतो याचा विचार हा सदैव आपल्यासमोर असावा. या कृती योजनेचे दररोज वाचन, मनन, चिंतन, लेखन व आचरण या गोष्टी झाले तर आपली उत्तम सुधारित आवृत्ती आपली वाट पाहत असेल. एक दिवस ती वृत्ती आपल्याला नक्कीच भेटेल.
त्यामुळे यानंतर कधीही आपल्या मनात असा विचार आला कि “यार कळतय पण वळत नाय” तर आनंदित व्हा. कारण तुमची सुधारित आवृत्ती आणण्याची हीच ती वेळ असेल. स्वतःची सुधारित आवृत्ती तुमच्या मनात अगोदरच तयार असेल ती शोधा आणि त्यानुसार प्रवासाला सुरुवात करा. प्रवासासाठी स्वतःला शुभेच्छा द्यायला विसरू नका. तुम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा!
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ञ
बारामती
सेटल:
सेटल:
तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी का शिकत नाही?
तुमच्या इच्छा व स्वप्न काय?
जीवनाचं उद्दिष्ट तुम्ही शोधले काय?
तुम्ही छंद का जोपासत नाही?
तुम्ही एखादा खेळ का खेळत नाही?
तुम्ही व्यायाम का करत नाही?
तुम्ही अवांतर वाचन करता का?
तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी का करत नाही?
या प्रश्नांची तरुण तरुणींची उत्तरं:
“आम्ही अजुन सेटल झालो नाही”!
“आम्हाला जॉब नाही”!
“आमचं अजून लग्न झालं नाही!”
“आम्हाला गाडी व बंगला नाही”!
“सेटल झाल्यावर मग आम्ही नक्की सर्व काही करू!”. इत्यादी. इत्यादी. अशी वेगवेगळी उत्तरे देऊन स्वतःला आणि समोरच्यालाही आस्वस्थ करतात. ही उत्तर आपल्याला सुद्धा योग्य वाटतात आणि आपल्यालाही त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. परंतु मित्रांनो लक्षात घ्या ही उत्तरं ही फक्त काही पळवाटा आणि सबबी आहेत.
नाही ना पटत! हो! आता हे पण ऐका.
नोकरी, गाडी, बंगला, लग्न व मुलं या सेटल होण्याच्या सर्व कसोट्या पूर्ण केलेल्या लोकांनाही वरिल सर्व प्रश्न विचारले. आता तुम्ही आश्चर्यचकित व्हाल अशा प्रकारची उत्तरं मिळालेली आहेत. त्यातील काही उत्तर याप्रमाणे:
“आमची नोकरी, व्यवसाय!”
“कौटुंबिक कामे!”
“बायको व मुलाबाळांना वेळ देणे!”
“महिन्याच्या टार्गेट पूर्ण करणे!”
“मीटिंग समारंभ यामध्येच वेळ निघून जातो स्वतःला वेळ द्यायला वेळच राहत नाही!”. इत्यादी. इत्यादी. आता आलं का लक्षात! म्हणजे प्रश्न तेच! उत्तरांचं स्वरूपही तेच! सेटल झाला काय? आणि नाही झाला काय? सबबी व पळवाटा त्याच.
आयुष्यामध्ये जीवनाला “सेटल” करण्याचा प्रयत्न बरेच लोक करतात. पण जीवन हे नेहमी “शटल” सारखं प्रवाही व नवीन आहे व असेल. “नव्याचे नऊ दिवस” हे आपल्या मनासाठी असतात जीवनासाठी नाही, जीवन हे दररोज नित्य नवे असते.
“सेटल” करण्याची फार आवड असेल तर ते मनाला करा जीवनाला नव्हे. “सेटल” झालेलं मन तुमच्या जीवनाचं “शटल” करून टाकेल आणि ज्या वेगाने तुम्ही प्रगती कराल ते पाहून तुम्हीच काय, सगळं जग आश्चर्यचकित होईल.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
मी आत्ता काय करू शकतो?
अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांबरोबर मनुष्य प्राण्यासाठी मानसिक आरोग्य ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. आपत्ती व आणीबाणीच्या काळात मानसिक आरोग्य खूपच महत्त्वाचे आहे. कोरोना आणीबाणीशी दोन हात करताना वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक मानसिक आरोग्याविषयी जागृत होणे व राहणे महत्त्वाचे आहे.
मानसिक आरोग्यामध्ये आपले विचार, आपले बोलणे, आपली कृती आणि वर्तणूक यांचा समावेश होतो. कोरोनासारख्या आपत्ती बरोबर समायोजन करताना प्रत्येक व्यक्ती पुन्हा पुन्हा काही भावनिक व मानसिक अवस्थांमधून कमी-अधिक प्रमाणात जात असतो. बेचैनी, चिंता, भीती, ताण आणि राग या भावना यशस्वीरित्या पार केल्यास विकास व विवेक ही अवस्था आपण गाठू शकतो.
आता काय होईल? आपलं व आपल्या कुटुंबाचं काय होईल?अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला निरुत्तर करतात.
प्रथम ही गोष्ट समजून घ्या की वरील सर्व प्रकारच्या भावना व प्रश्न मनात येणे ही अतिशय नॉर्मल व नैसर्गिक अशी ओघानेच येणारी गोष्ट आहे. या भावना आणि हे प्रश्न आपलं मानसिक आरोग्य शाबूत असल्याचं लक्षण आहे. या सर्व भावना, हे सर्व प्रश्न आणि हे सर्व विचार आपल्याला आणीबाणीशी समायोजन करायला मदतच करतात. त्यामुळे कृपया घाबरून जाऊ नये. यामध्ये मानसिक आजार किंवा वेडेपणा किंवा रुग्ण झाल्याची कोणतीही लक्षणे नाहीत.
कोरोनासारखा शत्रू आपल्या दरवाजावर, टेबलवर, फरशीवर, हातावर, कपड्यांवर, चावीवर, चष्म्यावर, मास्कवर, फळ भाज्यांवर, पैशांच्या नोटांवर कुठेही जिवंत राहू शकतो व आपल्या नाका-तोंडात गुप्तपणे व आपल्या नकळत प्रवेश करतो. अशा काळात भीती, चिंता, ताण, काळजी न वाटणे म्हणजे काहीतरी मानसिक दोष असल्याचे लक्षण आहे. अशावेळी सदर व्यक्तीला स्वतःकडे, कोरोनाकडे आणि या सर्व गोष्टींकडे जागृत होऊन गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
आपण आपलं स्वतःच जग आणि आपल्या अवतीभवतीच जग यांना प्रामुख्याने दोन विभागात विभागून घ्या. त्यातला एक विभाग असेल ज्यावर आपला पूर्ण प्रभाव असेल आणि दुसरा विभाग असेल ज्यावर आपला बिलकुल काहीही प्रभाव नसेल.
स्वतःला विचारा या गोष्टीवर, घटनेवर किंवा व्यक्तीवर आपला काही प्रभाव आहे का? ऊत्तर ‘नाही’ असणाऱ्या गोष्टी वळवण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे आपल्याला आलेल्या समायोजित ताणाचे रूपांतर मानसिक आजारात होऊ शकते.
दुसरा विभाग प्रामुख्याने आपल्या प्रभावाखाली असेल आणि यावरच आपण पूर्ण लक्ष व ध्यान केंद्रित करायचं आहे.
आपलं काम, उद्योग-व्यवसाय आपण घरी बसून करू शकतो का? करू शकत असेल तर तो नक्कीच करावा.
एखादी आवडती कादंबरी आपली वाचायची राहून गेली असेल तर हीच वेळ आहे ती कादंबरी वाचायला सुरू करण्याची.
नियम, सुव्यवस्था व कायदे कानून पाळणे हे सोपे आहे व सर्वांसाठी फायद्याचे आहे हे आपण सिद्ध करू शकतो.
आपलं घर आपल्यासाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी जगातलं सर्वात सुरक्षित व प्रेमळ ठिकाण आहे हेही आपण दाखवून देऊ शकतो.
साबणाने हात धुणे, स्वतःचे कपडे धुणे, इस्त्री करणे, स्वयंपाकात मदत करणे ई. कामे केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. दरवाजाचे हॅन्डल, मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप व घरा बाहेरून आणलेल्या वस्तू शांतपणे, निवांतपणे व हळुवारपणे निर्जंतुक करू शकतो. यालाच माईंड फुलनेस मेडिटेशन असेही म्हणतात.
बातम्या, ब्रेकिंग न्यूज, सोशल मीडिया, टीका, निंदा यावरचा वेळ आपण कमी करून तो वेळ विनोदी कार्यक्रम, चित्रपट, माहितीपट, वाचन, लेखन, प्रेम, दया, सहानुभूती आणि सद्सद्विवेकबुद्धी या गोष्टींवर खर्च करू शकतो.
स्मितहास्य तसेच कृपया, धन्यवाद आणि माफ करा या शब्दांचा वापर जादूई असतो याचा अनुभव आपण घेऊ शकतो.
‘मुलांना वेळ देऊ शकत नाहीत!’ अशा पालकांसाठी तर ही सुवर्णसंधी आहे. आपल्या मुलांची मैत्री करा, त्यांना समजून घ्यायला शिका, त्यांचे विचार, भावना कुठलीही आडकाठी न ठेवता ऐकून घ्या. त्यांच्यावर निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करा.
दररोज आपल्या कुटुंबीयांसाठी कुठलीही एक प्रेमाची व दयाळूपणाची कृती करा.
घरबसल्या सूर्योदय, सूर्यास्त, पक्ष्यांची किलबिल, झाडांची सळसळ आणि रस्त्यावरील शांतता यांचा अनुभव घ्या. असे अलौकिक अनुभव मिळाल्याबद्दल निसर्गाचे व परमेश्वराचे धन्यवाद माना.
आपले व आपल्या प्रिय व्यक्तींचे बालपणाचे, लग्नाचे, तरुण पणाचे, कॉलेजमधील कार्यक्रमांचे, कौटुंबिक कार्यक्रमाचे, वाढदिवसाचे, सहलींचे फोटो अल्बम पाहून आनंदित व्हायची हीच ती वेळ आहे.
एखादा लेख, कथा, कविता लिहायची खूप दिवसापासूनची इच्छा आता घर बसल्या तुम्ही पूर्ण करू शकता.
जे नेहमीच म्हणतात की ‘दारू मी कधीही सोडू शकतो!’ हीच वेळ आहे हे सिद्ध करण्याची की आपण लिंबू शरबत व छास, ताक पिऊन सुद्धा आनंदाने राहू शकतो.
आपण नेहमी म्हणतो की ‘मीच माझ्या मनाचा मालक आहे!’ हीच वेळ आहे सिद्ध करून दाखवण्याची की हो खरंच मीच माझ्या मनाचा मालक आहे. मीच माझी वृत्ती, बोलणं, वागणं आणि माझा दृष्टिकोन ठरवतो. कोणीही, कधीही माझ्या भावनांचा व विचारांचा रिमोट कंट्रोल माझ्या परवानगीशिवाय त्यांच्या हातात घेऊ शकणार नाही. कोणत्याही घटनेचा, कोणाच्याही बोलण्याचा, कोणाच्याही प्रतिक्रियेचा मी सकारात्मक अर्थच काढेन, याची मी काळजी घेतो मग माझ्या पुढे कितीही मोठं संकट असो. हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ आहे.
स्वतःची चौकशी करून, स्वतःची विचारपूस करून, स्वतःसाठी काहीतरी प्रेमळ, मायाळू कृती स्वतःने करण्याची ही वेळ आहे. म्हणूनच आपण घरबसल्या ध्यान, प्राणायाम, योग या गोष्टी घरबसल्या करू शकतो. आपण आपला वेग मंद करायला व थोडे थांबायला शिकू शकतो. काही मदत लागल्यास ऑनलाइन मी कोणत्याही अध्यात्मिक व्यक्तीशी संपर्क साधू शकतो.
तर मग जागे व्हा, ऊठा, डोळे ऊघडा आणि स्वतःला प्रश्न विचारा, ” मी आत्ता काय करू शकतो?” आणि स्वतःचा शोध सुरू करा. हाच कोरोनाशी निगडित सर्व संकटांचा अंत असेल.
डॉ. संताजी शेळके MD
मानसोपचार तज्ञ,
बारामती
मनाचा लॉकडाऊन:
मनाचा लॉकडाऊन:
कोरोना या रोगाने आपल्याला लॉकडाऊन किंवा टाळाबंदी हा सुंदर शब्द दिला आहे. आज आपण संपूर्ण देशात कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन चा प्रभावी वापर करीत आहोत. त्यामुळे आज रुग्णसंख्या आटोक्यात राहून आपल्या देशाचे आरोग्य अबाधित राहिले आहे.
लॉकडाऊन ही संकल्पना मनाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. आयुष्यात व जीवनप्रवासात अचानक उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या काळात ही संकल्पना उपयोगी आहे. जेव्हा या काळात आपल्या भावना व विचार आपल्यावर स्वार होतात तेव्हा लॉकडाऊन गरजेचे असते. यामध्ये एकांत, चिंतन, मनन व सिंहवलोकन यांचा समावेश होतो.
आपण बालपणी एक गोष्ट नेहमी ऐकत असू. एका अतिशय दुःखात व गरिबीत असलेल्या भिकाऱ्याला एकदा देव प्रसन्न होतो. देव काय हवे ते, मागण्यास सांगतो. भिकारी खूप विचार करून, झोळी भरून सोन्याची नाणी मागतो. देव म्हणतो झोळी भरली की मला सांग कारण झोळीबाहेर पडलेली सर्व नाणी माती होणार आहेत. भिकार्याने मान्य केले पण प्रत्यक्ष झोळी भरली तरीही त्याचे समाधान होत नाही. त्याला लोभ सुटतो. तो अजून मागतो, अजून मागतो व शेवटी त्याची झोळी फाटते. आणि सर्व नाणी जमिनीवर पडून त्याची माती होते.
आपली सर्वांची अवस्था एक ना एक दिवस एका किंवा दुसऱ्या बाबतीत याच भिकाऱ्यासारखी होते. प्रत्येकाच्या झोळीचं स्वरूप व मागणीचा प्रकार वेगवेगळा असेल. आपली झोळी भरलेली असते, पण आपण थांबत नाही. आपली झोळीही आपण बदलत नाही व आपली मागणीही बदलत नाही. आपण अजून, आणखी व जास्त मागत जातो आणि शेवटी आपल्या आयुष्यात “होत्याचं नव्हतं झालं” अशी अवस्था येते.
कोरोना संकट हे निसर्गाच्या व्यवस्थेत मानवी हस्तक्षेप व त्याचा अतिरेक यामुळे आलेलं आहे. तसेच मनातील नकारात्मक भावभावनांच्या व स्वार्थी विचारांच्या अतिरेकामुळे आयुष्यात “होत्याचं नव्हतं” ही अवस्था येते. हे टाळण्यासाठी किंवा यावर मात करण्यासाठी आपण लॉकडाऊन या संकल्पनेचा वापर करू शकतो.
लॉकडाऊन दरम्यान जसं आपण आपल्या घरातच राहिलो त्या प्रमाणे मनाच्या लॉकडाऊनमध्ये आपल्या मनाला आपल्या अंतर्मनात म्हणजे घरात ठेवायचं आहे. अर्थात आपण अंतर्मुख होऊन आत्मावलोकन व आत्मनिरीक्षण करायचं आहे. आपण जाणीवपूर्वक स्वतःबद्दल काही प्रश्न करायचे आहेत. त्याची उत्तरे डोळे न उघडता, बाहेर न बघता, बाहेरचं न ऐकता आपल्या आतच शोधायची आहेत. जसं
आता मी काय विचार करत आहे?
व तो का करत आहे?
हा विचार कुठून आला आहे?
आता माझ्या मनाला कसे वाटत आहे?
काय भावना आहे?
ती कुठून आली आहे?
का आली आहे?
या प्रश्नांची उत्तरे खरीखुरी व प्रामाणिकपणे द्या. जाणीवपूर्वक शोध घ्या की राग, लोभ, मोह, मत्सर, तिरस्कार व अहंकार यांसारखे काही विचार व भावभावना आहेत काय? आढळल्यास सावध व्हा, घाबरू नका, दोष देऊ नका, समर्थन करु नका. असे काही सापडल्यास मनामध्ये तातडीने आणीबाणी व लॉकडाऊन जाहीर करा. आणीबाणीदरम्यान काहीही उक्ती व क्रुती करणे टाळा. नेहमीच्या व स्वतःला दुर्बळ व सिमीत करण्यात मदत करणाऱ्या विचारांना टाळा लावा व त्यावर अंमल न करण्याचा निश्चय करा.
काम, शिक्षण, सहकारी, वरिष्ठ, मित्र, नातेवाईक व शेजारी या सर्वांबाबतीत प्रेम, माया, दया, करूणा व बंधुत्व या भावना व विचार नैहमी लक्षात ठेवा. या भावनांना जपण्याची प्रतिज्ञा करा व त्या बाबतीत नेहमी जागरूक व सावध रहा. या बाबतीत भूतकाळात घडून गेलेल्या दुखद प्रसंगाला व कडू अनुभवाला, धडा किंवा बोध देणारे गुरु समजा. धडा व बोध यांवर ध्यान द्या.
नियम व कायदे उल्लंघन करण्याचे विचार व भावना निर्माण झाल्यास. एखाद्याच्या मानवी हक्कांची पायमल्ली करण्याची गुर्मी आल्यास. तुमच्यावर आर्थिक, शारीरिक व मानसिकरित्या अवलंबून असलेल्या लहानथोरांवर अन्याय व दुर्लक्ष करावेसे वाटल्यास. सहचारिणीला तीच्या इच्छेविरुद्ध तुमच्या इच्छेनुसार वळवावे व वागवावे वाटल्यास. रस्त्यावर रहदारीचे नियम धाब्यावर बसवून वाहन चालवावे वाटल्यास. एखाद्याला सामाजिक, मानसिक व शारीरिक ईजा करण्याची दुर्बुद्धी आल्यास. स्वतःचे काही बरेवाईट करावे, क्विट करावे किंवा जीवन संपवावे वाटल्यास. ताबडतोब व कडक लॉकडाऊन व टाळाबंदी लागू करा, स्वतः होम क्वारंटाईन व्हा. तुम्हाला जमत नसल्यास नातेवाईक व मित्रमंडळी या शूर वीर योद्ध्यांची मदत घ्यावी. अगदी टोकाला गेल्यास मानसोपचारतज्ञ या योद्ध्याची मदत घ्या. ते तुम्हाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करतील, अर्थात दवाखान्यात भरती करून उपचार देतील.
याचा परिणाम व फायदा म्हणजे तुमच्याकडून असं काही घडणार नाही ज्याबद्दल तुम्ही आयुष्यभर स्वतःला दोष देत रहाल. “होत्याचं नव्हतं झालं” याऐवजी तुम्ही म्हणाल “थँक्स लॉकडाऊन” “थँक्स क्वारंटाईन”.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती