आरसा:

आरसा:
आपलं मन हा आपल्या अस्तित्वाचा आरसा आहे. हा आरसा आपल्याला आपलं स्वतःच व आपल्या आजूबाजूच्या विश्वाचं खरंखुरं रूप दाखवितो. बाहेरच्या जगाने व आपल्या इंद्रियांनी आपल्यासमोर ठेवलेली आपली रूपे ही मायावी प्रकाराची असू शकतात. म्हणून स्वरूप जाणायची इच्छा असेल तर सुरुवात मनापासून करावी लागेल.
मनातल्या आरशात स्वतःचं आदर्श, सर्वोत्तम, उदात्त व मूल्याधिष्ठित असं स्वरूप मनचक्षुंनी पहा. हरघडी व क्षणोक्षणी ह्याच रूपामध्ये मनाने स्वतःला कल्पनेने पाहील्यावर तेच व तसेच रूप बाह्यजगात अवतरेल. हेच आपले स्वरूप व त्याकडे लक्षकेंद्रीत कार्यप्रवास आपल्याला मनशांती बहाल करेल. अशा मनशांतीरूप आरश्यातच विश्वरूप व विश्वशांती ही रूपं आपण पाहू शकू. चला तर मग हा आपला मनरूपी आरसा अंतर्बाह्य साफ, स्वच्छ व पारदर्शक बनविण्यासाठी आत्ताच सुरुवात करूयात.

सल्ल्याचा मामला

सल्ला:
जेमतेम तीस वर्षाचा असेल. स्वच्छ इस्त्री केलेले कपडे घातलेला. केस वाढलेले पण व्यवस्थित सेट केलेले. नाकातोंडाला लावलेला मास्क कानात अडकवलेला. त्याने मारलेल्या परफ्युमने कन्सल्टींग रुम सुगंधित झाली. एका पायाने थोडा लंगडत तो खुर्चीत विसावला. चेहरा पडल्यासारखं वाटला. डोळ्यांत थोडे दुःखरे व उदासवाणे भाव. अगोदरच ओळख असल्यासारखं थोडे स्मितहास्य करून त्याने बोलायला सुरुवात केली.
“डॉक्टर, तुमचा सल्ला मी तंतोतंत पाळला”.
“अरे वा! खूप छान.”
माझा सल्ला पाळणाऱ्या रूग्णांचं मला खूप कौतुक वाटतं. कारण त्यातले बरेच सल्ले तसे रोजच्या जीवनात पाळायला थोडे अवघड वाटतात. अगदी आम्हीसुद्धा अगदी तसे वागत नसतो.
“तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला.
“छान!”
“तुम्ही म्हणाला होता प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम सर्वोत्तम आहे.”
“हो! अगदी बरोबर.”
“तुम्ही म्हणाला होता, चालण्याचा व जॉगिंगचा व्यायाम सर्वोत्तम आहे.”
“अर्थात! पण तुम्हाला आवडत असेल तर!”
“डॉक्टर, मला खूप आवडतो हा व्यायाम.”
मी सुचवलेला पर्याय माझ्या रुग्णासाठी योग्य व आवडीचा आहे म्हणजे दुधात साखर. माझ्या अंगावर मुठभर मांस चढलं व मी उत्साहीत झालो.
“मी अजून काय तुमची मदत करू शकतो?”
“तुम्ही सांगितलेल्या व्यायामामुळे मला पंधरा दिवसापूर्वी खूप अडचण झाली.”
“कसली अडचण?”
“पोलिसांनी पकडून नेले आणि आम्हाला योगा व व्यायाम करायला लावले.”
“अरे पण! लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे.”
“सगळेजण म्हणत होते प्रतिकारशक्ती असेल तर कोरोना लवकर बरा होतो.”
“बरोबर आहे! पण प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजार पसरणारही नाही व होणारही नाही.”
“पण तुम्हीच म्हणाला होता! प्रतिकारशक्ती साठी व्यायाम चांगला आहे.”
“बरोबर आहे! पण हें सर्व वेळेनुसार ठरवायचे असते.”
“असं कसं! तुमचा सल्ला तर आम्हाला पाळलाच पाहिजे. परत तुम्ही म्हणणार आमचा सल्ला पाळला नाही, मग बरे कसे होणार?”
मी थोडा विचारात पडलो. मला वाईट वाटले. मला कसेसेच वाटले. आपल्या सल्ल्याने एखाद्याला अडचण येणे व त्रास होणे हे खूप वेदनादायक असते. पण मी क्षणार्धात सावरलो. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मी चालण्याचा आणि जॉगिंग चा व्यायाम कोणालाही सांगत नव्हतो. घरगुती योगा, प्राणायाम, घरकाम, डान्स व घरगूती व्यायाम याविषयी मी सल्ला देत होतो. जिज्ञासेने मी विचारलं
“हा सल्ला मी तुम्हाला कधी दिला होता?”
“नक्की आठवत नाही! पण तीन वर्ष झाली असतील!”
तो सहजपणे व निरागसतेने बोलला.
“हो का! हा व्यायाम तुम्ही तीन वर्षांपासून नियमित करत आहात.”
“नाही! तुमच्या समुपदेशनामुळे बरे वाटल्यामुळे मी व्यायाम नाही केला आणि मला गरजही नाही वाटली.”
” मग तुम्ही व्यायाम कधी सुरु केला?”
“पंधरा दिवसांपूर्वी! पहिल्याच दिवशी पोलिसांनी पकडून मला योगा व व्यायाम करायला लावला. माझ्यासारखे अजून दोनशे जण तिथं होते. पंधरा दिवस माझं अंग दुखत होतं. आता थोडं बरं वाटतंय.”
काय बोलावं ते मला सुचत नव्हतं. मी निशब्द होऊन फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. त्याचा निरागस चेहरा व सहजभाव स्पष्ट सांगत होता की अजूनही तो विचार करत होता “काय चुकलं माझं? मी तर फक्त सल्ला पाळला होता.”
“आता लॉकडाऊन आहे तोपर्यंत घरातच व्यायाम करा, योगा करा, घरकाम करा.”
“हो, धन्यवाद! येऊ का?”
“धन्यवाद!”
संपूर्ण अंगानेच लवून नमस्कार करून, कन्सल्टिंग रूम मधून तो बाहेर पडला. मी मात्र विचारात पडलो की हा सल्ला त्याला किती काळासाठी उपयोगी पडेल? त्याचे उत्तर मला हि माहित नव्हते.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

गट फिलींग:

गट फिलींग:
फिलिंग म्हणजे भावना. भावना आपल्या मनामध्ये उगम पावतात. मनाच्या ज्या भागांमध्ये भावना उगम पावतात त्या भागाला भावनिक मन असे म्हणतात. भावनिक मन ही मनाची एक प्रमुख शाखा आहे.मेंदूच्या ज्या भागाद्वारे भावनिक मनाचे कार्य चालते त्या भागाला अमिगडला असे म्हणतात. मेंदूच्या रचनेमध्ये दोन अमिगडला दोन्ही बाजूला आपल्या प्रगत मेंदूच्या खालच्या बाजूस असतात. हे अमिगडला आपल्या प्रगत व उत्क्रांत नवीन मेंदूशी जोडलेले असतात. नवीन व प्रगत मेंदूमध्ये विचार, तर्क व निर्णय यांचा उगम होतो. त्यामुळे भावना आपल्याला ठरावीक दिशेने विचार करण्यास भाग पाडतात व काही विचारांसोबत भावना ओघानेच येतात. तसेच अमिगडला हिपोकॅम्पस या स्मृति केंद्राशीसुद्धा जोडलेला असतो. म्हणूनच आठवणींना भावना जोडलेल्या असतात व भावनिक स्वरूपाचे प्रसंग दीर्घकाळ स्मृतीत राहतात. इंद्रियांच्या माध्यमातून शरीराकडे येणाऱ्या सर्व संवेदना व माहिती सर्वप्रथम अमिगडला या केंद्रात पोहोचते. त्यानंतर ती प्रगत, तार्किक व विचारशील मेंदूकडे पाठविली जाते. त्यामुळे बाह्यप्रसंगांना आपण अगोदर भावनांनी जाणतो मग विचारांनी व तर्कबुद्धीने. त्यामुळे भावना म्हणजे फिलिंग जाणणे हे योग्य निर्णयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
भावना जरी मनामध्ये उगम पावत असल्या तरी त्यांचा अनुभव मात्र आपल्याला शरीराच्या विविध भागांमध्ये होतो. गट म्हणजे इंग्रजी मध्ये आपले पोट ऊर आणि पोटातले व ऊरातले अवयव. गट फिलिंग म्हणजे भावनांची जाणीव आपल्याला पोटाद्वारे, पोटामध्ये व पोटाच्या माध्यमातून होणे. म्हणून बोलीभाषेत भावनांचं वर्णन करताना म्हणतात, “पोटामध्ये फुलपाखरू उडाल्यासारखे वाटणे, पोटात मळमळ होणे, पोटात ढवळणे, पोटात खड्डा पडणे, पोटाला गुदगुल्या होणे, उलटी आल्यासारखे वाटणे, पोटाचे नळ फुगणे, पोटात आग पडणे, पोटात भगभग वाटणे, पोटात गोळा येणे, पोट भरल्यासारखे वाटणे, अपराध पोटात घेणे, पोटात मावेनासा होणे, पोट फुटेस्तोपर्यंत, पोटावर मारणे, पोटाची वाट सरणे, पोटाशी धरावं वाटणे, उरावर ओझे होणे, उर भरून येणे, उर फुटणे, उरातून येणे, उराशी कवठाळणे, उरावर दगड ठेवल्यासारखं वाटणे, बेंबीचे देठातून येणे इत्यादी.” भीती, बेचैनी, राग, चिंता, आनंद, अपमान, अपराधभाव, माफ, आनंद, उत्साह अशा वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पोटात व उरात संवेदना तयार करतात. आपण प्रत्येक जण त्या भावना वेगवेगळ्या प्रकारे जाणू शकतो व व्यक्त करू शकतो.
गट फीलिंग्स म्हणजे आपल्या भावनिक मनाने पोटाकडे व उराकडे पाठवलेला आपल्या भावनांचा संकेत. म्हणून भावना ओळखण्यासाठी पोटातील व ऊरातील या संवेदनाचा आपण चांगला उपयोग करू शकतो. जर आपल्या गट फिलींग आपल्याला असा संकेत देत असतील की समोरील प्रसंग, व्यक्ती किंवा आपला निर्णय हा आपल्यासाठी धोकादायक आहे तर आपण त्याप्रमाणेच वागतो. जर आपण आपल्या गट फिलींगकडे दुर्लक्ष केले तर किंवा आपण त्याबद्दल अनभिज्ञ राहीलो तर आपल्या समोरील धोके आपण टाळू शकणार नाही.
गट फिलींग या आपल्याला प्रेम, माया, करूणा व प्रीती या भावनासुद्धा संकेता द्वारे सांगत असतात. यामध्ये पोटाबरोबर ऊरातील संकेतांचीही मदत होते. आपण नेहमीच या संकेतांकडे लक्ष दिले पाहिजे व त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. जर आपण भावना व भावनिक संकेत वगळून म्हणजे गट फिलिंग वगळून निर्णय घेतले तर ते सर्व योग्य व सर्वोत्तम नसतील. गट फीलिंग्सला फसवण्याचा प्रयत्न करून आपण काही निर्णय फक्त तर्क व बुद्धीच्या जोरावर घेतले तर त्याचे परिणाम हे आपल्या इच्छेविरुद्ध व अनपेक्षित असणार आहेत.
म्हणून गट फिलिंग्जकडे योग्य ते लक्ष देऊन घेतलेले निर्णय हे फक्त लॉजिक, तर्क आणि बुद्धी यांच्या साह्याने घेतलेल्या निर्णयाला पेक्षा नक्कीच आपल्याला चांगले परिणाम देतील. अर्थात फक्त बुद्धीने व तर्काने घेतलेल्या निर्णयापेक्षा सद्सद्विवेकबुद्धीने घेतलेले निर्णय व आवड निवड लक्षात ठेऊन घेतलेले निर्णय हे आपल्याला चांगले परिणाम देऊ शकतात. आपली आवड व आपली निवड ही आपल्या गट फिलींग आपल्याला उत्तम प्रकारे सांगू शकतात. म्हणून जीवनातील असे निर्णय की ज्या निर्णयांचा आपल्या दूरगामी आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडणार आहे व परिणाम होणार आहे, ते घेताना गट फीलिंग्ज कडे दुर्लक्ष करू नये. कॉलेज निवडताना, करियर निवडताना, मित्र निवडताना, जीवनसाथी निवडताना, बिझनेस पार्टनर निवडताना, पैशांचे व जमिनींचे व्यवहार करताना आपल्याला गट फिलिंग मदत करतात. गट फीलिंग्जबद्दल संपूर्ण समाधानी होईपर्यंत व गट फीलिंग्ज पूर्णतः प्रेम, दया, माया व करुणा या भावनांचा संकेत देईपर्यंत व्यवहार किंवा निवड वा निर्णय करू नये. गट फिलिंग्ज जर भिती, चिंता, काळजी, संशय, राग, चीड, मोह किंवा मत्सर यापैकी काहीही दर्शवित असेल व संकेत करत असेल तर असा निर्णय, निवड व व्यवहार तडकाफडकी करू नये. वेळ घ्या, थोरामोठ्यांशी बोला, अभ्यास करा, माहिती मिळवा, चिंतन मनन करा, सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करा व आपल्या गट फीलिंग च्या आधारे निर्णय घ्या. असा निर्णय तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल व त्याप्रती तुम्ही उत्साही व रोमांचित असाल. अशा प्रकारच्या निर्णय पद्धतीमुळे तुम्ही जबाबदारीने काम कराल व त्यामुळे तुमचा आत्मविश्वास व आत्मसन्मान दिवसेंदिवस वाढतच जाईल.
यासाठी आजपासून एक काम करा. कोणत्याही प्रसंगी तुमच्या पोटातील व ऊरातील संवेदनांवर लक्ष द्या. त्या संवेदना तुमच्या शब्दांत व चित्ररुपात मांडणी करायला शिका. त्या वर्णन केलेल्या विचारांना एका किंवा अधिक भावनांचं नाव द्या. त्या भावनेतून येणाऱ्या विचारांना व आठवणींना त्या भावनेचे नाव द्या. गट फिलिंग तुम्हाला तुमच्या भावनांबद्दल माहिती देतील व ह्या भावना तुम्हाला तुमच्यासाठी सर्वोत्तम निर्णय घ्यायला मदत करतील. सराव करून करून तुम्ही शिकाल की कोणत्या गट फिलिंग ला किती महत्व द्यायचे? म्हणून आजच सरावाला सुरुवात करा.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

हस्तमैथुन: काळाची गरज

हस्तमैथुन: काळाची गरज
लाँकडाऊनच्या काळात जगभरात कीतीतरी लाख स्रिया इच्छेविरुद्ध गरोदर झाल्याची बातमी जगभर चर्चेचा विषय ठरला. कितीतरी स्रियांना घरगुती हिंसाचार व अत्याचार सहन करावा लागला. त्याचे एक कारण कामेच्छांची अत्रुप्ती हेही होते. काही स्त्रियांनी पतीच्या कामेच्छांना वैतागून लाँकडाऊन लवकर उठवण्यासाठी अध्यक्षांना पत्रेही लिहिली. या कामेच्छा व कामभावना एकट्याने एकांतात त्रुप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हस्तमैथुन.
आतापर्यंत पौगंडावस्थेसाठी व अविवाहितांसाठी हस्तमैथुन उत्तम पर्याय होता. परंतु आता विवाहित व कामेच्छा जास्त प्रमाणात असणाऱ्यांना हस्तमैथुन वरदान आहे. त्यामुळे नकोशे व अनैच्छिक गरोदरपण टाळता येते तसेच पतीपत्नीमधील कामेच्छा फरकामुळे येणारा कडवटपणाही टाळता येतो व घरगुती हिंसाचार खूपच कमी होतो. हस्तमैथुनाचे आपल्याला अजूनही बरेच बोनस फायदे होतात यांचा विचार होणे गरजेचे आहे.
आपण सर्व मानवप्राणी आहोत. आपल्याला लैंगिक गरजा आणि इच्छा वाटणे व त्या पूर्ण करणे सामान्य आहे. यासाठी आपल्याला जोडीदारावर जबरदस्ती करण्याची गरजसुद्धा नाही. विनवण्या करणे, धमक्या देणे, लालूच दाखवीणे, भावनिक ब्लँकमेल करणे इत्यादी प्रकारांची गरज पडणार नाही. कुठल्याही अडचणीच्या काळात हस्तमैथुन आपल्या प्रिय मित्रासारखा नेहमीच आपली सोबत देईल. हस्तमैथुनाला मूठ, मूठ्ठ्या किंवा पिचकारी असेही बोलतात. ‘आपला हात जगन्नाथ’ अशा मौलिक तत्वज्ञानाचीही उपमा हस्तमैथुन या क्रियेला दिली जाते.
आपल्याला या विषयावर उघडपणे बोलणे आवडत नाही. तरीही या विषयावर मित्रांसोबत बोलताना या विषयाने रोमांचित व आनंदी झाला नाही असा माणूस सापडणार नाही. चार पाच मित्रांचं कोंडाळं फिदीफिदी हसत बराच वेळ गप्पा मारत असतील तर गप्पांचा विषय कामेच्छा असण्याची शक्यता ९५% असते. ९०% कॉलेजातील विद्यार्थ्यांनी हस्तमैथून केलेले असते. उरलेल्यांपैकी ९९% खोटे बोलत असतात. हस्तमैथून करण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. हे माहिती झाल्यावर कदाचित आपले हस्तमैथुन व त्याबद्दल असणारे आपले गैरसमज दूर होतील.
आता कोरोना व लाँकडाऊन यामुळे ताणतणाव खूपच वाढला आहे. हस्तमैथूनामुळे चांगले वाटायला लावणारी रसायने मेंदूत तयार होतात. त्यामूळे आपण हस्तमैथुन करून तणावावर विजय मिळवू शकतो. हस्तमैथुनामूळे मेंदूमध्ये आनंद देणारी एंडोर्फिन नावाची रसायने वाढतात.
हस्तमैथूनामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. आपण हस्तमैथूनावेळी येणाऱ्या परमोच्चबिंदूच्या काही मिनिटांनंतरच गाढ झोपी जातो. हस्तमैथूनामुळे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन यासारखी सुखदायक व शांतीकारक रसायने तयार होतात ज्यामुळे आपण शांतपणे झोपी जातो. माणूस आरामदायक, मनमोकळा आणि चिंतामुक्त होतो.
हस्तमैथून सर्दी व फ्लू बरा करण्यास मदत करतो. हस्तमैथून व त्यातील परमोच्चबिंदूमुळे शरीरातील “जंतू मारक” पेशी वाढतात व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अर्थात कोरोनाशी दोन हात करताना ही शक्ती तुम्हाला फायदेशीर ठरेल.
तुम्ही समागमामध्ये वेळेआधीच होणाऱ्या विर्यपतनाबद्दल चिंतेत असाल तर हस्तमैथून त्यावर प्रभावी उपाय आहे. नियोजित संबंधाच्या दोन तास अगोदरच हस्तमैथुन करा. त्यामुळे आपणास विर्यपतन होण्याच्या वेळेवर अधिक नियंत्रण मिळेल. बघा प्रयोग करून, नक्की यश मिळेल.
हस्तमैथून हा लैंगिक संबंध व लैंगिक आरोग्य समाधानकारक ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. हस्तमैथुनामुळे जननेंद्रियांचा रक्तप्रवाह वाढतो व लिंगातील नसा व शिरा व्यवस्थित कार्य करतात. हस्तमैथुनामुळे लिंग व प्रोस्टेट ग्रंथीचा कँसर होण्याची शक्यता कमी होते.
हस्तमैथूनामुळे हृदय, धमन्या व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. ह्रदयविकार व पक्षाघात हे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी असते.
हस्तमैथुन करणारे लोक आपल्या वयापेक्षा जास्त तरुण व तेजस्वी दिसतात. आठवड्यातून तीन वेळा हस्तमैथुन केलेले जास्त निरोगी व चमकदार कांतीचे दिसतात. माइंडफुल हस्तमैथुन केल्यास आपण आपल्या शरीरात पूर्णपणे उपस्थित राहतो व प्रत्येक संवेदना जाणून घेतो. त्यामुळे आपल्या मेंदूत नवीन रसायने तयार होतात जे आपला आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढवतात.
हस्तमैथुन ही आपली एकट्याची व एकांतातील क्रिया आहे. हस्तमैथुन केल्यामुळे व्यक्तीकडून कोणतेही बेपर्वा किंवा आवेगजन्य लैंगिक वर्तन टाळले जाते. ‘आली लहर केला कहर पिला जहर’ अशी मनस्थिती करणारे एचआयव्ही व इतर लैंगिक आजार टाळले जातात. काममोहात पाडणाऱ्या व तोल ढासळवणार्या भेटींपूर्वी, पार्टीपूर्वी, समारंभापूर्वी यथेच्छ हस्तमैथुन केल्यास लैंगिक शोषण, अत्याचार व बलात्कार यांचं प्रमाण खूपच कमी होईल.
भावनोत्कटता, परमोच्च चरमबिंदू व ऐच्छिक कल्पनाविश्व या अमूल्य देणग्या हस्तमैथुन माणसाला बहाल करतो. हस्तमैथुनामुळे पुरुष सरासरीपेक्षापेक्षा जास्त काळ व आनंदी जीवन जगतात. वैवाहिक जीवनात जोडीदार स्री व पुरुष यांच्या कामभावनांच्या इच्छा, तीव्रता, वारंवारता व इच्छापूर्तीच्या पद्धती यांत फरक असतो. हा फरक न्याय्य, मानवीहक्क व लोकशाही मार्गाने भरून काढण्यासाठी हस्तमैथुन हे वरदान आहे. वैवाहिक जीवनातील ताणतणाव कमी होतात व दोघांचेही जीवन व जीवनमान उंचावते. अर्थात हस्तमैथुन करा व सुखी, समाधानी, वैभवशाली, निरामय, दीर्घायुषी व संतुलित जीवन जगा व जगू द्या.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

स्किझोफ्रेनिया आधारवड:

स्किझोफ्रेनिया आधारवड:
स्किझोफ्रेनिया हा आजार कुळात, बुडात वा नात्यात नाही असा माणूस जगभरात सापडणार नाही. स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीस मदत करण्यासाठी आधार देणाऱ्या नातेवाईकांनी प्रशिक्षित असणे खूप गरजेचे आहे. हेच नातेवाईक रूग्णाचे उज्वल भविष्य व भवितव्य घडवणारे आधारवड असतात. मानसोपचारतज्ज्ञ त्यांच्या सहयोगाने व मदतीने या दुर्धर आजारावर विजय मिळवू शकतात. या आधारवडांविषयी काही गुजगोष्टी आज आपण करूयात.

स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल आणि त्यावरील उपचारांबद्दल जाणून घ्या. कोणकोणती लक्षणे असतात, लक्षणांचा व आजाराचा सामना कसा करावा, रुग्णाला मदत घेण्यास प्रोत्साहित कसे करावे, अडथळे कसे हाताळावे हे समजून घ्या. औषधोपचार व कौटुंबिक निर्णय घेण्यासाठी लागणारी सर्व माहिती मिळवा. सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक व वकीलांची गरजेनुसार मदत घ्यावी.
स्वतःच्या व रुग्णाच्या ताणतणाव व त्यांची कारणे व प्रतिक्रिया यांवर लक्ष ठेवा. ताणतणावामुळे स्किझोफ्रेनियाची लक्षणे भडकू शकतात, आजार उलटूही शकतो. आपल्या घरात आधारमय, प्रेमळ, समजूतदार आणि सहाय्यक वातावरण तयार करा.

स्किझोफ्रेनिया आजार हे एक वास्तविक आव्हान आहे. आजाराच्या वास्तवाचे नेहमी भान ठेवा. मेंदूतील रासायनिक बदलाला व त्यातून उद्भवणारा आजार याला कोणीही जबाबदार नसते. आजार होण्यासाठी कोणालाही दोषी धरू नका. त्याऐवजी आजाराच्या निराकरणावर व औषध उपचारावर लक्ष केंद्रीत करा. आपल्या प्रिय व्यक्तीस सोपी व सहजसाध्य व्यक्तीगत उद्दीष्टे ठरवण्यात व ती साध्य करण्यात मदत करा.

स्किझोफ्रेनियाच्या व्यक्तीस तो दैनंदिन गोष्टी करण्यास सक्षम व शक्तीमान असल्याची खात्री द्या. सावधगिरी बाळगा, तुम्ही त्याला जमत असलेल्या गोष्टी स्वतः करू नका, त्याच्या त्यालाच करू द्या. स्वत: ची मदत देताना उपकारांची भावना ठेऊ नका. तो स्वतंत्र व सक्षम असल्याचे त्याला वारंवार पण प्रेमाने त्याला सांगत रहा.

स्वतःची व स्वतःच्या आरोग्याची व आवडीनिवडींची काळजी घ्या, हे नक्कीच स्वार्थी नाही. स्किझोफ्रेनियामुळे संपूर्ण कुटुंबावर खूप जास्त प्रमाणात ताण येऊ शकतो. तो आपल्या संपूर्ण आयुष्याचा ताबा घेऊन शकतो. जर आपण स्वतः ताणतणावात असाल तर आपण स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीचा ताणतणाव वाढवाल. तुम्ही स्वतः निरोगी जीवनशैलीच्या सवयींचा अवलंब करा. आपल्या स्वत:च्या शारिरीक, मानसिक तसेच सामाजिक आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबातील एकमेकांना प्रोत्साहित करून सर्वांनी अधिकाधिक सक्षम व्हायचा प्रयत्न करा. समाजाच्या, शेजारच्या व इतर लोकांच्या संपर्कात रहावे, रुग्णाच्या संशयात सामील होऊन समाजापासून दूर जाऊ नये. आपली काळजी असलेल्या एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद साधावा व गरजेनुसार त्यांची मदत घ्यावी. एखादा मित्र, कौटुंबिक सदस्य, स्किझोफ्रेनिया गट सदस्य किंवा समुपदेशक यांच्याशी तुम्ही मनमोकळे बोलू शकता.

नियमित शारीरिक व्यायाम करा, त्यामुळे तणाव कमी होतो. आपल्या स्किझोफ्रेनिया प्रियजनाबरोबर , दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम व गप्पा गोष्टी करा. निरोगी, घरगुती व समतोल आहार घ्या. साखर आणि सफेद पिष्ठमय पदार्थ कमीतकमी कमी घ्या. पालेभाज्या, फळभाज्या व फळे भरपूर प्रमाणात घ्या. आपले लक्ष, ऊर्जा आणि दृष्टीकोन सुधारण्यासाठी मासे, फिश ऑइल, अक्रोड व बदाम खा. त्यातून मिळणारी ओमेगा ३ फँटी अँसिड ही मेंदूला तजेलदार बनवतात. स्किझोफ्रेनिया व्यक्तीलाही अशा आहारासाठी आग्रही असा.

आपल्या प्रिय व्यक्तीच्या निदानाबरोबर आलेल्या आपल्या नकारात्मक भावना स्वीकारा. राग, चिडचिड, संशय, मत्सर इत्यादी भावनांचं नियमन करा. त्याविषयी तुमच्या डॉक्टरांशी बोला, अन्यथा या भावना उपचारतील व निकोप नातेसंबंधातील अडथळे बनतील. भावनिक ताणतणावाचे व्यवस्थापन करा आणि आपल्या मनाची मनःस्थिती संतुलित ठेवण्यासाठी गरज पडल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी.

स्वतःच्या मौजमजेसाठी, छंदासाठी व विरंगुळ्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. तुम्हाला आनंद देत असलेल्या गोष्टी जसे निसर्गामध्ये वेळ घालवणे, मित्रांना भेटणे किंवा एखादे चांगले पुस्तक वाचणे हे दररोज करा. आपल्या प्रिय व्यक्तीसही असे करण्यास प्रोत्साहित करा. पुरेशी झोप घ्या. ध्यान, खोल श्वास, योग किंवा स्नायू विश्रांती यामुळे आपले मन आणि शरीर पुन्हा ताजेतवाने व समतोल बनू शकते.

प्रिय व्यक्तीच्या स्किझोफ्रेनिया औषधउपचारांना समर्थन व पाठिंबा द्या. लवकर औषधोपचार केल्यास स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांत चांगला व कायमचा फरक पडतो. औषधे नियमित व स्वतःहून घेतल्यास प्रिय व्यक्तीचे जीवन आश्चर्यकारकरीत्या पूर्वपदावर येते. म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीस मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरांना भेटण्यास आणि उपचार सुरू करण्यास मदत करा. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी दैनंदिन सर्व काही स्वतः करू नका. त्यांना दैनंदिन जीवनात अधिकाधिक कौशल्य विकसित करण्यात व त्यांची क्षमता वाढविण्यात मदत करा.

स्किझोफ्रेनिया हा बहुतेक वेळा पुनपुन्हा उद्भवणारा व आयुष्यभर आपली सोबत करणारा आजार असतो. तीव्र लक्षणांमधून लवकरात लवकर सूट मिळण्यासाठी लवकरात लवकर औषधे सुरू करावी लागतात. आपल्या प्रिय व्यक्तीस स्व-मदत गट मेळाव्यात उपस्थित राहण्यास प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे स्वातंत्र्य व स्व-मदत पद्धती शिकण्याची व वापरण्याची संधी त्याला मिळू शकते. यामुळे भविष्यातील आजार उलटण्याची शक्यता, आजाराचा कालावधी आणि वारंवारता कमी होते.
उपचार सुरु केल्यानंतर औषधे नियमितपणे घेतली जातात, याचे काळजीपूर्वक निरीक्षण व परिक्षण करा. आपला प्रिय व्यक्ती सुधारणेच्या ट्रॅकवर आहे हे सुनिश्चित करा. अधिकाधिक फायदा होण्यासाठी औषधे दररोज व नियमित घेणे आवश्यक असते. औषधांच्या साइड इफेक्ट्सकडे लक्ष द्यावे, त्याविषयी डॉक्टरांशी बोलावे. साइड इफेक्ट्समुळे बरेच लोक त्यांची औषधे घेणे बंद करतात. कोणतेही त्रासदायक दुष्परिणाम, डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यावे. डॉक्टर तुम्हाला औषधे बदलून देतील. साईड इफेक्ट्सचा अभ्यास करून तुमच्या प्रिय व्यक्तीस सर्वोत्तम औषध निवडण्यास तुमच्या डॉक्टरांना मदत करा. आपल्या प्रिय व्यक्तीला नियमितपणे औषधे घेण्यास प्रोत्साहित करा. काही लोक औषधांना नकार देतात किंवा त्यांना दररोजचा डोस लक्षात ठेवण्यास त्रास होतो. अशा वेळी औषध कॅलेंडर्स, साप्ताहिक डबा आणि मोबाईलमधील टाइमर या पद्धतींची मदत होते. गरज वाटल्यास साप्ताहिक किंवा मासिक इंजेक्शन हाही एक पर्याय उपलब्ध असतो.

आपल्या प्रिय व्यक्तीस कोणत्याही धोकादायक मादक पदार्थांचे व दारूचे सेवन टाळण्यास मदत करा. स्किझोफ्रेनिया औषधांबरोबर दारू किंवा बेकायदेशीर औषधे घेणे हानिकारक आहे. अशा प्रिय व्यक्तीने वाहन चालवणे, शस्त्र बाळगणे व मशिनरी चालवणे अत्यंत धोकादायक आहे, हे कायम लक्षात ठेवा. प्रिय व्यक्ती आत्महत्या, खून, बदला, अँसिड इत्यादी हिंसात्मक विषयावर वारंवार बोलत असल्यास त्या गोष्टी कधीही हलक्यात घेऊ नका, लगेचच डॉक्टरांना बोला. घरातील सर्व प्रकारची शस्त्रे व हत्यारे तसेच किटकनाशके व विषारी द्रव्ये कुलुपात बंद ठेवा. सर्व अंतर्गत खोल्यांचे व बाथरूमचे दरवाजे सहजपणे उघडतील अशी व्यवस्था करून ठेवा. गरज वाटल्यास ईस्पितळात भरतीसाठी तयारी ठेवा. अद्ययावत अशा विद्युत उपचारासाठी लवकरात लवकर परवानगी घ्यावी. जेवढ्या लवकर उपचार तेवढे बरे होण्याची शक्यता व टक्केवारी जास्त.

आपल्या कुटुंबातील प्रिय सदस्याचे वागणे, मनःस्थिती आणि औषधोपचाराच्या प्रतिसादांचा व बदलांचा मागोवा एका डायरीत लिहा. त्यामुळे स्किझोफ्रेनियाचा झटका पुन्हा आल्याचे आपण लवकरात लवकर ओळखू शकतो. आजार उलटल्याची व झटका आल्याची सामान्य चेतावणी लक्षणे खालीलप्रमाणे:
१. झोप न लागणे.
२. सामाजातून माघार घेणे, घरातून बाहेर न पडणे.
३. वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे.
४. विकृत वागण्यात वाढ होणे.
५. शत्रुत्व व मत्सर वाढणे.
६. गोंधळात टाकणारे किंवा मूर्खपणाचे व अशक्य काहीही बोलणे.
७. विचित्र रितीने गायब होणे, हरवणे.
८. मतिभ्रम, भास, भीती,
९. स्वतःशी बडबड, शिवीगाळ.

प्रिय व्यक्तीवर आलेल्या स्किझोफ्रेनिया झटक्याच्या संकटावेळी त्याला योग्य रीतीने हाताळणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. तीव्र मनोविकृतीमुळे तुमची प्रिय व्यक्ती तर्क करू शकत नाही. त्यामुळे तुमची प्रिय व्यक्ती कशी वागेल, काय बोलेल व काय प्रतिक्रिया देईल याबद्दल तुम्हाला काहीच अंदाज लावता येणार नाही. नियंत्रण व स्वातंत्र्य गमावण्याच्या भावनांनी ती व्यक्ती घाबरलेली असते. म्हणून त्यांच्यावर चिडचिड करू नका किंवा राग व्यक्त करू नका.
शांतपणे आणि फक्त शांतपणेच बोला. ओरडू नका किंवा धमकी देऊ नका.
त्याला नावे ठेऊ नका, हात उगारू नका, मारहाण करू नका. त्याच्या आजारातून आलेल्या अपंगत्वावरून टोमणे मारू नका.
टीव्ही, संगणक, फ्लूरोसंट लाइट्स इ. बंद करा. त्यामुळे त्याची उद्दीपनं कमी होऊन विचलीत होणे कमी होते. त्यावेळी आसपास असणाऱ्या लोकांना जाण्यास सांगा. जितके लोक कमी असतिल तितके चांगले असते.
प्रिय व्यक्तीशी थेट, सतत डोळ्यात डोळे घालून बोलणे टाळा. डोळे मोठे करणे, तोंड वेडावणे व तुसड्यासारखे तिरसट व तिरस्कारयुक्त आवाज करणे टाळा. त्या व्यक्तीला स्पर्श करणे टाळा. तुम्ही खाली बसा व त्या व्यक्तीला खाली बसण्यास सांगा.
यावरून आपल्या लक्षात येईल की प्रिय व्यक्तीच्या स्किझोफ्रेनिया या आजारात नातेवाईकांची भूमिका हिरो, दिग्दर्शक, व्यवस्थापक अशी बहुरंगी व बहुढंगी आहे. उपचारातील बाकी सर्व सहकाऱ्यांची भूमिका साईड हिरोंची आहे. आज जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाच्या निमित्ताने या आधारवडाला माझा सविनय फेरा व मानाचा मुजरा.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती

शिष्य

आपल्याला शिष्य होऊन शिकण्याची आवड असेल व नेमके काय शिकायचे आहे याची स्पष्ट जाण असेल तर अनंत रुपामध्ये, सजीव किंवा निर्जीव; गुरु आपल्यासमोर हजर होतो.

आत्मावलोकन

आपण जे बोलतोय अथवा वागतोय त्याचा आपला स्वतःचा अर्थ व हेतू काय? हे शोधणे म्हणजे आत्मावलोकन आणि सापडलेल्या अर्थांचा व हेतूंचा आपल्या आदर्शांशी, मूल्यांशी व ध्येयांशी ताळमेळ किंवा सुसंगती आहे काय? हे शोधणे म्हणजे आत्मजाण.

किंमत स्वतःची

ताण आल्यावर तसेच मतभेद व वाद झाल्यावर आपण ज्या पद्धतीने बोलतो व वागतो आणि ज्या प्रकारचे शब्द व वाक्ये वापरतो तोच आपल्या स्वतःच्या जीवनाचा स्तर असतो व तीच आपली स्वतःची लायकी व किंमत असते. तो स्तर अथवा ती किंमत व लायकी आपल्याला मान्य नसेल व ती आपल्या अपेक्षांशी आणि आदर्शांशी सुसंगत नसेल तर आपल्याला आपला आत्मविकास करण्याची ती एक संधी असेल.