चौकशी की स्पष्टीकरण की स्वीकार:

चौकशी की स्पष्टीकरण की स्वीकार:
“तू असा का करतोस?
तू असा का वागतोस?
तुला असं का वाटतं?
तू असं का चिडतोस?
तू असं काय रडतोय?
तू इतका का घाबरतोय?”
या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता व कौशल्य आपल्या लहान मुलांमध्ये नसते. बर्‍याच वेळा ‘हे का?’, प्रकारचे प्रश्न आपल्या मुलांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या समस्यांमध्ये व अडचणींमध्ये अजून भर टाकतात. त्यांच्या मूळ समस्येला व अडचणीला समजून घेत असतानाच आता त्यांच्या भावनेचे व वागण्याचे त्यांना विश्लेषण आणि स्पष्टीकरण द्यावे लागते. हे अतिरिक्त काम करणे बऱ्याच वेळा आपल्या मुलांसाठी खूपच कठीण अवघड गोष्ट असते.

बर्‍याचदा आपल्या मुलांना हे माहीत नसते की त्यांना काय वाटत आहे? व ते तसे त्यांना का वाटत आहे?
जरी आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या भावनांबद्दल, वागण्याबद्दल व वाटण्याबद्दल थोडेफार माहित असेल तरी ते सांगण्यास टाळाटाळ करतात. आपल्या मुलांना भीती वाटते कि आपल्या सारख्या प्रौढ व्यक्तींच्या आणि समाजातील मोठ्या व्यक्तींच्या दृष्टीने त्यांनी सांगितलेले कारण योग्य व समर्थनीय वाटणार नाही. आपल्या मुलांना अजूनही वाटते की त्यांनी सांगितलेले कारण चांगले व नैतिक वाटणार नाही.

“तू चिडू व ओरडू शकतोच कसा?
का असा वागूच कसा शकतोस?
असं बोलण्याची व वागण्याची तुझी हिम्मत कशी झाली?”
अशी गुन्हासद्रुष्य चौकशी करण्याऐवजी व स्पष्टीकरण मागण्याऐवजी
“मी पाहतोय की तुला काहीतरी दु:खी व नाराज करीत आहे.
तुला खूपच राग आलेला दिसतोय.
मला दिसतंय कि तुला मत्सर आणि द्वेष वाटत आहे.
मी पाहतोय की तुला कशाबद्दल तरी साशंक वाटत आहे”, अशी संवेदनशील विचारपूस केल्यास आपली मुले आपल्याशी मनमोकळा व स्वतःहून संवाद साधतील. स्पष्टीकरण मागण्याऐवजी, दबाव टाकण्याऐवजी व चौकशी करण्याऐवजी आपण काय जाणतो, आपल्याला काय वाटते, आपल्या भावभावना व आपलं वेगळं व्यक्तीमत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलणे आपल्याला सुद्धा सोपे व सुरक्षित वाटते, नाही का?

सहानुभूती व आपली मुले:

सहानुभूती व आपली मुले:
आपली आपल्या मुलांबरोबर होणारी बरीच संभाषणे ही प्रासंगिक आदानप्रदान या स्वरूपाची असतात. अशा प्रकारच्या संभाषणात आपण आपल्या मुलाबरोबर नेहमीच सहानुभूती व सह अनुभूती बाळगणे गरजेचे नाही. जर आपले मूल म्हणत असेल की “आई, मी आज शाळा सुटल्यावर मित्राच्या घरी खेळायला जाणार आहे,” तर “ठीक आहे, मला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,” एवढंच बोलणं पुरेसं आहे. अशा प्रसंगात सहानुभूती आणि सह अनुभूती यांची फारशी आवश्यकता नसते.

आपण सहानुभूती व सहअनुभूती दाखवण्याची वेळ तेव्हाच असते जेव्हा आपल्या मुलाला वाटते की आपण त्याला कसे वाटते हे समजून व जाणून घ्यावे.
“माझं ऐकून तर घ्या,
मला समजून घ्या,
मला काय वाटतं हे जाणून तर घ्या,
मला काय वाटते तुम्हाला कधी कळणार नाही,
मी काय म्हणतोय ते तरी ऐका,”
अशा प्रकारच्या आपल्या मुलांकडून आलेल्या प्रतिक्रिया, आपण भावनिक संभाषण सुरू करण्याचे संकेत आहेत. यावेळी आपण सहानुभूती व सह अनुभूती असलेल्या भावनिक आदानप्रदान व संभाषणाचा कौशल्याने वापर करण्यास शिकले पाहिजे.

मलांच्या सकारात्मक भावना प्रतिबिंबित करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवत नाहीत.
“मी पहिला आलो,
मी जिंकलो,
मला पैकीच्या पैकी गुण मिळाले,
मला गोल्ड मेडल मिळाले,
मला सर्वोत्तम बक्षीस मिळाले,”
या प्रकारच्या मुलांच्या सकारात्मक प्रतिसादाला सकारात्मक उत्तर देणे आपल्याला खूप सोपे आहे. मुलांकडे काही आनंददायक असेल तर त्यांच्या आनंदाची सहानुभूती व सह अनुभूती अनुभवणे आपल्याला खूपच सोपे व आनंददायी आहे.

आपल्या मुलांकडे जेव्हा नकारात्मक भावना व प्रतिक्रिया असतात तेव्हा आपल्याला काही वेगळ्याच कौशल्यांची आवश्यकता असते. आपली मुले ज्यावेळी रडत असतात, नाराज असतात, वैफल्यग्रस्त असतात, रागात असतात, चिडचिडी असतात, काहीतरी हट्ट करत असतात तेव्हा मात्र आपण सहानुभूती व सहअनुभूतीची भाषा आपण विसरून जातो. अशा वेळी आपण मुलांच्या भावनांकडे व अनुभूतींकडे दुर्लक्ष करणे, नाकारणे किंवा नैतिकता बनवणे या जुन्या व साचेबद्ध मार्गांचा वापर करतो. आपल्या मुलांच्या भावनिक जखमा, भावनिकरित्या बोचणारी सल, भावनिकरित्या टोचणारा काटा या गोष्टी शारीरिक जखमा, शारीरिकरित्या बोचणारी सल आणि शारीरिकरित्या टोचणारा काटा यांएवढ्याच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त वेदनादायी व रक्तबंबाळ करणाऱ्या असतात. हे आपण सर्वांनी समजून घेतल्यास सहानुभूती, सह अनुभूती व सहमती निर्माण करणे आपल्याला खूप सोपे होते. जेव्हा आपण आपल्या मुलांच्या वेदना, भावना व भावनिक गरजांबद्दल अधिक संवेदनशील होतो, तेव्हा सहानुभूती व सह अनुभूती निर्माण करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.

जेव्हा आपण आपल्या मुलांच्या भावनिक जखमांना व नकारात्मक भावनांना शारीरिक जखमा, दुखापत किंवा वेदना अशा प्रतिमारूपाने बघतो तेव्हा त्यांना आपण त्वरित मदत करणे व गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक समजतो. आपल्या मुलांच्या सर्व भावना स्वीकारल्या जाऊ शकतात व त्याप्रती संवेदनशीलता, सहानुभूती व सह अनुभूती दाखवता येते हे आपल्याला शिकता येईल. विशिष्ट क्रिया व क्रुतीही मर्यादित असणे आवश्यक असल्याचे आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. आपण आपल्या भावावरचा राग गुद्द्याने नव्हे तर मुद्द्याने व्यक्त कसा करावा हे आपल्या मुलांना शिकवू शकतो. “तु तुझ्या बहीणीवर किती रागावला आहेस हे मी पाहू शकतो. पण तुला काय पाहिजे ते शब्दांतून सांग, मारामारी करून नव्हे.” हे आपण आपल्या मुलांना समजावून सांगू शकतो. आपल्याला या आणि इतर अशाच प्रकारे इतर प्रसंगांचा व भावनिक समस्यांचा पुनर्बोध देणाऱ्या वाक्यांची एक डायरी बनविणे आणि ती बोधवाक्य डायरी मोक्याच्या ठिकाणी व भावनिक प्रसंगात मुलांसोबत आपल्याला सहजासहजी वापरता येतील अशा ठिकाणी घरात किंवा आपल्या खिशात जवळ ठेवणे आपल्याला उपयुक्त वाटेल. आपली व आपल्या मुलांची नाती व संबंध द्रुढ, प्रेमळ व समजूतदार बनवण्यासाठी हे एक उत्तम कौशल्य नेहमीच आपल्या सोबत असावे, त्याचा वापर करून करून आपण त्यामध्ये उत्तमोत्तम होत जाण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील व क्रुतीशील रहावे.

शंभर टक्के:

“शंभर टक्के तयारी झाल्याशिवाय परिक्षा देणार नाही,” असे म्हणणारे कधीच परिक्षेला बसू शकणार नाहीत. “शंभर टक्के यशस्वी होण्याची खात्री झाल्याशिवाय प्रयत्न करणार नाही,” असे म्हणणारे कधीच प्रयत्न करणार नाहीत. “शंभर टक्के सुरक्षितता व निश्चितता यांची हमी मिळाल्याशिवाय करीअर निवडणार नाही,” असे म्हणणारे कधीच करिअर निवड करू शकत नाहीत.

पूर्वतयारी, काळजी व नियोजन चांगलेच असते; परंतु अतीपूर्वतयारी, अतीकाळजी व अतीनियोजन हेच आपल्या सुखी, समाधानी, यशस्वी, आनंदी व सम्रुद्ध जीवनातील अडथळे बनू नयेत याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे.

समस्या समाधान:

आपल्या मनाचे आपण मालक असतो, इतरांच्या मनाचे नाही. आपण केलेल्या क्रुतीचे आपण मालक असतो व त्याची जबाबदारी पूर्णपणे आपली असते. जिथे आपण आपल्या समस्यांची कारणं शोधतो, तिथेच समस्यांचं समाधानही शोधत बसतो. आपल्या समस्यांची कारणे स्वतःच्या अखत्यारीत व आवाक्यात असणाऱ्या कारणांमध्ये शोधल्यास आपण स्वतः त्यावर समाधान शोधू शकतो व त्या अनुषंगाने क्रुतीही करू शकतो. आपल्या समस्यांची कारणे जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या अखत्यारीत व आवाक्यात नसणाऱ्या कारणांमध्ये शोधतो, तेव्हा आपण स्वतः त्यावर आपण समाधान शोधू शकत नाही व क्रुतीही करू शकत नाही.

चांगला अनुभव:

वाईट अनुभव आल्यावर, खापरं फोडायला डोकी शोधण्याऐवजी; पुढल्या वेळी चांगला अनुभव येण्यासाठी आपण काय करावे? या प्रश्नाचा वापर केल्यास, जीवनात आनंद व मनशांती अटळ आहे.

आपण व आपली मुले:

आपण व आपली मुले:
आपल्या मुलांशी जेव्हा आपण खालील पद्धतीने संवाद साधू तेव्हा त्यांच्यावर याचा काय परिणाम होत असेल याची कल्पना करा.
“छे छे, ह्याने खूप त्रास होऊच शकत नाही.”
“यात काय आहे एवढं नाराज होण्याइतकं”?
“भरल्या घरात रडायला काय झालंय तुला.”
“तू एका छोट्या गोष्टीचा बाऊ करीत आहेस”.
“बाकी मुले बघ, ते कधीही तक्रार करत नाहीत.”
“तू एखाद्या कुक्कुल्या बाळासारखे वागत आहेस.”
“उगीच का रडतो आहेस, एखाद्या मुलीसारखा.”
“बरं, हळूहळू तूला त्या नकोशा गोष्टीची सवय होईल.”

जेव्हा आपण आपल्या मुलांच्या भावना पुसून टाकतो, पुरून टाकतो, बाजूला सारतो किंवा नाकारतो, तेव्हा आपली मुले अधिक रागीट व क्रोधित होतात. आपली मुले त्यांच्या मूळ समस्येबाबत जास्त अस्वस्थ होऊ लागलात आणि शेवटी आपल्या पालकांशी डोकं फिरल्यासारखे व सटकल्यासारखे वागू लागतात. जेव्हा आपल्या भावना नाकारल्या जातात तेव्हा सामान्यत: आपल्यासमोर हाच एक मार्ग असतो. यात आपण आणि आपली मुले ऐकमेकांच्या विरोधात उभे राहतो व हा विरोध दिवसेंदिवस वाढतच जातो. समस्यामागून समस्या येत राहतात आणि आपले व आपल्या मुलांचे वैर विकोपाला जाऊ लागते. आपली व आपल्या मुलांची हार होते व समस्या विजयी होतात. ही अवस्था नक्कीच बिकट आहे आणि आपल्याला व आपल्या मुलांनाही ती नकोशी आहे.

आपल्या मुलांशी जेव्हा आपण खालील पद्धतीने संवाद साधू तेव्हा त्यांच्यावर याचा काय परिणाम होत असेल याची कल्पना करा.
“असं वाटतंय की तुला खरंच खूप दुखतंय.”
“हे तुझ्यासाठी फारच भीतीदायक असावे.”
“हां, तुला त्याबद्दल खरोखरच वाईट वाटतंय!”
“तुझ्यासारख्या वेदना तुझ्या सर्वात वाईट शत्रूलाही होऊ नयेत.”
“असं वाटतंय की तुला खूप वाईट वाटत आहे.”
“मला वाटतंय की, तु नाराज झालेला आहेस.”
“तु फारच उदास झालेला आहेस.”
“तूला तुझ्या भावाचा खूप राग आलेला दिसत आहे”.
“मला वाटतं, तुला अपराधी वाटत असावं.”
“तू त्या गोष्टीबद्दल बेचैन वाटतोस.”

हे सर्व प्रतिसाद दर्शवतात की आपण आपल्या मुलाने व्यक्त केलेल्या भावना ऐकू आणि स्वीकारू शकतो. जेव्हा आपण आपल्या मुलांच्या भावनांचा स्वीकार करतो, तेव्हा आपण विरुद्ध मुले हे चित्र बदलते व आपण आणि मुले, विरूद्ध मुलांच्या समस्या असे चित्र निर्माण होते. आपण आपले सामर्थ्य व अनुभव यांचा उपयोग खरोखरच आपल्या मुलांसाठी उपयुक्त पद्धतीने करतो. या पद्धतीने मुलांमध्ये आपल्या पालकांबद्दल अधिक प्रेम, आदर व आज्ञाधारकपणा तयार होतो. जेव्हा आपण एखाद्या मुलाच्या भावना ओळखतो व त्या विनाअट स्वीकारतो, तेव्हा आपण त्याची एक महान सेवा करत असतो. आपण आपल्या मुलाला त्याच्या अंतर्गत वास्तवाशी संपर्क साधायला मदत करतो. एकदा का त्याला ती वास्तविकता स्पष्ट झाली, की तो त्याच्या समस्येशी स्वतःच झुंज सुरू करण्यासाठी सामर्थ्य गोळा करायला सुरुवात करतो. या झुंजीत आपली व आपल्या मुलांची सामूहिक जीत व भावनिक समस्येवर मात, निश्चित आहे. ही अवस्था नक्कीच आपल्याला व आपल्या मुलांना आवडणार व हवीहवीशी वाटणार हे वेगळे सांगायला नकोच.

ह्रदयापासून ह्रदयापर्यंत:

ह्रदयापासून ह्रदयापर्यंत:
आपण जेव्हा अस्वस्थ, नाराज, बेचैन किंवा दु: खी असतो, तेव्हा कितीही चांगला सल्ला आपल्याला नकोसा वाटतो. कोणतेही तत्वज्ञान, युक्तिवाद, मानसशास्त्र किंवा दृष्टिकोन ऐकण्याची आपली मनस्थिती नसते. जेव्हा अशा प्रकारची चर्चाही आपल्यासमोर होते, तेव्हा आपल्याला पूर्वीपेक्षाही जास्त वाईट वाटते. ‘बिचारा ठरवला गेल्यास व दयेस पात्र असल्याचे दाखवल्यास’, आपल्याला स्वतःचीच किव वाटायला लागते. आपल्याला एखाद्याने ‘प्रश्न विचारायला सुरुवात केल्यास’, आपण बचावात्मक होतो. आपल्याला जे काही वाटते ‘तेवढे वाईट वाटण्याचे व जाणवण्याचे काहीच कारण नाही’, हे ऐकायला मिळणे म्हणजे अगदीच केविलवाणी अवस्था होय. अशा प्रकारच्या प्रतिक्रियांवरील आपली प्रतिक्रिया अर्थातच ‘अरे जाऊ दे, सोडून दे, तुला पुढे सांगण्यात काय अर्थ आहे?’ अशीच असणार आहे.

जेव्हा कोणीतरी आपले म्हणणे खरोखर ऐकून घेतात, आपले म्हणणे मान्य करतात, आपल्या अंतर्गत वेदना आणि आपल्याला जे काही बोलायचे आहे, त्याबद्दल अधिक बोलण्याची संधी देतात, तेव्हा आपला भावनिक त्रास कमी होतो आणि आपली अस्वस्थता, नाराजी, बेचैनी आणि गोंधळ कमी होतो. आपल्या भावनांचा आणि समस्यांचा सामना करण्यास आपण स्वतःला सक्षम समजायला लागतो. परंतु सहानुभूतीची व सहअनुभूतीची ही भाषा आपल्याला आपोआप व नैसर्गिकरित्या येत नाही. आपल्यातील बरेचजण आपल्या भावनांना नाकारतच मोठे झाले आहेत. भावना स्वीकारण्याची ही नवीन भाषा शिकण्यासाठी, आपल्याला त्यातील काही पद्धती शिकण्याची आणि त्यांचा अभ्यास व सराव करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या भावनिक स्वीकारातील कमतरतांना शोधणे व त्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे.

अशा वेळी आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे संपूर्ण लक्ष व ध्यान द्यावे. कोणीतरी कान व लक्ष देऊन ऐकणारा असल्यावर, एखाद्याला आपल्या समस्या सांगणे खूपच सोपे असते. त्या ऐकणाराला काहीसुद्धा बोलण्याची गरज नसते. सहानुभूती व काळजी आहे असे दाखविणारी व मौन अवस्थेत असणारी, हेच गुण ऐकणाऱ्या व्यक्तीकडे असणे आवश्यक असते.

प्रश्न विचारणे आणि सल्ला देणे याऐवजी, प्रेमळ व दयाळू शब्दांचा वापर करून, आपण त्या व्यक्तीच्या भावनांना मान्यता द्यावी. आपल्याला जेव्हा कोणी सल्ला देते, प्रश्नांचा भडीमार करते व तत्वज्ञान सांगायला लागते तेव्हा स्पष्ट, समतोल किंवा विधायक विचार करणे आपणास कठीण होऊन जाते. त्याऐवजी साध्या “अरे देवा, ओह, अच्छा, हांजी, काय ऐकतोय मी हे, मला मदत करावेसे वाटते,” यासारख्या प्रेमळ शब्दांनी व काळजीने ऐकून घेण्याच्या वृत्तीने, ती व्यक्ती स्वतःच्या समस्येवर स्वतःच उपाय शोधून काढते.

भावना नाकारण्यापेक्षा व कमी करण्यापेक्षा, त्या भावनांना नाव द्यायला शिकावे. जेव्हा आपण एखाद्याला त्याच्या वाईट भावना दूर ढकलण्याचा आग्रह करतो किंवा त्या भावना नाकारतो, तेव्हा ते अधिकच अस्वस्थ झाल्यासारखे दिसते. खूप लोकांना अशी भीती वाटते की भावनांना नाव देऊन, ते त्या व्यक्तीची स्थिती आणखी वाईट बनवतील किंवा ती व्यक्ती लाडावेल अथवा डोक्यावर बसेल. परंतु सत्य अगदीच उलट आहे. ज्या व्यक्तीचे बोलणे, शब्द अन् शब्द कान देऊन बारकाईने ऐकले जातात, त्याला मनापासून समाधान वाटते. ‘कोणीतरी आहे जो आपला अंतर्गत अनुभव कबूल व मान्य करतो’, ही भावना व्यक्तीला समस्येचे समाधान शोधण्यास प्रव्रुत्त करते.

व्याख्यान, प्रवचन व तर्कशास्त्र विस्ताराने सांगत बसण्यापेक्षा, रमणीय कल्पनांच्या व स्वप्नांच्या मदतीने व्यक्तीला एक शुभेच्छा द्यावी.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी हवे असते, पण ते त्यांना मिळवणे शक्य नसते, तेव्हा आपण तार्किक स्पष्टीकरणांसह प्रतिसाद देतो. परंतु बर्‍याचदा आपण जितके कठोर व तार्किक वर्णन करतो, तितके जास्त ते आपल्या मताचा व आपला निषेध करतात. त्याऐवजी ‘आपल्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करो,’ ‘आपली स्वप्ने पूर्ण होवो,’ अशा काल्पनिक व रमणीय शुभेच्छा त्या व्यक्तीला प्रोत्साहन देतात.

परंतु आपण वापरलेल्या कोणत्याही पद्धतीपेक्षा व शब्दांपेक्षा महत्त्वाची म्हणजे आपली मनोवृत्ती व दृष्टीकोन. जर आपला दृष्टीकोन मदतीचा, अनुकंपाचा व दयाळूपणाचा नसेल तर आपण जे काही बोलतो ते बनावट किंवा लबाड असल्यासारखे वाटेल. जेव्हा आपण आपल्या बोलण्यात व शब्दांमध्ये सहानुभूतीची व प्रेमाची भावना ठेवतो, तेव्हा आपण थेट समोरच्याच्या हृदयाशी बोलत असतो.