जर आपल्या आवडी, निवडी व अपेक्षा या आपल्या इच्छा, आकांक्षा व उद्दिष्टे यापेक्षा वरचढ ठरत असतील तर आपल्याला त्याग हे मूल्य शिकण्याची ती एक मोठी संधी असेल.
रागावले असाल तर:
रागावले असाल तर:
रस्त्यावरून येताजाता बुंगाट सुटलेल्या गाड्या पहायला मिळतात. असं वाटतं की हे इच्छितस्थळी चाललेले नाहीत, तर आपला राग व्यक्त करत आहेत. हँडल पाठीमागे किंवा स्टेरिंग पाठीमागे बसलेले शरीर महत्त्वाचे नसून ते शरीर चालविणारे मन व त्या मनाची मनस्थिती महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा ताण आल्यावर, बेचैन झाल्यावर, राग आल्यावर, चिडचिड झाल्यावर “आम्ही लॉंग ड्राईव्हला जातो” असे अभिमानाने सांगणारे लोक आम्ही नेहमी पाहतो. इच्छित स्थळी चालला असाल तर नक्कीच तुम्ही सुरक्षित पणे वाहन चालवणार. मात्र रागावला, चिडला असाल आणि राग कमी करण्यासाठी किंवा मूड व्यवस्थित होण्यासाठी ड्रायव्हिंग करत असाल तर, सावधान! रस्ता, रस्त्यावरचे ड्रायव्हिंग या गोष्टी ताणतणाव नक्कीच कमी करू शकत नाहीत. परंतु मनस्थितीतील हेलकावे, विचारांच्या लहरी, विचलित लक्ष व नजर यामधून एक्सीडेंट चे प्रमाण मात्र नक्कीच वाढेल. रस्त्यावरील एक्सीडेंटच्या कारणांमध्ये दारू नंतर विचलित मनस्थितीचाच दुसरा नंबर लागतो. अर्थात दारू मनस्थिती विचारीत करते आणि मनस्थिती विचलित झाल्यामुळेच लोक दारू पितात म्हणूनच विचलित मनस्थिती हे हे एक्सीडेंट चे प्रथम कारण आहे असं म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. दुसऱ्याच्या जिवाला धोका उत्पन्न होतो जो तुमच्या ड्रायव्हिंगमुळे नसून मनस्थितीमुळे असतो, हे लक्षात घ्या. म्हणून ड्रायव्हिंग करताना स्वतःची मनस्थिती शांत आणि व्यवस्थित तर ठेवाच परंतु दुसऱ्याची मनस्थिती विचलित असू शकते आणि त्याच्याकडून चूक होऊ शकते जी आपल्या जीवावर उठू शकते हे सुद्धा लक्षात असू द्यात.
राग, तणाव, विफलता, नैराश्य, बेचैनी इ. निवळण्यासाठी ड्रायव्हिंग ऐवजी चालायला जा. लांबच लांब रस्त्याने चालताना तुमचा राग विरघळून जाईल. निसर्गाच्या व झाडांच्या सानिध्यात तुमचे मन प्रफुल्लित होऊन जाईल. शरीराला आलेला घाम, वाढलेला श्वास व ह्रुदयाची वाढलेली धडधड तुमच्या शरीरात तयार झालेल्या ऊर्जेला चांगल्या पद्धतीने बाहेर फेकेल. रागातून रागाकडे नेणाऱ्या विचार चक्रातून बाहेर येऊन तुम्ही निसर्ग चक्राशी एकमत व्हाल. तुमचे मन शांत, स्पष्ट व आशावादी होईल जेणेकरून ताणावर तुम्ही योग्य प्रकारे विचार करू शकाल.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
टाइमपास:
टाइमपास:
टाइमपास ही संकल्पना आज-काल फारच प्रसिद्ध आहे. कॉलेजात काय केलं? सुट्टीत घरी काय केलं? थेटर मध्ये गेल्यावर काय केलं? कामावर गेल्यावर काय केलं? मित्रांना भेटल्यावर काय केलं? अशा सर्व प्रश्नांचे साचेबद्ध उत्तर म्हणजे टाईमपास. टाईमपास केला म्हणजे वेळ काटला, वेळ कटवला किंवा वेळेला चकवा दिला, असं त्यांना म्हणायचं असतं. पण प्रत्यक्ष मात्र वेळेला कोणी काटू शकत नाही कटवू शकत नाही आणि चकवाही देऊ शकत नाही. अशा प्रकारच्या खूप साऱ्या वेळांची गोळाबेरीज म्हणजे काळ ज्याला आपण कोणीही चकवा देऊ शकत नाही.
आलेल्या प्रत्येक वेळेला, वेळ देऊन आपण न्याय दिला तर आपला काळ आपल्याला साथ देणार, ज्या काळाला आपण सुकाळ किंवा चांगला काळ म्हणू. वेळेला आपण योग्य तो न्याय न दिल्यास, अर्थात टाईमपास केल्यास काळ आपल्याला न्याय देऊ शकत नाही आणि आपली साथही देऊ शकत नाही, अशा काळाला आपण वाईट काळ किंवा कर्दनकाळ म्हणू. वेळेला, वेळ न दिल्याचा पश्चाताप करायला लावणारी व येणाऱ्या वेळेला, उचीत वेळ देण्याचा निश्चय करायला लावणारा काळ म्हणजे संधीकाळ. संधीकाळाचा वापरही आपण लेखाजोखा, पाठपुरावा व सिंहावलोकन यांसाठी वेळ देऊन करायला हवा. आपण आपल्या वेळेचं काय करतो यावरून आपला काळ ठरतो. हा काळ मग ठरवतो की आपलं काय करायचं. म्हणजे अगोदर वेळ येते, या वेळेला आपण कशा प्रकारे वेळ देतो ते महत्त्वाचे आहे. वेळ मारून नेणाऱ्या व वेळेला चकवा देणाऱ्या लोकांचा काळ हा त्यांच्या मनासारखा नसतो. म्हणून म्हणतात,”वेळ आली होती पण काळ आला नव्हता”, असं म्हणतात. अर्थात वेळ अगोदर येते, वेळेला दिलेल्या वेळेनुसार काळ येतो.
“आत्ता नको, पुढच्या वेळेला बघु,” असे परतपरत म्हणणार्या लोकांना काळ साथ देत नाही. “मागच्या वेळी चुका झाल्या त्या झाल्या, आता पुढे अशी वेळ येऊ देणार नाही, योग्य वेळी योग्य गोष्टींना योग्य वेळ देऊ,” असा संकल्प करणाऱ्या लोकांना काळ साथ देतो. म्हणून पुढच्या वेळेची वाट पाहत बसू नका. आत्ताच्या वेळीच कसे सर्वकाही उत्तमोत्तम करता येईल आणि हीच वेळ कशी आपल्यासाठी वापरून घेता येईल ते ठरवा.
काळ आपल्यासाठी थांबत नाही व आपल्या आवाक्यात येतही नाही. वेळ मात्र आपल्या हातात असते, ती आपल्या समोर असते व आपल्या आवाक्यातसुद्धा असते. आपल्याला वाटतं आपण टाईमपास करत आहोत, मजेत वेळ घालवत आहोत, पण तसं नाही. वेळ, प्रत्येक वेळी आपलं मूल्यांकन करत असते. हळूहळू या वेळांचं रूपांतर काळामध्ये होते. हा काळ आपल्याला आपल्या वेळांच्या मूल्यांकनानुसार फळ देतो. मग बऱ्याच वेळा आपण उद्वेगाने म्हणतो “अरेरे! त्यावेळी केलं असतं तर बरं झालं असतं,” किंवा “त्या वेळी हे केलं नसतं तर बरं झालं असतं,”. म्हणून वेळच्या वेळीच, वेळेचे महत्त्व ओळखा. वेळेसाठी, वेळ काढणारा माणूस काळावर विजय मिळवतो. वेळेला महत्त्व न देणाऱ्या माणसावर काळ हावी होतो, खायला उठतो. गेलेली वेळ परत येत नाही, पण काळ, चांगला किंवा वाईट मात्र कायम आपल्या सोबत राहतो, स्मृतीत राहातो. तरूणांसमोर भरपूर वेळ असतो, त्या वेळेचा योग्य वेळी व योग्य वापर करायला हवा, म्हणजे उतारवयात काळ आपला दोस्त होऊन जाईल. जेव्हा आणि जे आपण करायला हवं ते त्यात्यावेळेला आपण करायला हवं. ज्यावेळी आपण जी गोष्ट करायला हवी होती, ती योग्य रित्या पूर्ण केली, असा काळ आपण कधीच विसरू शकत नाही. म्हणून वेळेला योग्य न्याय द्या.
कॉलेजात असाल तो वेळ कॉलेजसाठी व शिकण्यासाठीच द्या. घरी असाल तो वेळ घरातील नातीगोती आणि घरातील कामांसाठीच द्या. कामावर असाल तो वेळ कामासाठीच द्या. मित्रांमध्ये असाल तो वेळ मित्रांसाठीच व मनोरंजनामध्ये असाल तो वेळ मनोरंजनासाठीच द्या. पत्नीसोबत मुलांसोबत असाल तो वेळ पत्नीसाठी व मुलांसाठीच द्या. हे सर्व केल्यावर येणारा काळ तुमच्यासमोर सुख, समाधान, शांती याचा मखमली गालीचा तुमच्या वाटेवर अंथरूण, यशाचा पुष्पगुच्छ व सम्रुद्धीचा हार हातात घेऊन तुमच्या स्वागतासाठी सदैव तयार असेल.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
अंतर्वाद
“तू तू, मी मी होणे” म्हणजे प्रत्यक्षात माझ्या एका “मी”चं माझ्याच दुसऱ्या “मी”शी वाद किंवा भांडण होणे. हे भांडण मिटवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे आपले जाग्रुत मन. हा वाद मिटवणारा सर्वोत्तम मध्यस्थी म्हणजे आपले अंतर्मन. चुकलं माकलं तर माफ करणारा आपला जिवलग मित्र म्हणजे आपलं मन. कडवटपणाला दूर करून प्रेमाचा गोडवा आणतं तेही आपलं मन. या सर्व गोष्टींमध्ये इतर कुणाचाही सहभाग दुय्यम स्वरूपाचा आहे.
माहीत असणे
आपण म्हणतो “मला माहित आहे” आणि ती गोष्ट सोडून देतो, त्याचबरोबर आपण म्हणतो “मला माहित नाही” आणि तीही गोष्ट सोडून देतो. माहित असणे किंवा माहित नसते हा फक्त एक विचार असतो, सत्य नव्हे. माहित नसणारी आणि माहित असणारी अशा प्रत्येक गोष्टीचा आपण अनुभव घेत राहिले पाहिजे. अर्थात माहीत असणे व माहीत नसणे दोन्हीही आपल्या विकासाच्या मार्गावरील अडथळे आहेत, याची आपण नेहमी जाणीव ठेवायला पाहिजे.
गुप्त:
गुप्त:
आपल्या विचारांचा अंत, आपल्या मनाचा ठाव, आपल्या विचारांचा तळ दुसऱ्या व्यक्तीला कळू नये यासाठी बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करतो. या नादात आपण स्वतःच आपल्या विचारांपासून दूर जातो आणि आपलेच विचार आपल्याला गुप्त व अनोळखी होऊन जातात. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपले विचार कधीही गुप्त राहू शकत नाहीत. अगदी जरी शब्दरूपाने व्यक्त नाही झाले तरी ते आपल्या कृतीतून व्यक्त होतात. अगदी आपण शब्द आणि कृती समाजासमोर व लोकांसमोर चांगल्या प्रकारे चालू ठेवल्या तरी आपल्या सवयी मधून आपले विचार डोकावत असतात. जरी आपण लोकांसमोर आपल्या सवयी चांगल्या प्रकारे ठेवण्याचा खोटा खोटा प्रयत्न केला तरी आपल्या चारित्र्या मधून आणि आपल्या मूल्यांमधून दिसत असतात. अगदी आपण आपलं चारित्र्य आणि आपलं मूल्य व शील जगासमोर चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या विधिलिखितामध्ये आपले विचार नक्कीच अधोरेखित होतात. आपले विचार कधीही गुप्त नसतात. आपल्या विचारांना जाणणे व शोधणे आणि त्या विचारांना आपल्याला जसं जीवन हवं आहे त्या जीवनाशी जाणीवपूर्वक सुसंगत करणं हे आपल्या जीवनाचं एक प्रमुख ध्येय असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या-वाईट परिस्थितीचे आणि परिणामांचे मूळ चांगल्या चांगल्या वाईट विचारांमध्ये आहे. म्हणून परिस्थिती बदलायची असेल, परिणाम बदलायचे असतील तर आपल्याला कारणांवर म्हणजे विचारांवर नक्कीच विचार करावा लागेल. आजच सुरुवात करू या. आपले विचार स्वतःपासून गुप्त ठेवणं टाळू या, ते जाणून घेऊया.
क्षणभंगुर:
क्षणभंगुर:
जीवन हे क्षणभंगुर आहे. आपण जीवन क्षणाक्षणाने जगत असतो. अर्थात सर्व क्षणांची गोळाबेरीज म्हणजे आपले जीवन होय. यातील प्रत्येक क्षण ज्या पद्धतीने व द्रुष्टीने आपण जगू त्यावरून आपल्या जीवनाची दिशा व दशा ठरणार असते.
आपण आपले जीवन हे ऑटो मोडवर अर्थात स्वयंचलित पद्धतीने जगत असतो. म्हणजे आपण जगण्यासाठी फार काही विशेष करत नाही, ही प्रक्रिया आपोआपच चालू असते. आपले अंतर्मन आपल्या जीवनातील सर्व प्रक्रिया आपल्यासाठी आपल्या नकळत करून टाकते. आपल्या अंतर्मनामध्ये जे जे आहे ते आपण जीवनात क्षणाक्षणाला प्रदर्शित करत असतो.
घडून गेलेले क्षण क्षणात भूतकाळात जमा होतात. येऊ घातलेले क्षण भविष्यकाळात असतात. या दोघांच्या मध्ये “आत्ता आणि इथे” म्हणजे वर्तमानकाळात चालू असणारे क्षण. चालू असणारा क्षण चालतच असतो, थांबत नाही. तो क्षणातच भूतकाळात बदलणार असतो. आपला अधिकार आणि हक्क फक्त वर्तमान क्षणावर असतो. आपल्या आयुष्याची बेरीज म्हणजे फक्त वर्तमान क्षणांची बेरीज. स्थळ, काळ, वेळ, प्रसंग, व्यक्ती व परिस्थिती या सर्वांचा विचार करता प्रत्येक क्षण खास व स्वतंत्र असतो. जर आपण या क्षणात सावधान व जाणीवेत नसू तर काही कळायच्या आतच तो क्षण भूतकाळात गेला असेल. अर्थात प्रत्येक क्षण क्षणभंगुर आहे.
आपण एकदा घडून गेलेले क्षण पुनपुन्हा जगत असतो. हे करण्यासाठी आपल्या मनात कल्पनाशक्ती नावाची ताकद असते. तोच जुना क्षण आता जसाच्या तसा जगून आपण आधीच जगलेलं जीवन पुन्हा जगत असतो. आनंदाचे व आवडीचे क्षण तेच व तसेच पुन्हा उभे करतो. याचा अर्थ तोच एक क्षण आपण हजारो वेळा जगतो. हजारो वेगवेगळे क्षण जरी जगलो तरीही तो भूतकाळातील एकच क्षण असतो. त्या अर्थाने हा प्रत्येक क्षण क्षणभंगुर आहे. भूतकाळातील हवेहवेसे क्षण वर्तमान क्षणांना जाणण्या अगोदरच भूतकाळ जाहीर करतात. भूतकाळातील या क्षणांचा आपल्या मनावर घट्ट पगडा असतो. तो क्षण प्रत्येक वेळी तसाच्या तसा यावा असा आपला हट्ट असतो. याला आपण अनुभव हे सुंदर नाव देतो. प्रत्येक क्षणाला नवीन व कोराकरकरीत जगायचा असेल तर हे टाळायला हवे. समोर असणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपल्याला भूतकाळरहित व आवडनिवडरहित जगायला शिकले पाहिजे.
आपल्याला प्रत्येक क्षणी स्वतःलाच का? व काय? प्रश्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे जर एक हेतू, ध्येय किंवा उद्दिष्ट असेल तर आपण प्रत्येक क्षण जगताना यांचा नेहमीच परामर्श घेऊ. त्यांच्या भोवती आपला तो क्षण गुंफून टाकू. गुंफलेला तो क्षण आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल. तो भूतकाळात गेल्यावरही आपल्यासाठी सर्वोत्कृष्टच असेल. असा भूतकाळ आपल्याला नवीन क्षण नवीन पद्धतीने जगण्याची ऊर्जा देईल. तेच जुने धागे व तेच जुने टाके क्षणाला नाविन्य देणार नाहीत. आपण प्रयत्न केला तरी तेच तेच परत परत आपल्या सर्व क्षणांना व्यापून टाकणार. म्हणून आपल्याला जर प्रत्येक क्षणाचा सर्वोत्कृष्ट आनंद घ्यायचा असेल व उत्तम उपयोग करायचा असेल तर आपल्यासमोर हरेक क्षणासाठी एक ध्येय असेल. हे ध्येय काही दिवसासाठी, वर्षांसाठी किंवा आयुष्यभरासाठी असेल. ते अगोदरच आपण ठरविलेले हवे. प्रत्येक क्षणी स्मरण होईल इतके मनावर ठसवीलेले हवे.
प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनात आपण नवीन शिकण्याचं व होण्याचं ध्येय हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपले त्या त्या क्षणांचे शिक्षण आपल्या आयुष्यात बेरजा करत जाते. आत्ताच्या क्षणात आपल्या उद्याचे बी आहे. हे बी दर्जेदार व विकसित असेल तर आपला उद्या सर्वोत्तम असेल. क्षणांचं मोल हेच आपल्या जीवनाचं मोल. जीवन हे या आत्ताच्या क्षणात आहे, क्षणभंगुर आहे.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
क्षणभंगुर:
क्षणभंगुर:
जीवन हे क्षणभंगुर आहे. आपण जीवन क्षणाक्षणाने जगत असतो. अर्थात सर्व क्षणांची गोळाबेरीज म्हणजे आपले जीवन होय. यातील प्रत्येक क्षण ज्या पद्धतीने व द्रुष्टीने आपण जगू त्यावरून आपल्या जीवनाची दिशा व दशा ठरणार असते.
आपण आपले जीवन हे ऑटो मोडवर अर्थात स्वयंचलित पद्धतीने जगत असतो. म्हणजे आपण जगण्यासाठी फार काही विशेष करत नाही, ही प्रक्रिया आपोआपच चालू असते. आपले अंतर्मन आपल्या जीवनातील सर्व प्रक्रिया आपल्यासाठी आपल्या नकळत करून टाकते. आपल्या अंतर्मनामध्ये जे जे आहे ते आपण जीवनात क्षणाक्षणाला प्रदर्शित करत असतो.
घडून गेलेले क्षण क्षणात भूतकाळात जमा होतात. येऊ घातलेले क्षण भविष्यकाळात असतात. या दोघांच्या मध्ये “आत्ता आणि इथे” म्हणजे वर्तमानकाळात चालू असणारे क्षण. चालू असणारा क्षण चालतच असतो, थांबत नाही. तो क्षणातच भूतकाळात बदलणार असतो. आपला अधिकार आणि हक्क फक्त वर्तमान क्षणावर असतो. आपल्या आयुष्याची बेरीज म्हणजे फक्त वर्तमान क्षणांची बेरीज. स्थळ, काळ, वेळ, प्रसंग, व्यक्ती व परिस्थिती या सर्वांचा विचार करता प्रत्येक क्षण खास व स्वतंत्र असतो. जर आपण या क्षणात सावधान व जाणीवेत नसू तर काही कळायच्या आतच तो क्षण भूतकाळात गेला असेल. अर्थात प्रत्येक क्षण क्षणभंगुर आहे.
आपण एकदा घडून गेलेले क्षण पुनपुन्हा जगत असतो. हे करण्यासाठी आपल्या मनात कल्पनाशक्ती नावाची ताकद असते. तोच जुना क्षण आता जसाच्या तसा जगून आपण आधीच जगलेलं जीवन पुन्हा जगत असतो. आनंदाचे व आवडीचे क्षण तेच व तसेच पुन्हा उभे करतो. याचा अर्थ तोच एक क्षण आपण हजारो वेळा जगतो. हजारो वेगवेगळे क्षण जरी जगलो तरीही तो भूतकाळातील एकच क्षण असतो. त्या अर्थाने हा प्रत्येक क्षण क्षणभंगुर आहे. भूतकाळातील हवेहवेसे क्षण वर्तमान क्षणांना जाणण्या अगोदरच भूतकाळ जाहीर करतात. भूतकाळातील या क्षणांचा आपल्या मनावर घट्ट पगडा असतो. तो क्षण प्रत्येक वेळी तसाच्या तसा यावा असा आपला हट्ट असतो. याला आपण अनुभव हे सुंदर नाव देतो. प्रत्येक क्षणाला नवीन व कोराकरकरीत जगायचा असेल तर हे टाळायला हवे. समोर असणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपल्याला भूतकाळरहित व आवडनिवडरहित जगायला शिकले पाहिजे.
आपल्याला प्रत्येक क्षणी स्वतःलाच का? व काय? प्रश्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे जर एक हेतू, ध्येय किंवा उद्दिष्ट असेल तर आपण प्रत्येक क्षण जगताना यांचा नेहमीच परामर्श घेऊ. त्यांच्या भोवती आपला तो क्षण गुंफून टाकू. गुंफलेला तो क्षण आपल्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल. तो भूतकाळात गेल्यावरही आपल्यासाठी सर्वोत्कृष्टच असेल. असा भूतकाळ आपल्याला नवीन क्षण नवीन पद्धतीने जगण्याची ऊर्जा देईल. तेच जुने धागे व तेच जुने टाके क्षणाला नाविन्य देणार नाहीत. आपण प्रयत्न केला तरी तेच तेच परत परत आपल्या सर्व क्षणांना व्यापून टाकणार. म्हणून आपल्याला जर प्रत्येक क्षणाचा सर्वोत्कृष्ट आनंद घ्यायचा असेल व उत्तम उपयोग करायचा असेल तर आपल्यासमोर हरेक क्षणासाठी एक ध्येय असेल. हे ध्येय काही दिवसासाठी, वर्षांसाठी किंवा आयुष्यभरासाठी असेल. ते अगोदरच आपण ठरविलेले हवे. प्रत्येक क्षणी स्मरण होईल इतके मनावर ठसवीलेले हवे.
प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनात आपण नवीन शिकण्याचं व होण्याचं ध्येय हा सर्वोत्तम मार्ग आहे. आपले त्या त्या क्षणांचे शिक्षण आपल्या आयुष्यात बेरजा करत जाते. आत्ताच्या क्षणात आपल्या उद्याचे बी आहे. हे बी दर्जेदार व विकसित असेल तर आपला उद्या सर्वोत्तम असेल. क्षणांचं मोल हेच आपल्या जीवनाचं मोल. जीवन हे या आत्ताच्या क्षणात आहे, क्षणभंगुर आहे.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
स्वातंत्र्यदिन:
स्वातंत्र्यदिन:
आपल्याला काहीतरी करायचं आहे, इथपर्यंत ठीक आहे. आपल्याला कुणालातरी काहीतरी करून दाखवायचं आहे, हे जरा जास्त होतंय. कुणालातरी आणि काहीतरी करून दाखवायचंय या गोष्टी आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणतात. काहीतरी करायचंच ही इच्छा काळाच्या ओघात बाजूला पडते. कुणासाठी तरी किंवा कुणीतरी सांगितले म्हणून ही गोष्ट आपण करायला लागतो. कुणालातरी करून दाखवायचंय, सिद्ध करायचंय ही बाब सदैव समोर येते. करण्यापेक्षा दाखवणे वरचढ होते. करणं बाजूला पडतं व दिखाऊपण समोर येतं. हे खरं तर स्वातंत्र्याला मुकण्यासारखे आहे. आपण जगण्यासाठी न जगता दाखविण्यासाठी जगतो. मग आपलं जगणं बघणाऱ्यांच्या नजरेवर ठरतंय. आपली नजर कामावरून हटते व आता बघणाऱ्यांच्या नजरेवर स्थिर होते. बघणाऱ्यांना खूश करण्यात व दाखवून देण्याच्या या खेळात आपल्या स्वातंत्र्याचा बळी जातो. आपल्याला ‘काय’? काम करायचं आहे ते बाजूला पडते. आपल्याला काम ‘का?’ किंवा ‘कशासाठी’? करायचे आहे ते सारखे समोर येते. म्हणजे या तीन प्रश्नांची उत्तरे ठरवतात की आपण स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात. ज्या दिवशी या प्रश्नांची उकल होते व उत्तरांची अनुभूति होते तोच आपला खरा स्वातंत्र्यदिन.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती
शरीर प्रतिमा:
शरीर प्रतिमा:
शरीर प्रतिमा म्हणजे एखाद्या व्यक्तीचे शारीरिक गुणधर्म, शरीररचना व बाह्य अवयव यासंबंधीची व्यक्तीच्या मनातील प्रतिमा. शरीररचना व अवयव ठेवण यासंबंधित धारणांमुळे उद्भवलेले विचार आणि भावना याबद्दलची समज म्हणजे शरीर प्रतिमा.
आपण स्वतःला आरशात पाहील्यावर स्वतःबद्दल मनात आलेले विचार, निघालेले उद्गार, सुचलेले रूपक, कल्पिलेली प्रतिमा व वाटणारी भावना म्हणजे शरीर भावना. आपण आपल्या शरीराविषयीच्या भावना आपल्या आरशातील प्रतिबिंबावरून ठरवतो. हे आरशातील प्रतिबिंब आपल्या मनातील शरीर प्रतिमेशी कीती प्रमाणात जुळते यावर आपले आपल्या शरीराविषयीचे समाधान ठरते. आपण आपल्या आरशासमोर खूपच वेळ घालवत असेल तर आपल्या मनातील या शरीर प्रतिमा व भावना याबाबत नक्कीच काहीतरी गडबड आहे.
या शरीर प्रतिमेबाबत आपण आनंदी व समाधानी असाल तर ठीक परंतु वय, ऋतू, इजा व आजार यांबरोबर होणारे शारीरिक बदल तुमच्यासाठी मानसिक आघात होऊ शकतात. गळा, चेहरा, ओठ, केस, पोट, कंबर इत्यादी अवयवांमधील हे अपरिहार्य बदल सोबत असमाधान व बेचैनी घेऊन येतात. त्याचबरोबर आपल्या प्रतिमेबाबत जर आपण नाराज व असमाधानी असाल तर तुमचा आत्मविश्वास व आत्मसन्मान कमजोर होईल. या प्रतिमा दुरुस्त करणे म्हणजे आत्मविश्वास व आत्मसन्मान परत मिळवणे असा एकांगी विचार आपण करू. आपला वेळ, पैसे, साधने व कौशल्ये आपण या प्रतिमा दुरूस्त करण्यास समर्पित करू शकाल. शरीर प्रतिमा दुरूस्ती हेच आपल्या जीवनाचे ऐकमेव ध्येय होऊ शकते.
आपले नातेवाईक, मित्रमंडळी, समाज, प्रसारमाध्यमे व सामाजिक माध्यमे यांचाही आपली शरीर प्रतिमा ठरवण्यात मोठा वाटा आहे. काही वेळा हा प्रभाव इतका तीव्र असतो की शरीर प्रतिमेसमोर ईतर सर्व गुणवैशिष्ट्ये व जीवनमूल्ये शून्य ठरवली जातात. त्यामुळे गोरं, उंच, सडपातळ, नाकी डोळी निटस असणं हेच सद्गुण ठरवण्याची चूक होऊ शकते. अशा प्रव्रुतीमळे या सर्व गोष्टी जशा आहेत तशा टिकवून ठेवण्याची किंवा त्यात सुधारणा करण्याची चढाओढ सुरू होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने, फेअरनेस क्रिम, मुरुमे, डाग व सुरकुत्या कमी करणारी औषधे व सप्लिमेंट या सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांची खूप चलती आहे.
आपण आपले शरीर, अंग, रंग, ढंग व अवयव जसे आहेत असे आपण समजतो ती आपल्या शरीराची समजलेली प्रतिमा असते. आपण प्रत्यक्ष कसे दिसतो व आपली शरीर रचना प्रत्यक्ष कशी आहे, याचा या आपण समजलेल्या प्रतिमेशी ताळमेळ असणे महत्त्वाचे आहे. जर या प्रतिमांमध्ये कसलाही ताळमेळ नसेल तर त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या विभिन्न प्रतिमा आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. आपण सर्व प्रकारच्या पँथी व डॉक्टर धुडाळतो पण कोणीही आपल्याला समाधान देऊ शकत नाही. आपण रागवतो व चिडतो, औषध कंपनीला व डॉक्टर मंडळींना नावे ठेवतो. कोणी आपल्याला मनोविकार तज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितल्यावर आपण आपल्याला मानसिक अस्वास्थ्य असल्याचे नाकारतो. आपण समजलेली स्वत:ची प्रतिमा हीच आपण खरी असलेली प्रतिमा मानायला लागतो. आपले वजन कीतीही कमी असले तरीही आपण स्वत: ला जास्त वजन असलेले समजू शकतो. आपले शरीर शास्त्रानुसार सुरुप व सुडौल असते परंतु आपली समजलेली प्रतिमा कुरुप व बेडौल असू शकते. एखादी व्यक्ती त्याचे सामान्य नाक, गाल, हनुवटी, डोळे, कपाळ व चेहरा विद्रुप व कुरुप समजू शकते. एखादी सडपातळ व्यक्ती स्वतःला जाड समजून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करीत राहते. एखादी व्यक्ती आपला सामान्य सावळा रंग काळा समजून, उजळपणा वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या उपायांमध्ये दंग होऊन जातो. यातून असंख्य प्रकारचे त्रास सुरू होतात जे आपले मानसिक स्वास्थ्य हिरावून घेतात.
आपल्या शरीराचा आकार, वजन आणि शरीराच्या वैयक्तिक भागांबद्दल आपल्या भावना म्हणजे आपली भावनात्मक प्रतिमा होय. ही प्रतिमा आपण आपल्या शरीराबद्दल किती प्रमाणात समाधानी किंवा असमाधानी आहोत हे स्पष्ट करते. आपल्या शरीराबद्दल समाधानी व संतुष्ट असलेल्या लोकांना जीवनात आनंद, सुख, सम्रुद्धी व यश मिळते. आपल्या वैयक्तिक अवयव व अंगांबद्दल, लिंगाचा आकार, जाडी व सरळपणा याबद्दल असंतुष्ट असणाऱ्या लोकांचे वैवाहीक व लैंगिक जीवन निराशाजनक होऊन जाते. सर्व ऐहिक सुखसम्रुद्धी व मनासारखा जोडीदार असूनही असे लोक शापित जीवन जगत असतात. अशा लोकांना शरीर, अवयव, अंग व लिंग प्रतिमा दुरूस्त करणारे लैंगिक शिक्षण हाच खरा व कायमस्वरूपी उपचार आहे. परंतु हे लोक क्रीम, मलमे, गोळ्या, इंजेक्शन व जडीबूटी यामध्येच आयुष्य खर्ची करतात. अशा वैयक्तिक व लैंगिक विषयांशी निगडीत उत्पादने, सेवा व उपकरणे बनविणाऱ्या लाखो कंपन्या आज प्रचंड नफा कमावतात. यावरून समाजात असणाऱ्या शरीर, अवयव, लिंग व गुप्तअंग प्रतिमांबद्दलच्या धारणा, विचार व द्रुष्टीकोन बदलाची गरज अधोरेखित होते.
आपण आपल्या शरीराबद्दल व बाहय अवयवांबद्दल ज्या प्रकारे विचार करतो ती म्हणजे आपली संज्ञानात्मक किंवा वैचारिक शरीर प्रतिमा होय. आपल्या शरीराच्या प्रतिमेचा परिणाम म्हणून आपले जे वागणे व वर्तणूक असते ती म्हणजे आपली वर्तनात्मक शरीर प्रतिमा होय.
किशोरवयीन मुलामुलींमध्ये शरीर प्रतिमा खूप महत्त्वाची बाब आहे. तरुणतरुणींचं अलीकडच्या काळात ह्याशिवाय पान हालत नाही. स्लिम, ट्रीम, कट्स, सिक्सपँक, फेअर, फिगर हे शब्द त्यांच्यासाठी परवलीचे बनलेले आहेत. मासिके, प्रसारमाध्यमे व जाहिराती हाच फंडा छुप्या पद्धतीने वापरतात व तरुण पिढीला आकर्षित करतात. शरीर प्रतिमेचा व अवयवांचा वापर ते त्यांची उत्पादने व सेवा विकण्यासाठी वापरतात.
सकारात्मक शरीर प्रतिमा व्यक्तीमध्ये सुरक्षितता, प्रेम, दया, करूणा, सहनशीलता व आत्मविश्वास निर्माण करते. नकारात्मक शरीर प्रतिमा लज्जा, कमतरता, अक्षमता व न्यूनगंड या भावना तयार करते. शरीर प्रतिमेबाबत नकारात्मक भावना प्रबळ असल्यास स्वतःला बदलण्याची इच्छा तीव्र होऊ शकते.
१० ते ३० वर्ष वयोगटातील मुलेमुली व स्त्रीपुरुष टेलिव्हिजन, चित्रपट आणि मासिकांमधील स्त्रीपुरुषांच्या रूपाचे अनुकरण करतात. माध्यमांद्वारे बनवलेल्या सौंदर्याच्या 90% मानदंडांचे मुलेमुली व स्त्रीपुरुष अनुपालन करतात. आदर्श शरीराच्या व वजनाच्या स्त्रियांची चित्रे व फोटो पाहिल्यानंतर, 95% स्त्रियांना त्यांच्या शरीराचा आकार जास्त व विद्रूप वाटतो.
पुरुषांनी अशा जाहिराती पाहिल्यानंतर, त्यांच्या शरीरातील चरबी व मांसपेशीबाबत ते असमाधानी असल्याचे दिसून आले. पुरुषांच्या शरीराच्या समाधानामध्ये शरीरातील चरबीपेक्षा स्नायूंचे महत्त्व जास्त महत्वाचे आहे. असे चरबी कमी व स्नायू जास्त असणारे सिक्स पँक शरीर मिळवण्यासाठी काही पुरुष वेगवेगळ्या प्रकारचे तात्पुरते उपाय करतात. परंतु या उपायांनी त्यांचे निरामय व निरोगी शरीराचे स्वप्न भंग पावते.
जेव्हा आपण आपल्या दृष्टीकोनातून आपले शरीर व अवयव याविषयी असमाधानी असतो, तेव्हा आपण स्वत: ला अलग समजू शकतो. आपल्याला आपल्या दिसणे, आकार, अवयव व अंगांबद्दल वाईट वाटते. म्हणून आपण आपले स्वतःचे शरीर, अंग व अवयव आणि त्याबद्दलच्या धारणा व विचार ओळखूया व तज्ञांच्या मदतीने निरोगी व निरामय शरीर प्रतिमा नव्याने स्थापित करूया. यामध्ये काही मदतीची गरज वाटल्यास आपल्याला मानसोपचारतज्ज्ञ नक्कीच मदत करतील.
डॉ. संताजी शेळके
मानसोपचारतज्ज्ञ
बारामती